जगन्नाथपुरी
खूप वर्षांपासून आम्ही कोठे फिरायला गेलोच नव्हतो. LTS तर वर्षानुवर्षे घेतले गेले नव्हते. म्हणून न्यू इंडिया चे holiday home कोठे कोठे आहेत, ते प्रथम बघितले. कारण थोडा आराम पण हवा होता. ह्या वयामध्ये काहीतरी change म्हणून फिरायला जायचे आणि दमून थकून घरी यायचे कोणी सांगितले? मग जगन्नाथपुरीसाठी holiday home डिसेंबर महिन्यातच दिनांक 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी बुक केले होते. श्री सचिन जोशींकडून tour program आखून घेतला त्यांनी वैशनम चे टूर पॅकेज बुक करून दिले. तीन चार दिवसाची टूर सात रात्र आणि आठ दिवसात करायचे ठरविले . खूप घाई नाही गर्दी नाही. छोटे छोटे पण प्रेक्षणीय स्थळ सहज पाहून होतील काहीही सुटणार नाही. परत काही ओडीसाला आता जाणं होणार नव्हत. जातांना पुणे भुवनेश्वर flight दिनांक 16 फेब्रुवारी चे book केले त्याचं तिकीट सहा साडे सहा हजार रुपये होत. पण तेच भुवनेश्वर पुणे मात्र दहा हजाराच्या वर होत. म्हणून येताना भुवनेश्वर मुंबई यायच अस ठरले. ते साधारण साडे आठ हजार रुपये पडले!
दिनांक 15 ला सकाळी नऊ वाजता आमच्या स्वतः च्या गाडीने TUV ने पुण्यासाठी निघालो. भाच्याकडे पिंपरी चिंचवड येथे जाऊन दिरांकडे सिंहगड रोडला रात्री मुक्काम केला. सासूबाईंना दिरांकडे कडे सोडले. आमची flight 16 तारखेला दुपारी बारा वाजता होती. साधारण नऊ वाजता आमच्याच गाडीने पुणे airport ला आलो. पुण्याचं एअरपोर्ट छोट असल्यामुळे check in साठी काहीच वेळ लागला नाही. सुरुवात तर आरामात झाली. साधारण दुपारी साडे तीन च्या सुमारास आम्ही भुवनेश्वर ला पोहोचलो. Airport बाहेर आम्हाला देण्यात आलेल्या नंबरची गाडी आमची वाट पाहत उभीच होती. ड्रायव्हर देखील खूपच cooperative वाटला आणि तो शेवटपर्यंत खरच तसाच होता! तो आम्हाला Cozzet Victoria ह्या हॉटेलला घेऊन गेला. हॉटेल एअरपोर्ट पासून अक्षरशः पंधरा मिनिटांच्या अंतरावर होत. हॉटेल मधील स्टाफ खूपच नम्र होता. रूम मिळताच आम्ही फ्रेश होऊन लोकल मार्केट पाहण्यासाठी निघालो. ड्रायव्हर आम्हाला घेऊन गेला. मालेगांव च्या किडवाई रोड सारखच ते मार्केट होत. किडवाई रोडला तरी सर्व प्रकारची दुकाने आहेत, तेथे फक्त कपड्यांचीच दुकाने होती. तसेही मी कोठे फिरायला गेले तर फक्त प्रेक्षणीय स्थळ बघते, खरेदी काहीच करत नाही. येथेही थोडावेळ मार्केट मध्ये फिरून आम्ही हॉटेल ला परत आलो.
सकाळचा नाष्टा आणि रात्रीच जेवण आम्हाला आमच्या package मध्येच होत. जेवण ठीक होत. सकाळी नाष्टा करून आठ साडे-आठ वाजेपर्यंत आपण जगन्नाथ पुरीसाठी निघू अशी कल्पना आम्हाला ड्रायव्हरने अगोदरच दिली.
प्रथम आम्ही भुवनेश्वर येथील लिंगराज temple चे दर्शन घेतले. गर्दी बऱ्यापैकी होती. पण पंड्या ला 100 रुपये देऊन लगेच नंबर लागला. येथे सगळीकडे असेच दिसले. पंडे लोक सरास पैसे घेऊन त्वरित देवाचे दर्शन घडवून आणतात. त्यानंतर आम्ही राजा राणी temple पाहिले येथे इंटरन्स फी होती. दुपारची वेळ असल्यामुळे आठ दहा लोकच होते. येथील गार्डन पण सुरेख होते. भर दुपारी सुद्धा झाडी आणि फुले टवटवीत होते. साफ सफाई पण छान होती.
