हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १
लहानपणापासूनच मला पाणी आवडायचं. मग ते पावसाच असो, की नदीचं! अजूनही मी पाऊस चालू असताना मुद्दाम गच्चीवर जाऊन भिजून येते. झाडांना पाणी देताना, ' मी पाणी पाणी खेळते आहे' असच म्हणते! आणि त्यात खोटे असे काहीच नाही. पूर्ण कपडे पाण्याने भिजले की, मला झाडाना पाणी पाजल्याच समाधान वाटत! मग तो हिवाळा असो की उन्हाळा.
समुद्राच पाणी बाकी मला बरेच दिवसपर्यंत माहिती नव्हतं! समुद्राच्या लाटांचा आनंद मी वयाच्या अठरा एकोणिसव्या वर्षापर्यंत कधी घेतला नव्हता! तेव्हा टीव्ही नव्हते, त्यामुळे समुद्र पाह्यला तो फक्त चित्रात! आणि प्रत्यक्ष समुद्र पाह्यला तो ताईचे लग्न झाले आणि ताई बदलापूरला राहायला गेली त्यानंतर!
पण जेव्हा जेव्हा मी पाणी पाहते, तेव्हा तेव्हा त्या पाण्याला स्पर्श करावा, पाण्यात पाय सोडून बसावे, पायाने पाणी उडवावे, ही इच्छा कायम माझ्या मनात निर्माण होत असते. नदीच्या पुलावरून गाडी जाताना देखील प्रत्येक वेळी, 'थोडस खाली उतरून पाण्यात पाय सोडून बसू या का!' असा खट्याळ विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आम्ही समुद्र किनारी फिरायला गेलो की, तासनतास समुद्राच्या पाण्यात मी आणि पारस बसून राहत असू आणि अजूनही मी समुद्रात इतरांच्या मानाने खूप जास्त वेळ बसते. म्हणूनच लक्षद्वीपला स्मिता मला लाडाने 'पाणकोंबडी ' म्हणायची!
अंदमानला सी वॉक करताना, स्नोकलिंग करताना आपल्याला पोहता यायला हवे, हे प्रकर्षाने जाणवले. पण ऑफिस आणि इतर कामाच्या व्यापामुळे ते शक्यच होत नव्हते. शिवाय मालेगांव सारख्या गावात लेडीज साठी स्विमिंग पूल कोठे मिळणार, ह्याची कल्पना नव्हती. परंतु गेल्या वर्षी महिला दिना निमित्य जिमच्या मुलींनी Aspire acadmy मध्ये क्रिकेट टूर्नामेंट घेतली. त्याचे सर्व व्यवस्थापन, educare school ची प्रिन्सिपॉल आणि माझी मैत्रीण वैशाली जैन मॅडमने केले होते. तेथे मी अद्ययावत स्विमिंग पूल बघितला आणि आपण येथे स्विमिंग शिकू शकतो, असा विचार पक्का केला. स्विमिंग शिकण्याचे बीज तेव्हाच मनात पेरले गेले. बर ही अकॅडमी आमच्या घरापासून बऱ्यापैकी जवळ होती म्हणजे अक्षरशः एक-दीड किलो मीटर अंतरावर होती! पण तरीही स्विमिंग शिकण्यासाठी मुहूर्त मिळेना! ऑफिस, जिम, बागकाम आणि घरकाम करता करताच दमछाक होत होती. पण मागच्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि जानेवारी महिन्यात आम्ही लक्षद्वीप येथे जाऊन आलो, तेथे स्कुबा डायव्हिंग केले. पुन्हा एकदा स्विमिंग शिकण्याची इच्छा तीव्र होऊ लागली. आता हातात थोडा का होईना पण वेळ होता. लक्षद्वीप येथून मालेगांव येथे आल्यानंतर स्विमिंग शिकण्याच्या संधीची मी वाट पाहत होते. अजून थंडीही बरीच होती. त्याच सुमारास योगायोगाने चार- पाच मैत्रिणी 'आपल्या घट्ट मैत्रीच्या जोरावर' जिम मध्ये आल्या. त्या सर्व मुली हिवाळा सोडून, रोज स्विमिंगला Aspire acadmy मध्ये जात होत्या. त्यात भावना निकम, वैशाली आणि पूनम बच्छाव या दोघी जावा आणि पल्लवी अहेर ह्यांचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, नव्हे त्यांची मी खरोखरच स्विमिंग शिकण्यासाठी खूप-खूप ऋणी आहे. त्यांचा खूप मोठा हातभार माझ्या या स्विमिंगच्या प्रवासात आहे. त्यांच्यामुळेच माझ्या मनात असलेली स्विमिंगची ही सुप्त इच्छा पुन्हा प्रकट झाली आणि माझे पोहण्याचे स्वप्न साकार झाले.(अजून झाले नाही, पण नक्की होणार👍). 'थंडी संपली की, तुम्ही दोन मार्च पासून स्विमिंग पूल मध्ये या, आम्ही आहोतच. कोच अजून जरी आले नसले तरी आम्ही तुम्हाला शिकवून देऊ!' अस म्हणून कोठेही विकत न मिळणारा, पण बहुमूल्य असा 'आत्मविश्वास' मला या माझ्या 'टीचर कम फ्रेंड्स' ने दिला. नाहीतर साठी उलटल्यानंतर पोहोणे शिकणे, म्हणजे जरा अशक्यच गोष्ट होती. पण मी तयारच होते, मला 'पुश ' मात्र या माझ्या मैत्रिणींनी केले. अजूनही खूप मोलाचं मार्गदर्शन त्या मला सतत करीत असतात, त्याच नाही तर आता सर्वच माझ्या अनुभवी मैत्रिणी मला छोट्या छोट्या टिप्स कायम देत असतात. त्या सर्व मैत्रिणींचे मी मनापासून आभार मानते🙏.
