श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)

इराण विरूद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाच्या बातम्या दूरदर्शन वर जोर धरत होत्या. त्या बातम्या चालू असतानाच' 'भोंदू बाबा अशोक खरातच्या' बातम्या यायला सुरुवात झाली. या अशोक खरातच्या बातम्यांची व्याप्ती एव्हढी वाढली की, त्यापुढे युद्धाच्या बातम्या कमी वाटू लागल्या, त्या बातम्या या बातम्यांपुढे थिट्या पडल्या. कल्पनेत होत, त्यापेक्षाही हे प्रकरण महाभयंकर होत. सर्व प्रसार माध्यमावर भोंदू बाबा 'अशोक खरात' गाजू लागला. वर्तमानपत्र आणि दूरदर्शन भोंदू बाबाच्या बातम्यानीच व्यापून गेल. बरोबर आहे, युद्ध इराण मध्ये चालू होते , म्हणजे आमच्या देशापासून खूप लांब होते, त्याची झळ आमच्यापर्यंत पोहोचायला काही तरी का होईना, पण वेळ लागणार होता, शिवाय आमची अर्थव्यवस्था एव्हढी भक्कम होती की, सगळ्या देशांना युद्धाची झळ पोहोचल्यानंतर, ती आम्हाला पोहोचणार होती. पण हे 'भोंदूबाबा' प्रकरण माझ्याच देशात, माझ्याच राज्यात, माझ्याच जिल्ह्यात घडलेले होते. या भोंदू बाबांचे एक-एक प्रताप ऐकून तळपायाची आग मस्तकाला भिडत होती. त्याचे हे प्रताप दिवसागणिक  वाढतच होते. अगदी आज देखील त्याचे नवे-नवे ,एक-एक प्रकरण उघडकीस येत आहेतच. त्याच्यावरच्या गुन्ह्यांची संख्या रोज वाढतच आहे. कोठे स्त्रियांवर अत्याचार, तर कोठे बळजबरीने जमीन खरेदी, कोठे हवाला प्रकरण, तर कोठे 'डमी इन्कम टॅक्स ऑफिसर्स ' पाठवून सक्तीची वसुली, तर कोठे आत्महत्येला कारणीभूत! अजून किती-किती उद्योग या भोंदूबाबाने केले आहेत? ते कधी चव्हाट्यावर येणार ?  हे काहीच माहीत नाही. पण आतापर्यंतच्या एकूण अभ्यासावरुन तरी अस वाटतंय की, अजूनही या भोंदू बाबाची पाल-मूळ उकरून काढायला हवी आहेत, त्याच्या गुन्ह्यांच प्रमाण वाढू शकतय, गुन्ह्यांची संख्या वाढू शकते आहे. कारण मोठ-मोठी राजकारणी मंडळी यात अडकलेली आहेत. काही लोक त्याला पाठीशी घालणारच आहेत. तर काही 'तेरी भी चूप, मेरी भी चूप ' म्हणून मूग गिळून बसणार आहेत. 
कोठे जात आहोत आम्ही. प्रगतीकडे की अधोगतीकडे? श्रद्धेकडे की अंधश्रद्धेकडे? ढोंगेबाजी, बुवाबाजी याचे स्थान आमच्या समाजात राहवेच का? आमचा 'पुरोगामी महाराष्ट्र' आहे ना? या भोंदू बाबाचे एक-एक कारनामें ऐकताना डोक सुन्न होऊन जात आहे. खरच आपण प्रगतिशील महाराष्ट्रात आहोत का? स्त्रियांना खरोखर उच्च शिक्षण मिळत आहे का? त्या शिक्षणाचा त्या कसा उपयोग करीत आहेत ? सावित्रीबाई फुलेंना ही अशी 'सुशिक्षीत स्री' अपेक्षित होती का? या साठीच का त्यांनी, एव्हढा समाजाने केलेला छळ सोसला आणि स्त्रीयांना शिक्षण दिले? याच साठी का धोंडू केशव कर्वेनी आपलं आयुष्य वेचलं? आपल्याला काय हवे आहे? झटपट श्रीमंती, झटपट सुख, झटपट शांती? आणि ती सुख-शांती अशा तऱ्हेने मिळणार आहे का? आपण शिक्षण घेतलेले आहे. 