जगन्नाथपुरी भुवनेश्वर हून जवळ जवळ 63 km होते. वाटेत एक दोन स्पॉट आम्हाला पाहायचे होते. रस्त्याने आम्ही पॅगोडा पहिला इतर पॅगोडांसारखाच हाही होता. त्यानंतर 64 योगिनी temple बघितले. ह्या मंदिरात खूपच गूढ अस काहीतरी वाटत होते. बाहेर गार्डन बाकी सुंदर होते. थोडा वेळ आम्ही गार्डन मध्ये बसलो. त्यानंतर परशुरामेश्वरंम आणि मुक्तेश्वर temple बघितले आणि पुरी येथे blue Lily या आमच्या न्यू इंडिया च्या resort ला पोहोचलो. रिसॉर्ट पुरीच्या beach पासून अक्षरशः दोन तीन शे मीटरवर होते. पण पुरीला जिकडे पाहावे तिकडे हॉटेल्स च हॉटेल्स! दुसरं काही दिसतच नाही. त्यामुळे रिसॉर्ट मधून beach दिसत नव्हता. जर तसा समुद्र आणि beach दिसला असता तर काय मज्जा आली असती! अजून पण खूप हॉटेल्स चे बांधकाम चालू होते! रूम मध्येच कॉफी घेऊन आम्ही beach वर गेलो. आमच्या ड्रायव्हर ने आम्हाला world cup म्हणून एक हॉटेल दाखविले. तेथेच आम्ही तीनही दिवस रात्रीचे जेवण घेतले. एकतर या हॉटेल मध्ये वेज आणि नॉन वेज दोन्ही मिळत होते. शिवाय जेवण झाल्यानंतर रात्रीचे थोडावेळ beach च्या कट्ट्यावर थांबता येत असे. हॉटेल आणि beach खूपच जवळ असले तरी आम्ही गाडीनेचं जात होतो. केव्हाही फोन केला तरी आमचा ड्रायव्हर तयारच असायचा.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला जगन्नाथाचे दर्शन घ्यायचे होते. त्यासाठी पंड्याला विचारून आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सकाळी सहाची वेळ दिली होती. गर्दीत जायचे नसेल तर तुम्हाला लवकर यावेच लागेल अस कळाल. सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान आम्हाला आमच्या ड्रायव्हर ने गाडीने एका चिंचोळ्या गल्ली पर्यंत पोहोचविले. तेथून सायकल रिक्षाने जगन्नाथ मंदिरापर्यंत जायचे होते. सायकल रिक्षात बसायला खूप अवघड वाटत होते. बिचारा चालविणारा चढ आली की खाली उतरून सायकल चढवित होता. त्याला मी सांगितले, ' आम्ही खाली उतरतो म्हणून' पण तो ऐकेना. बिचारा पोटासाठी किती मेहनत करीत होता! आम्हाला त्याची खूपच किव आली, आम्ही त्याला ठरल्या पेक्षा अधिक पैसे देऊ केले. तो खूप खुश झाला. येताना पण तो आमची वाट पाहत होता. त्याच्याच रिक्षात आम्ही परत आलो. मंदिराच्या परिसरात येताच भव्य दिव्य मंदिराचे दर्शन झाले. दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना ज्याला आपण म्हणू शकू असे! अहाहा काय ते बांधकाम! पाहत राहावस वाटत होत, पण पंड्या घाई करत होता. त्याला फक्त आम्हाला एकदा दर्शन घडवून आणण्यातच स्वारस्य होत. आम्हाला एकदा दर्शन घडवून आणले, आमच्याकडून पैसे घेतले, की तो दुसरे गिऱ्हाईक शोधायला मोकळा! देवाचा असा बाजार पाहिला , की मनातून खूप चीड येते. पण करणार काय? चार प्रवेश द्वारापैकी एका द्वाराकडे त्या पंड्याने ने आम्हाला आणले. तेथे पोलिसांचा पहारा होता, पण तो नावालाच! पोलिसांच्या हातात नोट दाबत त्याने आम्हाला त्याच्या बरोबर येण्यास सांगितले. आत जाताच दिसली भयानक गर्दी, चेंगराचेंगरी! बापरे! पाच सहा तास जरी रांगेत उभे राहिले तरी नंबर लागेलच ह्याची खात्री नव्हती. रांगेतील लोक केव्हा पासून उभे होते माहीत नाही. तेथेही इतर पंड्यांची दादागिरी चालूच होती. कठड्या वरून उडी मारून ते रांगेत मध्येचं शिरत होते. सगळे पंडे रांगेतल्या माणसांना मागे ढकलून स्वतः पुढे जात होते. लहान मुले आणि बायकांचे हाल तर काही विचारूच नका. बऱ्याच