तरीही कोच शिवाय स्विमिंग पूल मध्ये उतरण्याची मला भीती वाटत होती. स्विमिंग साठी काय-काय तयारी लागते, हे सांगण्यासाठी या माझ्या मैत्रिणी होत्याच. अजून पोहण्याचा हंगाम सुरू व्हायला अवकाश होता आणि मला स्विमिंग शिकण्याची खूपच उत्सुकता होती, खूप घाई झालेली होती. दोन-तीन वेळा Aspire acadmy मध्ये जाऊन, मी कोच केव्हा येणार म्हणून चौकशी करून आले. स्विमिंग साठी लागणाऱ्या वस्तूंची, म्हणजे टोपी, गॉगल, इयर प्लग वगैरेची खरेदी करून आले. घरी बाकी याची खबर बात बिलकुल नव्हती. इतर विद्यार्थी यायला अजून अवकाश असल्यामुळे, कोच अजून काही दिवस उपलब्ध होणार नव्हते. पण वैशाली जैन मॅडमची अकॅडमी मध्ये ओळख होती, कोच साठी त्यांनी फोन केला. त्यामुळे माझ्या एकटीसाठी कोचची व्यवस्था करण्यात आली. आणि शेवटी एक मार्चला रात्री मी ह्यांना, "मी उद्या स्विमिंग क्लासला जाणार आहे," म्हणून सांगितले आणि दोन मार्चला सकाळीच सहा वाजता स्विमिंग क्लासला हजर झाले! अजूनपर्यंत मी फक्त दोन वेळाच स्विमिंग पूल मध्ये उतरले होते. एकदा शिरपूरला आणि एकदा मैत्रिणीबरोबर ट्रिपला गेले होते तेव्हा! स्विमिंग शिकण्यासाठी मात्र प्रथमच पूल मध्ये उतरत होते. स्विमिंग शिकण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सकाळी साडेचार पावणे पाचला उठून सासूबाई आणि ह्याचं चहापाणी करून (आणि मी काय चहा सोडते की काय? मी पण चहा घेतलाच ) पावणेसहालाच अकॅडमीकडे गेले. मनात जेव्हढी उत्सुकता होती, तेव्हढीच भीती देखील होती. आपल्याला हे जमेल की नाही. आपलं 'हस ' तर होणार नाही ना! या वयात आपण पोहणे शिकतोय, शरीराची साथ म्हणावी तशी नाहीये. स्पॉन्डलिसिस आहेच, ऑस्टोपोर्सिस, थायरॉईड , संधिवात, ब्लड प्रेशर सगळे आजार आहेतच. टाचेचे हाड वाढले म्हणून टाचेत नुकतंच इंजेक्शन घेतलेलं! कस शिकणार मी स्विमिंग? नको नको तेथे मन धावत होत. पण मानसिक ताकद बाकी प्रचंड होती. आणि ही ताकद तुमच्याकडे असेल तर, अशक्य तेही शक्य होऊन जात. इथे तर माझ्या 'उत्साही मैत्रिणी' सोबत होत्या. कोच येणार होतेच! त्यामुळे माझं शिकणं नक्कीच यशस्वी होणार होत ! प्रथम स्विमिंग पुलाच्या पायरीला नमस्कार केला, 'मला यशस्वी होऊ दे' म्हणून त्याला साकड घातले आणि पुलामध्ये पहिले पाऊल टाकले! माझ्या या सर्व मैत्रिणी देखील आलेल्या होत्याच. त्यांनी मला प्रथम पाण्यात चालण्यास सांगितले. थोड्याच वेळात 'ओम' नावाचे माझे कोच देखील आले. गुरू वयाने लहान असो किंवा मोठा असो 'गुरू तो गुरुच असतो!' यात शंकाच नाही. आणि अगदीच तुलना करायची झाल्यास माझ्या वयाच्या हिशोबाने हे गुरु म्हणजे 'ओम सर' माझ्या मुलापेक्षा कितीतरी लहान असतील! ते येताच, मी त्यांना पाण्यातूनच हात उंचावून ' हो सर मीच तुमची विद्यार्थिनी आहे ' चा इशारा केला. कारण टोपी, इयर प्लग घालून मला काहीच ऐकू येत नव्हते (अजूनही पोहण्याचा हा साज चढविला की खरच काही ऐकू येत नाही). कधी अशा वस्तू वापरण्याची मला सवय देखील नव्हती. पाहिल्या दिवशी तोंडाने श्वास घेऊन, पाण्यात चेहरा आणि मान टाकून, तो श्वास सोडण्यास ओम सरांनी मला सांगितले. थोडक्यात 'बब्बल्स' सोडायला लावले. आपण बाहेर कधीच तोंडाने श्वास घेत नाही. परंतु नुकतंच लक्षद्वीपला स्कुबा डायव्हिंग झाल्यामुळे, चेहरा पाण्यात टाकणे आणि तोंडाने श्वास घेणे, एव्हढे अवघड वाटले नाही. श्वास घरून ठेवणे बाकी जमत नव्हते. मुळातच मी शॉर्ट ब्रिथींगच्या समस्येने त्रस्त आहेच. त्यात तो जास्तीत जास्त वेळ धरून ठेवायचा, म्हणजे माझ्यासाठी दिव्यच होते. प्रथम पूर्ण चेहरा पाण्यात टाकायला खरोखरच भीती वाटते. त्या दिवशी तोंडाने पूर्ण श्वास भरून घेऊन, पाण्यात चेहरा टाकायचा आणि पाण्यातच नाकाने श्वास सोडायचा, एव्हढीच प्रॅक्टिक्स करायची होती. दुसऱ्या दिवशी सरांनी पायात आणि हातात फ्लोटर देऊन फ्लोट करायला लावले. अजूनपर्यंत माझे पाय कायम जमिनीवरच होते🤪, म्हणजे त्यांना कसला ना कसला आधार देऊनच मी उभे राहिलेले होते. ते घेऊन पूर्ण शरीर असे अधांतरी ठेवायचे, म्हणजे बऱ्यापैकी कठीण होते. फ्लोटर मुळे बॉडी लगेच वरती येत होती, पण श्वास घेण्यासाठी जेव्हा उभे राहायचे आहे, तेव्हा बाकी खूप अवघड जात होते. दोन-तीन वेळा पाण्यात चांगल्या गटांगळ्या खाल्ल्या. नाका तोंडात पाणी गेले. कधी बाजूचा रॉड पकडून, तर कधी सरांचा हात पकडून उभे राहिले. स्विमिंग पुलाचा काठ/किनारा बाकी सोडलाच नाही. काठ सोडून थोड आतमध्ये जायला खूप भीती वाटत होती. तस पाह्यलं तर पाणी तेथेही कमीच होते, पण रॉड आणि सर आधारासाठी कायम माझ्या जवळच असावेत, असे मला सारख वाटत होत. मी एकटीच विद्यार्थिनी असल्यामुळे सरांचे पूर्ण वेळेचे 'कोचिंन ' मलाच मिळत होते. त्याचा मला निश्चितच फायदा होत होता. सरांनी काठ सोडण्यासाठी खूप विश्वास दिला, पाणी चार -साडेचार फूटच आहे, तुम्ही बुडणार नाहीच आणि काही झालं तर मी आहेच. पण मी किनारा सोडून आत जायला तयार झालेच नाही! त्या दिवशी मी खूप चुका करत होते. पण तरीही ओम सर आणि माझ्या मैत्रिणी मला ' तुम्ही खूप छान शिकत आहात, तुमची गतीपण चांगली आहे, आकलन शक्ती पण चांगली आहे, तुम्ही लवकर शिकाल!' वगैरे वगैरे म्हणून मला प्रोत्साहन देत होते. आणि असच प्रोत्साहन ते आजपर्यंत देत आहेत, माझी स्तुती करत आहेत आणि माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम निर्माण करीत आहेत. त्यामुळेच पोहणे शिकणे मला शक्य होईल अशी खात्री हळूहळू येऊ लागलेली आहे.