'जगात कोणतीही जादू नाही, चमत्कार तर नाहीच नाही, मी फक्त हातचलाखी करतो', हे खुद्द जादुगारच आपल्याला सांगतो. मग आम्ही अशा चमत्काराच्या मागे का जावे? या भोंदू बाबाच्या जाळ्यात जेव्हढ्या स्त्रिया ओढल्या गेलेल्या आपण पाहतोय, त्या अशिक्षित, तळागाळातल्या स्त्रिया बिलकुल नाहीयेत. सारासार विचार करू शकणाऱ्या, मध्यम आणि उच्च स्तरातील या स्त्रिया आहेत. किंबहुना, भोंदूबाबाने अशा निम्न  स्तरातील स्त्रीयांना जवळ केलेच नाही. त्याने जवळ केलं, त्याच स्त्रीयांना, ज्या त्याला पैसा देऊ शकत होत्या, ज्यांच्या पदाचा, अधिकाराचा, पैशाचा त्याला फायदा होणार होता! ज्यांनी त्याला जवळ करताच, स्वतः काळी कृत्य करून देखील, त्याचा समाजातील मानसन्मान वाढणार होता. त्याची ही काळी कृत्ये झाकली जाणार होती, त्यावर पडदा पडणार होता. बर या अत्याचारात बळी पडलेल्या फक्त स्त्रियाच होत्या असही नाही. काही पुरुषही आहेत. स्त्रियांची संख्या जरा जास्त आहे, यात शंकाच नाही. कारण स्त्रिया जास्त श्रद्धाळू असतात, समोरच्यावर लवकर विश्वास ठेवतात. आयुष्यात येणार संकट मनाला जास्त लावून घेतात, जास्त चिंता करतात, जास्त भावनाशील असतात, जास्त संवेदनशील असतात. पण म्हणून पुरुष वर्ग या भोंदू बाबांकडून फसविला गेलाच नाही, असेही नाही. जेथे जेथे पैसा दिसला, अधिकार दिसले, स्री सौंदर्य दिसलं, तेथे तेथे खरात बाबाने आपलं जाळ टाकलं! मोठ-मोठे मासे त्याच्या गळाला लागले आणि त्यामुळेच त्याने आपलं बस्तान व्यवस्थित बसविले. आपल्या नातीच्या वयाच्या मुलींची अब्रू या खरात बाबाने लुटली. गरोदर स्त्री देखील त्याने सोडली नाही. आताच दूरदर्शन वर सांगितले, की  त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षी त्याने, त्याच्याच कुटुंबातील, त्याच्यापेक्षा कित्येक वर्षे मोठ्या असणाऱ्या स्रीवर अत्याचार केला! मुलाचे पाय पाळण्याच दिसत होते तर! तेव्हाच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असता, आणि या सापाला तो लहान असतानाच ठेचला गेला असता, तर आज त्याचा एव्हढा मोठा अजगर झाला नसता. त्याची ताकद वाढून त्याचा विळखा एव्हढा घट्ट झाला नसता. 
ज्या महिलांवर अत्याचार झालेला आहे, त्या महिला आणि मुली या भोंदू बाबापेक्षा कित्येक पट जास्त शिकलेल्या आहेत. मग मला प्रश्न पडतो की, या मुली आणि स्त्रिया त्या बाबाच्या आहारी गेल्याच कशा? त्याच्या भूलथापांना या महिला भुलल्याच कशा?  एकदा कळाले की, तो एव्हढा 'स्री लंपट' आहे, तरी पुन्हा पुन्हा त्याच्या कडे या महिला गेल्याच कशा? का  सगळ्यांसाठीच बाबाने तशी परिस्थिती निर्माण केली होती की, त्यांनी पुन्हा-पुन्हा आपल्याकडे याव? महिलांसाठी 'साड्यांच्या सेल' जर एखाद्या काना-कोपऱ्यात लागला, तरी त्याची बातमी सगळ्या गावभर, संध्याकाळ पर्यंत होऊन जाते. मग या बाबाची, तो 'भोंदू आहे, म्हणून बातमी का पसरली नाही? वर्षानुवर्षे बाबा महिलांवर अत्याचार करीतच राहिला. बाबा लाख लंपट असेल हो! पण बाबा काही प्रत्येकीला घरी बोलवायला गेला नव्हता! सगळ्याच आपण होवून, त्याच्या दारात गेल्या होत्या, त्याची पायरी चढल्या होत्या. त्या कशासाठी त्याच्याकडे जात आहेत , ह्याच भान त्याच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक स्रीला होत. 'एव्हढे शिक्षण घेऊनही अशा अंधश्रद्धांवर स्त्रियांचा कसा विश्वास बसतो?'  हे मला पडलेले खूप मोठ कोड आहे.  या स्त्रियांना अशी कोणती समस्या निर्माण झालेली होती की, हा भोंदू बाबा ती चुटकीसरशी सोडवून देणार होता? या स्त्रियांना या समस्या सोडविण्यासाठी कोणी डॉक्टर, मनसोपचार तज्ञ, समुपदेशक नाही दिसले का? का या बाबामध्येच हे सर्व दिसले? 