लहान मुलांना पालकांनी खांद्यावर उचलून घेतले होते. खरोखर मरणाची गर्दी होती. मंदिराच्या मागील बाजूने एक round आम्हाला पंड्याने मारून आणला. कोठे कोणता पोलीस आहे? कोठून entry होऊ शकते ह्याचा अंदाज घेतला! खरोखर अंदाज घेतला की आमच्यासाठी देखावा केला माहीत नाही! परत पोलिसांच्या हातात नोटा कोंबल्या आणि आम्हाला अजून एक दुसऱ्या पंड्या बरोबर त्याने जायला सांगितले. तो पंड्या आम्हाला डायरेक्ट दर्शनाला च घेऊन गेला. बिचारे भाविक तसेच रांगेत उभे होते रेटा रेटी करून बिचारे किती थकले असतील माहीत नाही. त्यां भक्तांच्या अगोदर आम्हाला त्या पंड्याने जगन्नाथाच दर्शन घडविले. रांगेतल्या त्या भोळ्या भाबड्या भक्तांसाठी मला खूप वाईट वाटत होते. तेव्हढ्या वेळात सुद्धा मी जगन्नाथाची क्षमा मागितली. अस दर्शन घेण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हताच आणि हे असले दर्शन घेऊन खरंच आम्हाला समाधान मिळणार होत का? आणि ते रांगेत उभे असणारे भक्त? मला खूपच अपराध्यासारखे वाटत होते. अजूनही जेव्हा केव्हा मला जगन्नाथ पुरीच नाव घेतलं जात, तेव्हा आम्ही अशा प्रकारे दर्शन घेतलं, हे मी विसरूच शकत नाही. असो. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छे प्रमाणे आणि तत्वानुसार होतीलच अस नसतं. आम्ही आठ वाजताच दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो.
पंड्याने आम्हाला नंतर प्रसाद शिजविण्यासाठी लागणारे मातीचे भांडे, विहिरीतून पाणी काढणारे सेवेकरी, नारळ खवणारे सेवेकरी सगळं दाखविले. जबरदस्तीने अन्नदानासाठी पावती फाडावयास लावली. आपण होऊन दान देण्यात जी भक्ती असते, जे पुण्य असते ते अशा जबरदस्तीत कस येईल? शेवटी आम्हाला जगन्नाथांच दर्शन झाले, हेच त्या क्षणी महत्त्वाचं होत. म्हणून आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. आमचा मोबाईल आणि चपला - बूट घेऊन त्याच सायकल रिक्षाने, आमच्या गाडी पर्यंत पोहोचलो. आमच्या ड्रायव्हरने त्या दिवशी आम्हाला विठ्ठल कामत या हॉटेल मध्ये नेले. तेथे आम्ही छान पैकी break fast केला आणि चिलका सरोवर पाहण्या साठी आमची गाडी निघाली. वाटेत एक दोन मंदिर होतें, बेडी हनुमान आणि अलोकनाथ temple तेही बघितले. चिलका सरोवर पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. शेवटी एकदाचे आम्ही तेथे पोहोचलो. Boating चे rate खूपचं जास्त होते. पण तरीही आम्ही seperate boat केली. एका बोटीत सहा ते आठ लोक घेत होते. आम्हाला दोघांसाठी तीन हजार रुपये मोजावे लागले होते! बोटीत बसल्यानंतर खूपच आनंद वाटत होतं. काही अंतरावर एका बेटावर बोट थांबली. पण तेथे आम्हाला खाली उतरू दिले नाही. तेथे विषारी खेकडे असतात. अस सांगण्यात आले. मग आमच्या बोटीत एक खेकडे दाखविणारा, एक शिपले फोडून आतून खडे काढून दाखविणारा, शिंपल्यातून मोती काढून दाखविणारा, असे एकएक माणसं येत राहिले आणि ते आम्हाला खडे, मोती काढून झाल्यानंतर ते घेण्यासाठी आग्रह करू लागले. खडे आणि मोती कसे निघतात ते आम्ही प्रथमच पाहत होतो. प्रवासात खर म्हणजे मी वर सांगिल्याप्रमाणे काहीच खरेदी करत नाही पण त्यांची मेहनत पाहून आणि विक्री कौशल्य पाहून एक मोती आणि एक खडा आम्ही विकत घेतला! तो आम्हाला खूप स्वस्त पडला अस नाही, पण तो खरा खुरा आहे किंवा असावा एवढंच! नंतर घरी आल्यावर सगळ्यांना तो खडा आणि मोती दाखविल्यावर तुम्ही अजून घ्यायला हवे होते असे सगळे म्हणतात!
त्यानंतर बोट दुसऱ्या एका बेटावर पोहोचली. बाकीच्या लोकांना तेथे अर्ध्या ते पाऊण तास वेळ दिला गेला होता, पण आम्हाला मात्र अस काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे साधारण अर्ध्या km चालून गेल्यानंतर एक beach होता तेथे आम्ही मनसोक्त beach चा आणि समुद्राचा आनंद घेतला. त्यानंतर बोट जवळ येऊन एक छोट हॉटेल होत तेथे यांनी select केलेला मासा खाल्ला, तर मी भेळ खाल्ली. थोडा वेळ समुद्राची गंमत पाहून, आम्ही त्याच boat मधून आमच्या गाडी कडे परत आलो.
न्यू इंडिया चे हे holiday home resort मध्ये होते आणि दोन दिवस तेथे लग्नाची धूम होती. रात्रभर गाणे आणि फटाके चालू होते. त्यामुळे शांतता बिलकुल नव्हती. पण आमचा बराचसा वेळ बाहेरच जात असल्यामुळे एव्हढ जाणवलं नाही. घरी आल्यानंतर, फ्रेश होऊन परत आम्ही beach वर गेलो. येताना जेवण करूनच रूम वर आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला जगप्रसिद्ध कोणार्क मंदिर पाहायला जायचे होते. सकाळी ब्रेक फास्ट घेऊन आम्ही कोणार्क मंदिर पाहण्यासाठी निघालो. कोणार्क मंदिर बऱ्यापैकी लांब होते. Entry fee देऊन आम्ही मंदिर पाहण्यासाठी आत गेलो. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश नव्हता, परंतू बाहेरून मंदिराचे बांधकाम किती हुशारीने आणि बुद्धिमत्ता व चातुर्य वापरून केलेले आहे ते लक्षात येते. एवढ्या पूर्वीच्या काळात कोणतीही साधने उपलब्ध नसताना हे बांधकाम कसे केले असेल याचे आश्चर्य वाटते. आता बांधकामाचे बरेचसे नुकसान झालेले आढळून येते. पण तरीही त्याचे सौंदर्य काही कमी झालेले नाही आणि त्याची महतीही कमी होणार नाही. खरंच सलाम आहे त्या निर्मात्याला आणि त्या कारागिरांना!
20 फेब्रुवारी ला सकाळीच ब्रेक फास्ट करून आम्ही भितरकनिकेला जाण्यासाठी निघालो. भितरकनिका जगन्नाथपुरी येथून जवळ जवळ 130 km लांब होते. शिवाय रस्त्यात आम्हाला रघुराजपुर येथे प्रसिद्ध असणारी पट्टचित्र कला पहावयाची होती. रघुराजपुर येथे आमच्या ड्रायव्हर ने अगोदरच appointment घेतलेली असावी. कारण ती व्यक्ती आमची वाटच पाहात होती. अतिशय नम्रपणे त्याने आम्हास थोडा वेळ थांबण्यास सांगितले, कारण आमच्या सारखेच अजून एक पर्यटक त्याच्याकडे येणार होते. पुन्हा पुन्हा तिचं माहिती त्याला द्यावी लागणार, म्हणून आम्हीही वीसेक मिनिटे त्यांच्यासाठी थांबलो, तेव्हढ्यात ते पाहुणे आलेच. विशेष म्हणजे ते महाराष्ट्रीयन निघाले! माणसाचं एक वैशिष्ट असत, तो आपल्या घराच्या शेजारच्याशी भांडतो पण बाहेर गावी गेला आणि आपला गाववाला भेटला की त्याला आनंद होतो, बाहेरच्या राज्यात गेला आणि आपल्या राज्यातील कुणी भेटलं की त्याला खूप खूप आनंद होतो आणि बाहेरील देशात गेला आणि त्याला भारतीय माणूस भेटला की त्याला परमानंद होतो! आम्हालाही ते पर्यटक भेटताच तसाच आनंद झाला. असो