पोहणे आल्यानंतर, 'पोहायला कसे शिकावे' ', 'पोहणे कसे असावे ' हे सांगणे, पोहण्याबद्दल माहिती सांगणे, सूचना देणे खूप सोपे आहे, (मी पण तेच करणार आहे) आपण आता 'यू ट्यूब ' वर खूप सारे व्हिडीओ देखील पाहतो. ते सगळ आणि सगळ खर आहे. पोहणे ही गोष्ट काही पाहून-पाहून आणि ऐकून-ऐकून येण्यासारखी नाहीये. त्यासाठी तुम्हाला स्वतः च हात पाय मारावे लागतात. जो पोहायला शिकतो, नव्हे प्रत्येक जण जेव्हा पोहायला शिकत असतो, तेव्हा आणि त्याच वेळी त्याला कळते की, पोहणे किती कठीण आहे ते! किंबहुना पोहणे आल्यानंतरच आपल्याला असे वाटत असावे की, एव्हढी सोपी गोष्ट, आपण विनाकारणच अवघड करून घेत होतो, जास्तीचा त्रास आणि जास्तीची ऊर्जा खर्च करत होतो. पोहणे तर खूप सोपे आहे! परंतु पोहणे शिकण्याचे आपले दिवस प्रत्येकाने आठवून बघावे, आपल्या एकेक चुका, एकेक गटांगळ्या आठवून बघाव्या. नाका तोंडात गेलेलं स्विमिंग पुलाचं पाणी आठवून बघावं! तेव्हा मी सांगते आहे ते आपणास खरे वाटेल. माझ्या सुदैवाने मला चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, चांगले कोच मिळाले "आम्हालाही असच होत होत, आम्हाला हे शिकायला खूप दिवस लागले, तुम्ही त्या मानाने लवकर शिकतायेत. आम्ही खूप पाणी प्यालो स्विमिंग पुलातील! " असच नेहमी म्हणत होते. त्यामुळे माझी गती कमी आहे किंवा मी खूप चुका करीत आहे, अस मला वाटले नाही. थोडक्यात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड आला नाहीं.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी पायातील फ्लोटर काढून, फक्त फ्लोटिंग पॅड वापरून, बॉडी बऱ्यापैकी फ्लोट झाली आणि चौथ्या दिवशी तर फ्लोटर काढून बॉडी मस्त फ्लोट होऊ लागली. त्या दिवशी फ्लोटिंगचीच प्रॅक्टिस केली. कोच सहित सगळ्यांनाच आश्चर्य वाटले, मी एव्हढ्या लवकर कशी काय फ्लोट होऊ लागले म्हणून! मला तर केव्हढा आनंद झाला म्हणून सांगू! 👍आपण पाण्यावर कोणत्याही आधाराशिवाय तरंगू शकतो, ही कल्पनाच किती रमणीय आहे! बस मी त्या दिवशी हवेत नाही, पण पाण्यावर बाकी नक्कीच तरंगायला लागले! आणि पाण्यावर तरंगायला लागले, म्हणून हवेत तरंगायला लागले!
पाचव्या दिवशी सर आलेले नव्हते. म्हणून फक्त चार दिवस केलेल्या गोष्टींचा आणि जास्त करून फ्लोटिंगचाच सराव केला. तसही रोज सकाळी प्रथम आल्या आल्या, मी पहिल्या दिवसापासून जे जे करत होते, त्याचा सराव करून, मगच पुढची प्रॅक्टिस करत होते.
सहाव्या दिवशी सरांनी ' किकिंग ' करायला सांगितले. किकिंगचे व्हिडीओ मी बरेच बघितले होते, पण प्रत्यक्षात जेव्हा किकिंग करायची वेळ आली, तेव्हा खरोखरच 'नानी सपनात ' आली. केव्हा पाय गुढघ्यात वाकणार, तर केव्हा पायाचा पंजाच काटकोनात राहणार! आणि लगेच पाण्यात गटांगळ्या खाणार! खूपच फजिती होत होती! आपण किकिंग साठी खूप वेळ घेणार, हे माझ्या तेव्हाच लक्षात आले, पण शिकायचं ठरविलेच आहे, तर पर्याय नाही! सात , आठ, नऊ... दहा .. चौदा पंधरा दिवस झालेत, माझी आपली किकिंगचीच प्रॅक्टिस चालू! आणि तरीही सरांचे आणि माझेही समाधान नाही. खूप चुका, खूप गटांगळ्या! एखादा विद्यार्थी नापास होतो, मार्च -ऑक्टोबर, मार्च ऑक्टोबर करतो, पुन्हा नापास होत जातो आणि परीक्षा देत राहतो, पण आपल्याला पास व्हायचं आहे, ही जिद्द कायम ठेवतो, प्रामाणिकपणे अभ्यास करतो. तसच मी देखील रोज सकाळी पाण्यात उतरले की, थोड चालणे, फ्लोट करणे, बब्लिंग करणे, हे सगळ झाले की, किकिंग किकिंग आणि किकिंगच करायचे! त्याच गटांगळ्या, तेच पुन्हा पुन्हा रॉड पकडणे, किकिंग करतांना गुढघ्यात वाकणे चालू! कळत होत, पण वळत नव्हतं! कदाचित प्रत्येक सरावा नंतर सुधारणा होता असेलही, पण ते मला लक्षात येत नव्हते. मी न कंटाळता, कितीही थकले तरी, कितीही दम लागला तरी, सराव चालूच ठेवला. पहिल्या आठवड्यात असणारी, माझी गती एकदम स्तब्ध झाली, दोन पावलं पुढे आणि लगेच मागे अशी दोलायमान अवस्था त्या 'पोहणे शिकण्याच्या' प्रगतीची होत होती. पुढे जायचे चिन्ह दिसेना. सर पुन्हा पुन्हा रॉड पासून दूर जायला सांगत होते, पण कसलं काय? मी रॉडची संगत सोडतच नव्हते. सरही मनात म्हणाले असतील, कसली ' ढ' विद्यार्थिनी मिळाली मला! माझा त्यात काहीच दोष नव्हता, ते सरांचे नशीब होते🤪
आता सरांशी पण चांगली ओळख झाली होती, इतर मैत्रिणीही मिळाल्या होत्या. स्विमिंग शिकण्यासाठी अजून एक नुकतीच बारावीची परीक्षा दिलेले 'जान्हवी ' नावाची मुलगी सोबत मिळाली. ती माझ्या नंतर आली, तरी देखील खूप लवकर फ्लोटिंग आणि किकिंग करू लागली. पोहणे शिकणे या प्रकारात हेवा, तुलना नसतेच. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. शरीर रचना निरनिराळी असते. त्यामुळे मला जान्हवीचे कौतुकच वाटत होते. जान्हवी आता मला मागे टाकू लागली होती. सोळावा दिवस उजाडला! तो दिवस गुढी पाडव्याचा होता. सर म्हणाले तुम्ही दोघी म्हणजे मी आणि जान्हवी तिकडे 'डीप वॉटर ' कडे या. सर काय 'पाण्यात उडी टाकायला लावतात' की काय म्हणून भीती वाटू लागली. अजून आम्ही चार-साडे चार फूट पाण्यातच आडवे अंतर पार करण्यासाठी दोन ठिकाणी थांबत होतो. जान्हवी तरी एकदाच थांबत होती, मी तर कितीही प्रयत्न केला तरी एक थांब्यामध्ये पलीकडे पोहोचतच नव्हते. फक्त आता थांब्यावर पाण्यात उभे राहताना जरा सहजतेने उभे राहत होते. सरांनी फक्त शिडीने खाली उतरून, पाण्याची खोली किती आहे, ते पाहायला लावले आणि जीव भांड्यात पडला! थोडक्यात स्विमिंग पुलाच्या तळाला पाय लावायचे होते. एक पाय शिडीवर ठेवून, हाताने शिडी पकडून तळाचा 'ठाव ' लागत होता! सरांनी दोन्ही पाय लावायला सांगितले, त्या वेळी बॉडी फ्लोट होऊ लागली! पाय आपोआप वर येऊ लागले! जेव्हा बॉडी फ्लोट व्हायला हवी होती, तेव्हा ती होत नव्हती आणि आता जोर लावून खाली पाय ठेवायचा प्रयत्न केला तरी ते ठेवले जात नव्हते. पाण्याची सगळी गंमतच असते नाही? म्हणूनच ते जिवंत माणसाला पाण्यात बुडविते आणि मेल्यानंतर तरंगायला लावते!
दुसऱ्या दिवशी सरांनी आम्हा दोघींना परत डीप वॉटर कडे आणले आणि शिडीला पकडून, तुम्हाला जसे येईल तसे पाण्यात झोकून द्यायला सांगितले. खूप भिती वाटत होती. पण सरांनी, "मी आहे, ट्यूब आहे, रॉड पण आहेच," म्हणून धीर दिला, इतर सूचना समजावून सांगितल्या. शेवटी सरांनी कितीही सूचना आणि टिप्स दिल्या, तरी वेळेवर जे करायचं, जे व्हायच तेच होणार होते! भीती वाढत होती, 'पण भीतीमुळे, कृती करण्यासाठी जास्त वेळ घालविला की, नकारात्मकता अधिक वाढत जाते आणि ती गोष्ट आपण कधीच करू शकत नाही', हे अनुभवाने मला माहीत असल्यामुळे, मी लवकरच शिडीवर गेले, हात जोडले, मनातल्यामनात क्षणभरात त्या पाण्याला, समोरच्या उगवत्या सूर्याला आणि ओम सराना (जरी ते माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असले तरी ते माझे गुरू होते, गुरू साक्षात परब्रम्ह! ) नमस्कार केला. स्वतः ला पाण्यात झोकून दिले. मी अर्धेच अंतर पार करू शकते ह्याची मला पूर्ण खात्री होती, अर्ध्या अंतरानंतर पटकन रॉड पकडला, खूप घाबरले होते, दम लागला होता, पण सराना आणि मलाही खूप आनंद झाला होता. सर आता मला पूर्ण अंतर पार करायला सांगत होते, पण ते मला शक्य होणार नव्हते. मी पुलामधून वर येऊन गेले, पुन्हा प्रथमपासून प्रयत्न करण्यासाठी! शिडीवर गेले, पुन्हा उडी टाकली, या वेळी मध्ये थांबून पूर्ण अंतर कसेबसे पार केले. तिसऱ्या प्रयत्नात बाकी अर्ध्यापर्यंतच येत-येत दम सोडला आणि गटांगळ्या खाऊ लागले. सरांनी टायर दिला, काठी दिली, मी खूपच घाबरले होते. मला वर येण्यासाठी फक्त काहीतरी मदत हवी आहे, एव्हढच कळत होते, मी जीव मुठीत धरून पाण्याबाहेर आले. आता माझी ताकद पूर्ण संपली होती! मी थरथरत होते.
सर, आज मी डीप वॉटर मध्ये उडी मारली, म्हणून खूप कौतुक करत होते. ते मला आजपर्यंत माझे वय पन्नास वर्षापर्यंतच समजत होते. आज त्यांना मी माझे वय सांगितले. म्हणून त्यांच्या कडून होणाऱ्या कौतुकात अजून भर पडली. या वयात स्विमिंग शिकण्यासाठी इच्छा होणे, हेच खूप!
आता तीन-चार दिवस माझ्या स्विमिंग क्लासला सुट्टी द्यावी लागणार होती. कारण मी, चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जाणार होते. चार दिवसांच्या सुट्टीत, केलेली प्रगती विसरून तर जाणार नाही ना, अशी शंका वाटत होती. पण तेथून आल्यानंतरच काय विसरले ते कळणार होते.
शनिवार, रविवार आणि सोमवार तीन दिवसांचा गॅप गेला. परिक्रमेचा खूप थकवा आलेला होता. तरीही मंगळवारी सकाळीच स्विमिंग साठी गेले. बॉडी व्यवस्थित फ्लोट होत होती आणि किकिंग देखील येत होती, पण अजून स्टॅमिना वाढवायला हवा होता. आज सरांनी 'हॅण्ड मुव्हमेंट ' शिकविली. पाण्याच्या बाहेर हाताची व्यवस्थित हालचाल करता येत होती, पण पाण्यात शिरताच, हात थोडाही हलविता येत नव्हता; किंवा जो काय हलविता येत होता, त्याला कोणतीच लय नव्हती, शिस्त नव्हती. कमी पाण्यात देखील हात मारायचं प्रयत्न करताच गटांगळ्या खाल्ल्या, खूपच घाबरले होते. सर जवळच होते, म्हणून बरे झाले. आता रॉड सोडून जायचेच नाही असे ठरविले. आपण अजूनही फारच 'कच्चे' आहोत, ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. सरांनी पुल बॉय आणि फ्लोटर पॅड दिले, पण कसले काय. काहीही जमत नव्हते. एकदा फजिती झाल्यामुळे खूपच घाबरले होते. शेवटी पाण्याच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी गटांगळ्या खाल्ल्या नाहीत, पण एकदाही हाताची हालचाल समाधानकारकरित्या करू शकले नाही. आठ दिवसांपूर्वी आलेली उर्वशी नावाची मुलगी, कालच माझ्याबरोबर hand movement करायला शिकली आणि आज कोणत्याही आधाराशिवाय मस्त स्विमिंग करू लागली होती. तिचे कौतुक वाटत होते आणि स्वतः विषयी निराशा वाटत होती. हॅण्ड मुव्हमेंट मला जमते की नाही ? 'जमेल जमेल' म्हणून सरांसहित सगळे म्हणत होते, पण मी बाकी खूपच अस्वस्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी फक्त एक-दोन हात काही मारले नसतील, तरीही शोल्डर खूप दुखत होते. पाठीवर झोपायला त्रास होत होता. पण कुणाला सांगणार? शिकायची ओढ तर मलाच होती ना? मग आता सहनही मीच करायला हवे! टाकीचे घाव सोसावेच लागणार होते! मग देवपण नाही, पण पोहणे जमणार होते. आपल्याला उशिरा जाग आलेली आहे, म्हणून त्रास तर होणारच. पोहणे शिकण्याचं वय केव्हाच निघून गेल होत, आता तर 'पैलतीरी नेत्र' लावण्याचे दिवस सुरू झाले होते, आणि मी स्विमिंग पुलाच्या पैलतीरी पोहोचण्याची अपेक्षा आणि जिद्द करत होते!
अजून किती दिवस असा हातांच्या हालचालीचा सराव करावा लागणार, कल्पना नव्हती. आपण "हॅण्ड मुव्हमेंट' या गोष्टीसाठी पण खूप दिवस घेणार हे लक्षात आले होते. आता केवळ दोन किंवा तीनच हात मारता येत होते, पण केव्हा बोटे उघडलेली राहत होती, तर कधी हालचाल कशीही होत होती. येईल हळू-हळू म्हणून स्वतः च स्वतः चे समाधान करून घेत होते. अजून श्वासाचे गणित कठीण होते, त्यासाठी सुद्धा मला जास्तच वेळ लागणार, हे कळत होते. ' पोहणे ' हे प्रकरण वरवर दिसते, तेव्हढे काही सोपे नाही, हे पुन्हा पुन्हा प्रत्ययास येत होते. निराश होऊन चालण्यासारखे नव्हते. प्रयत्न करणे आणि सराव करणे एवढेच माझ्या हातात होते. बर हा सराव घरी करू शकत नव्हते, त्यासाठी स्विमिंग पूलच हवा होता. घरी फक्त रोज स्विमिंगचे निरनिराळे व्हिडीओ बघणे, एव्हढे एकच काम करू शकत होते. त्यामुळे स्विमिंगचे व्हिडिओ पाहण्याचा मी नुस्ता सपाटा लावला होता. माझ्या डोळ्यांपुढे कायम पाणीच पाणी दिसू लागले. झोपेसाठी डोळे बंद केले, तरी पाणी स्पष्ट दिसू लागले. हातापायांच्या हालचालीचा सराव मनातल्या मनात होऊ लागला! तो सराव बाकी एकदम आदर्श असे, पण पाण्यात जाताच, तो आदर्श सराव कोठे जात असे कळेना! केव्हा एकदा सकाळ होते आणि मी माझ्या मनातील पोहण्याची ही 'आदर्श हालचाल' करेन, अस मला होऊन जात असे. त्यामुळे मी पावणे-पाच वाजेचा अलार्म लावून ठेवत असे, पण अजूनपर्यंत एकदाही तो अलार्म मी वाजू दिला नाही! अलार्म वाजण्याच्या आतच मी उठून जात होते! एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे म्हणजे तो किती घ्यावा, ह्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते! मुलगा नापास होतो आहे, पण अभ्यास बाकी प्रामाणिकपाणे करतो आहे, असच माझं झालं होत! सकाळी उठण्याच्या बाबतीत, माझे मलाच कौतुक वाटत होते! पुला मध्ये उतरल्यानंतर रोजच चालणे, फ्लोटिंग, बब्बलिंग, किकिंग वगैरेचा सराव केला की, चार-पाच राऊंड मध्येच दमत होते. अजूनपर्यंत एका स्टॉप मध्ये आडवा पूलही क्रॉस होत नव्हता. तीन चार वेळा बाकी हात मारता यायला लागले होते! हात मारताना तोल पण सांभाळता येऊ लागला होता. त्यातच मी समाधान मानत होते. आज माझा स्विमिंग शिकण्याचा बाविसावा दिवस होता. सरांनी आम्हा चारही शिकणाऱ्या मुलींना पाण्याच्या बाहेर यायला सांगितले. आणि साधारण गळ्यापर्यंतच्या पाण्यात डाय मारायला सांगितली. डाय कशी मारायची तेही सांगितले. प्रथम हात, मग डोक आणि त्यानंतर बॉडी! पण कसलं काय, आम्ही चारीनी फक्त उड्या मारल्या! तांत्रिकदृष्ट्या कोणाचीच डाय बरोबर नव्हती, तरी सगळ्यांनी डाय मारली, हे ही आमच्यासाठी काही कमी नव्हते. बाकीच्या तिन्ही मुली पंचवीस-तीस वर्षांच्या आतील असतील, पण मी बाकी साठीची होते ना! तरीही चार-पाच डाय आम्ही प्रत्येकीने मारल्या.
मला एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते की, आम्हाला डाय कशी मारायची हे जेव्हा सर समजावून सांगत होते तेव्हा, इतर पटाईत मुली, आम्हाला डायच प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आपणहोवून पुढे आल्या. सरांनी आम्हाला फक्त तोंडी सूचना दिल्या, पण या मुलींनी आम्हाला डाय मारून प्रात्यक्षिक दाखविले, तिनी फक्त डायच मारून दाखविली अस नाही, तर आम्ही डाय मारत असताना, आमची फजिती झाली तर लगेच आम्हाला पकडायला त्या तेथेच रांगेत उभ्या राह्यल्या! तेथे उभे राहण्याचे त्यांना सरांनी पण आणि आम्ही पण सांगितले नव्हते, पण मोठ्या बहिणींनी लहान बहिणींची काळजी घ्यावी, तशा त्या थांबल्या. धन्यवाद पोहण्याच्या क्षेत्रातील आमच्या या सर्व ताई🙏 आता तर डीप वॉटर मध्ये गेले की, मला सवयच झाली आहे, जो समोर दिसेल त्याला "माझ्याकडे लक्ष दे", म्हणून हक्काने सांगायची! आणि मला खरोखरच कौतुक वाटत की, जिला सांगितले, ती आपलं स्विमिंग सोडून माझ्याकडे लक्ष देते. या आमच्या सर्व ताई , आम्हाल असेच प्रशिक्षण तर द्या, पण कायम संरक्षणही द्या. तुमची ही गोष्ट खरच मला खूप उल्लेखनीय वाटते🙏. ही शिकवण आम्ही भविष्यात कायम अमलात आणू👍 भविष्यात पोहणे शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींना तुमच्या सारखेच वागून, तुमच्या गुरु ऋणातून कायम मुक्त होण्याचा प्रयत्न करू🙏.
त्या दिवशी डाय मारून म्हणा, किंवा जास्त हात चालवून म्हणा, माझं शोल्डर खूपच दुखत होत. पण दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे आराम होऊन जाणार होता.
परत सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजता जाऊन, दोन round पाण्यात चालणे, बब्बलिंग करणे, किकिंग करणे, आणि नंतर सर येईपर्यंत, किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंट करत स्विमिंगची प्रॅक्टिस चालू ठेवली. हे round किती होत होते, ते मी आता मोजत नव्हते, पण अजूनही मध्ये दोन वेळा थांबावेच लागत होते. थोडक्यात दम टिकत नव्हताच. जेष्ठ आणि श्रेष्ठ मुली मला पोहताना पाहून, माझ्या कोणकोणत्या चुका होत आहेत, हे मला आपण होवून सांगत होत्या, त्यामुळे सुधारणा होत होती. सर आल्यानंतर सरांनी, आज परत काल मारल्या होत्या, तेथूनच आम्हा तिघी-चारीना पुन्हा पुन्हा डाय मारायला लावली. डाय केव्हा खूपच चांगली जमत होती, तर केव्हा थोडीफार चुकत होती. डाय मारल्यानंतर संपूर्ण अंतर पोहून जाणे शक्य होत नव्हते. पाय खाली टेकले जात असले तरी, एव्हढ्या खोल पाण्यात मी अजून पर्यंत कधी जात नव्हते, तेव्हढ्या पाण्यात कधीच पोहण्याचा सराव करत नव्हते. त्यामुळे थोडी भीती मनात होतीच. पण डाय मारताना बाकी मजा वाटत होती. पाण्यात असणाऱ्या माझ्या मैत्रिणी, आणि वरती सर, खूपच प्रोत्साहन देत होते. त्यामुळे अजूनच प्रगती होत होती. आज मी खूप वेळ आणि खूप समाधानकारक डाय मारल्या, म्हणून मी माझ्या वरच खुश झाले होते 😊
आता मला स्विमींग सुरू करून जवळ-जवळ एक महिना होण्यात आला होता, पण अजूनही कधी-कधी मी गटांगळ्या खात होते. किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंटचा सराव रोज चालू होता. डाय मारणेही चालूच होते. डाय मारली की, दम निघून जात होता. पुढे पूर्ण अंतर कापणे शक्य होत नव्हते. सर पुन्हा पुन्हा पूर्ण अंतर पार करण्याचा आग्रह करीत होते, पण मला ते शक्यच होत नव्हते. इतर मुली, म्हणजे पूजा, उर्वशी आणि जान्हवी डाय मारल्यानंतर ते संपूर्ण अंतर पोहून, पार करत होत्या.
एक एप्रिलला सरांनी पुन्हा डीप वॉटर कडे नेले. सगळ्यांनी तेथेही पूर्ण अंतर पार केले, पण मी बाकी अर्ध्या अंतरापर्यंतच दम सोडून दिला! मला अजून खूप स्टॅमीना वाढवायला हवा होता. पण त्यासाठी काय करायला हवे, हे समजत नव्हते. रोज एव्हढा सराव करून देखील स्टॅमिना वाढण्याची चिन्ह दिसत नव्हती. किती दिवसपर्यंत मी अशी अर्धाच पूल पार करणार होते, माहीत नव्हते. पूजाने तर आज डीप वॉटर कडून निघून उभा पूल पार केला होता. मला तिचे खूपच कौतुक वाटत होते. ती खूपच लवकर पोहायला शिकली होती. ब्रिथींग साठी देखील मला खूप वेळ लागणार होता. पण त्या अगोदर हेच व्यवस्थितरित्या करता यायला हवे होते. विनाकारण घाई करण्यात अर्थच नव्हता.