आमच्या अशिक्षित बहिणाबाईंना कितीतरी वर्षापूर्वी हे कळाल होत की, "नहीं  नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या"  त्या या स्रीयांसारख्या हात दाखवायला, भविष्य पाहायला, कोठे गेल्याही नव्हत्या, पण आपणहोवून दारी आलेल्या ज्योतिषाला त्या ठणकावून सांगतायेत, 
 'नको नको रे ज्योतिषा, 
नको माझा हात पाहू, 
माझं दैव माले कये, 
माझ्या दारी नको येऊ' 
जे या अशिक्षित स्रीला, कित्येक वर्षापूर्वी  कळाल होत की, ज्योतिष, भविष्य वगैरे अस काही नसत, ते या उच्च शिक्षित महिला वर्गाला का कळू नये?  बहिणाबाईंवर काय कमी संकट असतील. शिक्षण नाही, नवरा गेलेला, पदरी दोन मूल! खाण्याची भ्रांत! त्या ज्योतिषाकडे जाण तर लांबच, पण दारी आलेल्या ज्योतिषाला झिडकारून लावतायेत , हाकलून लावतायेत, परत माझ्या दारी येऊ नको म्हणून ठणकावून सांगतायेत. त्या अशिक्षीत स्त्रीला कळतंय की, माझं कर्म म्हणजे माझं नशीब! मी माझ्या कर्मानेच माझं नशीब घडवू शकते, माझा भविष्यकाळ माझ्या कर्मानेच उज्वल होणार आहे. आणि या आजच्या काळातील आधुनिक, सुशिक्षित स्त्रियां अशा भोंदू बाबाकडे, स्वतः च नशीब पाहायला जातायेत, स्वतः चा भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी त्याचा आधार घेतायेत. आणि तो यांना कसला आधार देणार आहे? तो तर बोट हातात आल तर मनगट पकडणारा भोंदू बाबा आहे! तो यांचा तारक नाही तर मारक होता. पण त्या वेळी या महिलाना हे कस कळाल नाही? खरं म्हणजे स्री ही जात्याच चाणाक्ष असते. तिला समज आल्यापासून तिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाची नजर तिला कळते. कोणत्या पुरुषाला किती अंतरावर ठेवायचे, हे तिला कळत.  मग भोंदूबाबाच्या बाबतीतच या महिलांची मती अशी का मारली गेली असावी? बर एकाच स्त्रीची नाही, अशा किती तरी स्त्रिया त्याच्या वासनेला बळी पडल्या. अशा कोणत्या संकटांनी या स्त्रीयांना घेरल होत?  आणि या  संकटातून हा भोंदूबाबा त्यांना तारून नेणार होता?  तीन-चार वर्षाच्या मुला-मुलींना चॉकलेट देऊन भुलवाव, बळी पाडाव , तसाही हा प्रकार नव्हता! सर्वच स्त्रिया सज्ञान आहेत, सधन आहेत. आपल्यासोबत येणाऱ्या पुरुषाला हा वासनांध बाबा, जेव्हा बाहेर बसवितो आहे, आपल्या एकटीलाच भेटायचे म्हणतो आहे, तेव्हा तरी सोबत आलेल्या पुरुषाला आणि या स्रीलाही काहीच कसा संशय आला नाही ?  बर यापूर्वीही असे भोंदू बाबा होऊन गेलेच होते की,  नित्यानंद महाराज, आसाराम बापू, राम रहीम, रामपाल स्वामी ,ही न संपणारी यादी आहे. फक्त ही काही ताजी उदाहरणे आहेत. आता एक-एक करत सगळी बळी पडलेली, फसवली गेलेली मंडळी पुढे येत आहेत. पण पहिल्याच स्रीने जर या गोष्टीला वाचा फोडली असती, आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी ती न्यायालयात, पोलिस स्टेशन मध्ये गेली असती, तर या भोंदू बाबांची एव्हढी हिंमत वाढली नसती. 