त्या पट्टचित्रकाराने आम्हाला एका अतिशय जुन्या घरात नेले. ज्या घरात पूर्ण पसाराच पसारा होता. फक्त चालण्यासाठी पाऊल वाट तेव्हढी शिल्लक होती. नंतर एका रूम मध्ये एक जुनं ' बाकड' ज्याला आपण म्हणू शकू, अशा बाकावर त्याने आम्हाला बसविले आणि तो स्वतः खाली बसला. ती रूम सर्व प्रकारच्या पेंटिंग च्या वस्तूंनी भरलेली होती. बाटल्या, मडकी, बादल्या, बॉल, खोकी, कळशा. प्रत्येक वस्तूवर अतिशय मेहनतीने, नाविन्यपूर्ण चित्रकाम केलेले होते. त्याने आम्हाला त्या चित्रकलेचं थोड प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर हे रंग कसे बनविले जातात त्याचीही माहिती दिली. त्याने बनविलेली सर्व चित्रे त्याने दाखविली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी बनविलेले चित्रे तर त्याने दाखविलीच पण त्याच्या आजोबांनी बनविलेले चित्रही दाखविले. त्या पोस्टर्स ची किँमत साठ हजार, पंच्याहत्तर हजार अशी होती. त्याच्या घरात सगळेच चित्रकार होते. त्याची आई आणि बायकोही! खूप कौतुक वाटले ते पाहताना! नंतर कळाले की, या संपूर्ण गावातच ही कला जोपासली जाते. आपल्या येवल्याला जशी घरोघरी पैठणी बनविली जाते तसेच येथेही घरोघरी पट्टचित्र तयार होतात. आम्हाला येथे जवळ जवळ दोन तास लागले त्याच ते सगळ वैभव पाहायला! पण एका नवीन कलेची ओळख झाली.
नंतर आम्ही बराच खडतर प्रवास करून, संध्याकाळी पाच वाजता भितरकानिकेला पोहोचलो. एका बाजूला नदीचे भले मोठे पात्र, की जिचा दुसऱ्या बाजूचा किनाराच दिसत नव्हता! एका बाजूला शेती! पण तेथे काहीही पिक नव्हत! जमीनही सुपीक नव्हती. आणि त्याच बाजूला आमचे रिसॉर्ट होते. रिसॉर्ट खूपच छान होते, वीस पंचवीस cottages होत्या, पण आता सीझन संपत आल्यामुळे पूर्ण रिसॉर्ट मध्ये फक्त दोनच families होत्या. जमीन एव्हढी नापीक असूनही रिसॉर्ट बऱ्यापैकी maintain केलेले दिसत होते. आंबा, चिकू, नारळ, अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड केलेली होती, जास्वंद तर खूपच होता. इतरही फुलझाडे होते. झोपाळा वगैरे छान होता. रात्रीचे जेवण करून आम्ही सकाळी लवकर उठण्याचे ठरविले. कारण भितरकानिकेला नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाहण्यासारख्या विविध प्रकारच्या मगरी आहेत आणि उन झाल्यानंतर या मगरी जंगलात मध्ये निघून जातात आपल्याला दिसत नाहीत. सकाळी सात वाजता रिसॉर्ट च्या care taker ने ठरवून दिलेल्या boat ने आम्ही भितरकनिकेच सौंदर्य पाहायला निघालो. ह्यांना मगरींची बऱ्यापैकी भीती वाटत होती, त्यामुळे ह्यांची ईच्छा नव्हती. पण माझा उत्साह पाहून ह्यांना boat मध्ये यावेच लागले. सीझन नसल्यामुळे येथेही boat मधील दोन नावाडी आणि आम्ही दोघं असे चारच जण वीस बावीस लोकांची क्षमता असणाऱ्या boat मध्ये होतो. खूपच मजा येत होती. मधूनच मगरींचे दर्शन होत होते. भितारकनिकेला मगरींचेच साम्राज्य आहे, पण तरीही केव्हा साप, तर केव्हा हरीण दिसत होते. किनारा/जंगल boat पासून बऱ्याच अंतरावर होता आणि मध्य भागातून आमची boat जात होती. एखाद्या चित्रपटात ओडीसाच आपल्याला दर्शन होत, तसच हेही वाटत होत. किनारा एव्हढा लांब होता, सगळ्या किनाऱ्यावर चिखलाचे आणि दाट झाडींचे साम्राज्य होते, तरीही नावाड्यांची तीक्ष्ण नजर बरोबर मगरी, हरीण, साप, वेगवेगळे पक्षी शोधून आम्हाला दाखवत होती. भव्य दिव्य नदी, back water चा प्रवाह आणि मधून चालणारी आमची boat स्वर्गीय सुखाचा आनंद आम्हाला मिळत होता. ह्यांची भीती आता आनंदात बदलली होती. भितरकनिकेला आम्ही आलो नसतो तर खूप मोठ्या आनंदाला मुकलो असतो. ओरिसाच्या निसर्ग सौंदर्याची झलक आम्ही थोडी का होईना पण अनुभवली! जवळ जवळ तीन तास आम्ही हा आनंद लुटत होतो. मध्येच boat थांबून एक पार्क देखील आम्हाला दाखविण्यात आले. तेथे मगरी विषयी पुर्ण माहिती, म्युझियम होते. साधारण बारा वाजेच्या सुमारास आम्ही रिसॉर्ट वर परत आलो. आम्हाला त्याचं दिवशी भुवनेश्वर येथे जायचे होते, रस्ता अवघड असल्यामुळे भुस्वनेश्वर पोहचेपर्यंत रात्रच होणार होती आणि तशी ती झाली पण! कारण जातांना आम्हाला नंदनकानन zoo पण पाहायचे होते. Zoo पाहण्यासाठी तीन साडे-तीन तास लागले. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे मोठे zoo पाहिल्यामुळे zoo पाहण्यात आम्हाला खूप interest नव्हता. तरीही आम्ही ते पाहिले कारण येथे गाडीतून जंगल सफारी पण होती. आम्हाला जंगल सफारी मध्ये white tiger, मोर, हरीण, सिंह, अस्वल ह्यांचे दर्शन झाले!
दुसऱ्या दिवशी आम्हाला खंडगिरी, उदयगिरी आणि स्टेट म्युझियम पाहून तीन वाजेची flight पकडायची होती. त्यामुळे सकाळी breakfast करून आम्ही आमच्या bags सोबत घेतल्या. प्रथम स्टेट म्युझियम पाहिले. अतिशय रमणीय वातावरण आणि भव्य तीन मजली म्युझियम खूपच पाहण्यासारखे आहे. ओरिसाच्या सर्व कला त्यात कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बाहेरील गार्डन, त्यातील फुले आणि कारंजा विलोभनीय आहेत. Museum पाहून आम्ही खंडगिरी आणि उदयंगिरी पाहण्यासाठी निघालो. हे दोन्ही समोरासमोर असणारे पर्वत आहेत. आम्ही प्रथम खंडगिरि पाहण्यासाठी चढायला सुरुवात केली. गर्दी बऱ्यपैकी होती. ऊन तर मी म्हणत होते. कसेबसे आम्ही वरच्या सपाट भागापर्यंत पोहोचलो. तेथे काही कोरीव पुतळे, आणि मंदिर होत. अजून वरती एक चबुतरा होता. तेथे एव्हढ्या उन्हात पण काही पर्यटक फोटो काढत होते. समोर खंडगीरी पेक्षाही उंच उदयगिरी दिसत होता. तेथे कसले तरी मंदिर असावे, कारण भजन ऐकू येत होते. दोन तीन मंदिरांचे कळस पण दिसत होते. पण आता एव्हढ्या उन्हात आम्हाला तिकडे जायची बिलकुल इच्छा नव्हती आणि क्षमताही नव्हती. आम्ही खंडगिरि वरूनच जो कोणता देव असेल त्याला साष्टांग नमस्कार करून घेतला आणि आमचा मोर्चा परतीच्या वाटेवर वळविला. भूक पण लागलेली होती, जेवण करून एअरपोर्ट गाठायच होत. खंडगिरी उतरून ड्रायव्हर ला डायरेक्ट जेवणासाठी जायचे सांगीतले. ड्रायव्हरने आणि ह्यांनी non veg चे जेवण केले. मला हॉटेलमध्ये पोळी नसल्याने जेवण करावेसे वाटलेच नाही. मी फक्त colddrink घेतले. लगेच आम्ही airport वर पोहोचलो. ड्रायव्हर ला निरोप दिला. त्याला आमचा आणि आम्हाला त्याचा सहवास निश्चितच आवडला होता. रात्री आठ वाजता मुंबई ला आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर कॅब करून दहा वाजेपर्यंत बदलापूरला आलो 👍
Comments
Post a Comment