आता मला डाय खूपच चांगली मारता येत होती. डाय मारल्यानंतर मी थोडे पोहून पण जाऊ लागले होते, पण पूर्ण अंतर पार करण्यासाठी दोन ठिकाणी थांबावे लागत होते. उथळ पाण्यात बाकी आता शक्यतोवर एकच थांबा घेत होते. आज महिन्याभरात झालेली ही सर्वात मोठी प्रगती होती. कारण अजून एकदाही उथळ पाण्यात मी एका स्टॉप मध्ये पोहोचले नव्हते. आज ते झालं होत. आता माझं उद्दिष्ट मला नॉन स्टॉप जाण्याचं ठेवावं लागणार होत. एका स्टॉप साठीच मी किती वेळ घेतला होता! आता नॉन स्टॉप साठी किती दिवस लागतील ?
सर, केव्हा-केव्हा डीप वॉटर कडे घेऊन जात होते, दोघी जणी नॉन स्टॉप पूल पार करत होत्या, मी बाकी अर्ध्यातच पॅनिक होऊन पुलाच्या बाहेर येत होते. वर येताना देखील एव्हढी घाई करत होते, की चढताना माझ्या गुडघ्याला चांगलाच दनका बसत होता, पण मला वरती यायची प्रचंड घाई होत होती. आज सरांनी डीप वॉटर मध्ये वॉटर ट्रेडिंग करायला सांगितले, परतू, आम्ही त्याचा सराव प्रथम उथळ पाण्यात करू, त्यानंतर डीप वॉटर मध्ये करू, अस मी आणि जान्हवीने सांगितले. पूजाने बाकी मस्त पैकी डीप वॉटर मध्ये वॉटर ट्रेडिंग केले. ती खरच खूप फास्ट शिकत होती. तिने एका महिन्यातच पूर्ण पोहणे शिकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते आणि त्या दिशेनेच तिची प्रगती चालू होती.
आता या महिन्यात 'महेश सर ' म्हणून नवीन कोच आले होते. शाळांना सुट्टी लागल्यामुळे स्विमिंग शिकण्यासाठी बरीच गर्दी झाली होती. इतरही फक्त पाण्यात चालणाऱ्या, स्वतःच शिकणाऱ्या, मुलींची संख्या वाढली होती. पाण्यात कुणाचा पाय जरी दिसला, थोडासा स्पर्श जरी झाला तरी मी माझा सराव सोडून पाण्यात उभे राहून जात होते. गर्दीमुळे तर या गोष्टी जास्तच होत होत्या. स्विमिंग शिकण्याची सुरुवात करायला मला आता दीड महिना होऊन गेला होता. पण अजूनही मी न थांबता आडवा पुल पार करू शकत नव्हते. मला आता रोज सराव करून फक्त तेव्हढेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे भाग होते. मी खूप प्रयत्न करत होते. महेश सरांनाही ते दिसत होते. त्यांनी मला सकाळी ब्लॅक कॉफी पिऊन यायला सांगितली, पण कसले काय? माझ्यावर कसलाच परिणाम होत नव्हता! मी अजून धापाच टाकीत होते. जास्तीत जास्त 70-75% आडवा पूल पार करत होते. रोज रोज तेच-तेच करून, आता मला वैताग आलेला होता. बऱ्याच नवीन मुलीनी पण प्रवेश घेतला होता. त्यांची प्रगती जोरात चालू होती. मी बाकी अजून सरावच करत होते. सर्व मुलींना 'डीप वॉटर मध्ये डाय' मारण्यासाठी सर घेऊन जात होते, पण मला आता तिकडेही जावेसे वाटत नव्हते. थोडक्यात माझी निराशा चांगलीच वाढली होती, पण तरीही रोज पावणेसहा वाजताच मी पाण्यात उतरून जात होते. तेच ते करत होते. हे सातत्य बाकी मी कायम ठेवून होते. कधीच क्लास बुडविला नाही, की स्विमिंगला जाण्यासाठी उशीर केला नाही.
पाच मे रोजी मला काश्मीर टूर साठी जायचे होते. मला वाटले होते, त्यापूर्वी मी पोहणे शिकेन म्हणून! पण शक्यच नव्हतं.
आज 22 तारीख उजाडली होती. म्हणजे जवळ जवळ पावणे दोन महिने मला क्लास लावून झाले होते. सरांच्या सांगण्यावरून काल पासून मी 'devidoff' फाइन आरोमा ब्लॅक कॉफी ' सुरू केली (ही काही या कॉफी ची जाहिरात नाही! ) आणि विशेष म्हणजे, मला जे वाटत होते की, माझी काहीच प्रगती होत नाहीये, मी काहीच पुढे जात नाहीये, ते आज खोट ठरलं. सकाळी पाण्यात गेल्या गेल्या मी एकदा पूल नॉनस्टॉप पूर्ण केला. मला खूपच आनंद वाटला. यानंतर मात्र तसा नॉन स्टॉप पूल पार होईना! अगदी शेवटी घरी यायच्या वेळी मात्र जवळ जवळ तीन वेळा स्विमिंग पूल पार केला. सराना आणि मलाही खूप समाधान वाटला. माझ्या मैत्रिणी देखील खूप खुश झाल्या. ही बातमी जवळ जवळ सर्व मुलींना कळाली! एखादी ' ढ' विद्यार्थिनी पास झाली, की कसा फील येईल, तसा फील मला त्या दिवशी आला 🤪माझी ' प्रॅक्टिस ' काही वाया जात नव्हती तर! ती मला 'परफेक्ट ' 'बनवत होती!
दुसऱ्या दिवशी सकाळी सरांनी मला देखील डीप वॉटर मध्ये नेले, तेथेही मी पूर्वीपेक्षा थोड चांगलं स्विमिंग केलं. भावना मॅडम आज डीप वॉटर मध्ये माझ्याजवळच थांबल्या. त्यामुळे मला बराच धीर आला आणि मी एकदा थांबून का होईना, पण पूर्ण अंतर पार केले. सरांना आणि मला पण खूप समाधान वाटले. माझी एव्हढ्या दिवसांची मेहनत, आता तिचे रंग दाखवू लागली होती! पण अजून बराच पल्ला गाठायचा होता.
आता जवळ जवळ रोजच महेश सर आम्हाला डीप वॉटर मध्ये नेत होते. माझी बऱ्यापैकी सुधारणा होत होती. पण तरीही केव्हा केव्हा सरांना टायर द्यावेच लागत होते. बऱ्याच वेळा डाय मारली की, मी तिरपी तिरपी निघून जात असे. माझ्या गॉगल मध्ये पाणी गेल्यामुळे मला खालचे काहीच दिसत नसे. पण आता शॅलो वॉटर आणि डीप वॉटर मध्ये मी बऱ्याच वेळा नॉन स्टॉप जात होते. दम बाकी खूपच लागत होता. ब्रिथिंग शिकल्यानंतर ते प्रमाण कमी होईल अशी आशा ठेवत होते.
25 एप्रिल रोजी स्वर्गीय ताईचा स्मृती दिन होता. सकाळी चार वाजेपासून light नव्हते. अंधारात कोठे जाणार, म्हणून सहा वाजता उजाडल्यावर स्विमिंग साठी गेले. पण रात्रभर ताईच्या आठवणींनी, रडून रडून, माझी सगळी ताकदच कोणी काढून घेतली आहे, असे वाटत होते. 20 मिनिटे पण स्विमिंग केले नसेल, पण खूपच थकले होते. तुमची मानसिक स्थिती जर ठीक नसेल, तर त्याचा तुमच्या शरीरावर किती परिणाम होतो, हे याच उत्कृष्ट उदाहरण होत. मी त्वरित घरी निघून आले. आज माझं शरीर कोणताही शारीरिक आजार नसतांना साथ देत नव्हते. मी जिमला देखील गेले नाही. जणू शरीराने आज संप पुकारला होता. त्याला आज फक्त आणि फक्त ताईच्या आठवणींमध्येच स्विमिंग करायचं होतं, पाण्यामध्ये नाही! मीही मग त्याला जास्त आग्रह केला नाही. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सार काही सामान्य होईल, म्हणून शांती ठेवली.
दिनांक 27 एप्रिलला आडव्या पुलामध्ये नॉनस्टॉप जायला अजून दोन तीन दिवस काही झाले नव्हते, तोपर्यंत महेश सरांचा उभा पूल पार करण्याचा आग्रह सुरू झाला. खूप भिती वाटत होती. परंतु सरानी बरेच प्रोत्साहन दिले. मी "स्विमिग कॉस्च्युम ' मध्ये आहे, माझ्या हातात टायर आहे, तुम्ही बिनधास्त उडी टाका" म्हणून सर सांगत होते. तेव्हढ्यात भावना, पूनम, पल्लवी देखील तेथे आल्या, त्यांनी अजून मला प्रोत्साहन दिले. आज जर मी उडी मारली नाही तर पुन्हा लवकर कधीच मारू शकणार नाही, हे मलाही कळत होते. टायर पेक्षाही सर आणि मैत्रिणींवर माझा जास्त विश्वास होता. मी पुन्हा एकदा सराना मनातल्या मनात नमस्कार केला, देवाचे नाव घेतले आणि उडी मारली. माझ्या दोघी-तिघी मैत्रिणी माझ्या आजुबाजूला माझ्या बॉडी गार्ड सारख्या माझ्याबरोबर आल्या! सर, टायर घेऊन पुलाबाहेर चालत होते. मला हे माहीतच नव्हते. थोड्या वेळाने मी जेव्हा रॉड पकडला, तेव्हा मला हे दृश्य दिसले! या सगळ्यांचे आभार मी कोणत्या शब्दात मानू?
रॉड पकडून, श्वास घेऊन पुन्हा पाण्यात जायला पल्लवीने सांगितले, मी तसेच केले आणि काय? मी जवळ-जवळ पुलाच्या ज्या ठिकाणी पाय खाली टेकले जात होते, तेथपर्यंत येऊन पोहोचले! त्या पुढच सार मला माहित होत.
आज माझ्या दृष्टीने पोहण्याच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा मी पार केला होता. माझ्याबरोबर पुलातील सर्वच जणींना आनंद झाला होता. खरच खूप छान group आहे आमचा! समोरच्याच्या यशात आनंद मानायला, त्या अजून उंच शिखराकडे न्यायाला, प्रोत्साहन द्यायला, खूप मोठ मन लागत, ते या साऱ्या जणींजवळ आहे. म्हणूनच त्या स्विमिंग पूला मध्ये सकारात्मक ऊर्जा कायम आहे. माझ्यासारखी 'साठी' उलटलेली स्री देखील त्यामुळेच येथे पोहणे शिकू शकते. निदान शिकण्याचा प्रयत्न तरी करू शकते!
सौ.मंदा वाडेकर.
आजपर्यंत, मी बरेच प्रवास वर्णन लिहिले. माझं अमेरिकेचं प्रवास वर्णन जास्तीत जास्त एक महिन्यांचं होत! पण आज जे प्रवास वर्णन मी आपल्यापुढे वाचनासाठी ठेवणार आहे, ते काल मापनानुसार दोन महिन्यांच्या वर आहे आणि तरीही त्याचा हा फक्त पहिलाच भाग आहे. त्याचा दुसरा आणि अंतिम भाग मी नंतर आपल्याला अवश्य उपलब्ध करून देईन.
या माझ्या 'पोहण्याच्या प्रवासातून' माझ्या सर्व बंधू- भगिनींना वाचनाच्या आनंदापलीकडे अजून काय काय मिळालं ते प्रतिक्रियांद्वारे मला अवश्य कळवावे🙏👍. कारण माझा उद्देश आपल्याला फक्त वाचनाचा आनंद द्यायचा नाही, तर त्यापेक्षा अजून काहीतरी जास्त देण्याचा आहे.
बघू या, मी त्यात यशस्वी होते का?
Comments
Post a Comment