का आपल्याकडची न्याय व्यवस्थाच अशी आहे की, न्याय मागणाऱ्याला त्या व्यवस्थेची भीती वाटते? का आपलीच चुकी आहे,  'आपण या बाबाकडे गेलो' , म्हणून या सर्व स्त्रियां  मूग गिळून गप्प बसल्या? एव्हढी चूक कळत होती तर पुन्हा-पुन्हा त्या बाबाकडे का जात होत्या? आणि या चक्रव्युहामध्ये का अडकत होत्या? काहीच समजत नाही. मात्र याचा फायदा या भोंदू बाबाने पुरेपूर उचलला. भरपूर माया जमविली, अधिकाधिक स्त्रियाना तो त्याच्या जाळ्यात ओढत राहिला. आपली वासना शमवित राह्यला. आपले गुन्हे उघडकीस येऊ शकतच नाहीत, म्हणून त्याचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्याचा अपप्रचार होण्याऐवजी प्रचारच वाढला. हे अशोक खरात प्रकरण अजून चालूच आहे, त्याच्यावर अजून गुन्हे दाखलच होत आहेत, तोपर्यंत पुण्याचा भोंदूबाबा वैद्य, नगरचा एरंडे.... हे यादीत जोडले जात आहेत. यादी मोठी होतच आहे. संकटांपेक्षाही, संकटे सोडविणारे जास्त तयार होत आहेत की काय, अशी शंका आता येऊ लागलेली आहे. समाजाला आतूनच किड लागत आहे. मनःशांती हरवून, प्रामाणिकपणे कष्ट  करण्याचे सोडून,भलत्याच दिशेने समाज भरकटत चाललेला आहे. भूलथापांना बळी पडत चालला आहे. थापा मारणारे कितीही असू देत, आपण का त्याच्यावर विश्वास ठेवायचा? समाजात चोर काय कमी असतात, तरीही आपण त्यांच्यापासून काळजी घेतोच ना? हे ढोंगीबाबा म्हणजे चोरांच्याही वरचा कळस आहे. दिवसाढवळ्या दरोडा टाकणारे हे लुटारू, दरोडेखोर आहेत. हे फक्त तुमचा पैसाच लुटत नाहीत, तर तुमच्या आया-बहिणींची अब्रू लुटत आहेत, त्यांना देशोधडीला लावत आहेत, हे आम्हाला समजणे खूप महत्त्वाचे आहे, आमचे डोळे उघडणे महत्वाचे आहे. 
आज संपूर्ण समाजात, सुसंगत तत्वज्ञानाची बैठक सोडून, उथळ विचारांना थारा मिळू लागलेला आहे. कमी श्रमात, कमी कष्टात, कमी वेळेत श्रीमंत व्हायची लालसा सगळीकडेच निर्माण झालेली आहे.  आणि म्हणूनच हे बुवाबाजीचे पिक फोफावले आहे. याला आम्हीच खतपाणी घालून मोठे करीत आहोत. या साऱ्या प्रकरणामध्ये 'ढोंगीबाबा जेव्हढे जबाबदार आहेत, तेव्हढेच आम्ही देखील जबाबदार आहोत' हे कटू सत्य आम्हाला पचवावेच लागेल.
समाजाला या गर्तेतून बाहेर काढणारे समाज सेवक तयार व्हायला हवे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन करणारे नाट्य, पथ नाट्य, चित्रपट यांची निर्मिती व्हायला हवी आहे. समाज प्रबोधनाद्वारे समाजाचे प्रबोधन व्हायला हवे आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा  ह्यांच्यातील फरक ओळखता यायला हवा आहे, विशेष करून स्त्रीयांना! त्यासाठी स्त्रियांनी स्वतः च सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे. कायम तुमच संरक्षण करायला घरातील पुरुष मंडळी बरोबर राहीलच याची खात्री नाही. तेव्हा स्वतः आत्मनिर्भर बना. स्वतः ची शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवा. काहीही विपरीत दिसले, घडले तर त्याचा प्रतीकार करायला सज्ज व्हा. पुरुषांनीही गावागावातून अशा भोंदू बाबांना प्रवेश नाकारायला हवा आहे. यांच दुकान चालणारच नाही, अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे. समाजातील सजग नागरिकांनी आपल्या भोवताली असा कोणी भोंदू बाबा तर राहत नाही ना? आपल्या आजुबाजूच्या स्त्रियात्याच्या भूलथापाना , बुवाबाजीला बळी तर पडत नाहीत ना? याचा कानोसा घेतला पाहिजे. 
समाज फक्त शिक्षीत नाही तर अंतर्बाह्य सुशिक्षित, सुसंस्कारीत व्हायला हवा आहे. मग भोंदूबाबाला गिऱ्हाईक मिळणे तर लांबच, पण असे भोंदूबाबाच तयार होणार नाहीत! अशी समाजव्यवस्था निर्माण व्हायला हवी आहे. 
आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर 'तो सोन्याचा दिवस नक्कीच येइल '.

सौ. मंदा सतीश वाडेकर 

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १