बाई पण भारी देवा (29/05/2026)

या  'हर्षोत्सवाला' आज बरोबर एक वर्ष झाले. क्वचितच व्यक्तींचा वाढदिवस आणि कार्यालयीन निवृत्ती एकाच दिवशी येत असेल! मी त्यातलीच एक! (त्यामुळेच त्या दिवशी मी कार्यालयात आणि घरी दोन्ही ठिकाणी दोन-दोन केक  कापले)कार्यालयात वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा औपचारिक तसेच अनौपचारिक  सोहळा खूपच छान पार पडला! सेवानिवृत्तीच्या असतात, तशा संमिश्र भावना माझ्याही मनात होत्या. अडतीस वर्षाचे ऋणानुबंध असलेली, न्यू इंडिया सारख्या सर्वार्थाने परिपूर्ण आणि पोशिंदा असलेल्या संस्थेतून निवृत्त होणे, म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच; पण वाडेकर साहेबांच्या सुमधुर गीताने वातावरण हलकं फुलकं केलं. (तेव्हा त्यांनी गायलेले गीत मी आज परत पोस्ट करीत आहे. धन्यवाद सतीश🙏) एव्हढ असूनही अतिशय जड अंतःकरणाने, भावनाविवश होऊन मी कार्यालयाचा निरोप घेतला. घरी येताना माझ्यासोबत  कार्यालयातील सहकारी, अधिकारी आणि इतर मंडळी देखील होतीच. माझी ही (वरात येताच, वारातच ती! दुसरी कोणती उपमा देणार?) माझे सदतीस वर्षापूर्वी 'नववधू ' म्हणून स्वागत झाले असेल, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जंगी स्वागत  दीर-जाऊ, भाचा -भाचेसून, भाऊ -वहिनी, व्याही-विहिणबाई, नणंदबाई, पुतणी आणि सगळ्याच माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या चमूने केले. त्यांच्या उत्साहाला नुसते उधाण आले होते (माझ्या सेवानिवृत्तीमध्ये ते स्वर्गीय ताईची अपूर्ण राहिलेली सेवानिवृत्ती तर पाहत नव्हते ना?) माझ्यासाठी काय करू न काय नाही, अस सगळ्यांनाच होऊन गेले होते. मला आज खरोखरच , ' राम रतन धन पायोजी " अस होऊन गेल होत. आयुष्याच्या एका मोठ्या वळणावर, यशस्वी वाटचाल करून, माझी गाडी इच्छित स्थळी येऊन पोहोचली होती. नव्हे, तिने थोडा थांबा घेतला होता! विसावा घेतला होता! पण क्षणभरच!  लगेच ती नव्याने सुरु झाली. नवीन आव्हाने पेलण्यासाठी ती पुन्हा सज्ज झाली! आता गर्दी, गोंगाट नव्हता, कोणतीही घाई नव्हती, आजपर्यंत असलेल्या गतिमान जीवनाची गती मंदावली होती, पण थांबली नव्हती. पेन्शन मुळे आर्थिक प्रश्न पडणार नव्हताच. त्यासाठी न्यू इंडियाचे आभार मानावे तेव्हढे कमीच! थोडक्यात आर्थिक सुबत्ता होती! पण खरच या संसाराच्या जंजाळातून मी पूर्णपणे सुटले होते का? बिलकुल नाही. बाई कधीच रिटायर्ड होत नाही. तिच्या व्यथा, विवंचना कधीच संपत नाहीत. कधी वाटत, आमच्या पूर्वीची पिढी याबाबतीत नशीबवान होती. पन्नासाव्या वर्षी जरी घरात सून आली, तरी त्या सासूचे किचन सुटून जात असे, अगदी नोकरी करणारी सून आली तरी! त्यानंतर त्या सासूला जेवणाचे ताट, ती 100 वर्षे जगली तरी तयार मिळत असे. आमची पिढी मात्र नोकरी करून, घर सांभाळून, सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील मागील पिढीची सेवा करतेच आहे. त्यांना तयार ताट देत आहे. आमच्या पुढची पिढी  देखील आमच्यापेक्षा नशिबवानच म्हणायला हवी. कारण आम्ही पुढच्या पिढीसाठी तयार ताट देण्याची, जास्तीत जास्त तयारी करून ठेवतो आहे. पुढच्या पिढीला आमच्यासारखे कष्ट उपसावे लागू नयेत, संघर्ष  करावा लागू नये, म्हणून काळजी घेतो आहे. 
शाळेतल्या शिक्षणाबरोबरच घरकाम आणि स्वयंपाकही यायलाच पाहिजे, शिवणकाम, रांगोळी, भरतकाम सार यायलाच हवं अस म्हणणारी आणि तसेच वागणारी स्त्रियांची ही शेवटची पिढी असावी. स्त्रियांविषयीची सर्व सामाजिक बंधने पाळून, आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न पाहणारी, संस्कार आणि शैक्षणिक प्रगती ह्यांचा समतोल राखणारी, स्त्रियांची ही शेवटची पिढी असावी! स्वभाव, पेहराव, संस्कार यातून वडिलधाऱ्यांविषयीचा आदर दर्शविणारी, त्याचे मन राखणारी ही शेवटची पिढी असावी! पुढची पिढी कदाचित आमच्यापेक्षा हुशार असेलही, परंतु नव्या-जुन्याचा समतोल साधण्याचे जे गुण या पिढीत होते, जी कसरत, जे कष्ट या पिढीने केलेत, तेव्हढे कष्ट पुढची पिढी अपवादानेच करू शकेन. 
या पिढीने कार्यालयात हस्ताक्षरात काम केले, टंकलेखन  केले, तसेच संगणकाशीही जुळवून घेतले. बँकेत जाऊन चेक वटवून आणला, तसेच ऑनलाईन पैसे देखील पाठविले आणि ATM मधून पैसे देखील काढले. वर्तमान पत्र वाचले, कादंबऱ्या वाचल्या, कथा वाचल्या आणि लिखाणही केले. लँड लाइन फोन पहिला आणि मोबाईलही हाताळला. पत्र, डायरी लिहिली आणि इंस्टाग्राम, ट्वीटर वर पोस्ट ही केलेत! यात या स्त्रिया कोठेही कमी पडल्या नाहीत. दिवसभर नोकरी केली, आणि रात्री सर्व झोपलेले असताना आपल्या मुलांसाठी रात्रीचे जागरण याच स्त्रीने केले! कुटुंबाला घरी केलेले पदार्थ खायला मिळावेत, म्हणून शनिवार-रविवारची सुट्टी, आठवडाभर पुरतील एव्हढे निरनिराळे पदार्थ करण्यात याच स्त्रीने घालविली. ही सुट्टी पिकनिक साठी आहे, हॉटेलिंग साठी आहे, आराम करण्यासाठी आहे, अस या स्रीच्या मनात कधीच आलं नाही. या जुन्या नव्याला सामावून, पुरून उरणारी स्त्रियांची ही शेवटची पिढी! खरोखरच  'super woman '! 
घरी दारी होणारा हा सत्कार, हे कौतुक माझं तर होतच पण या पिढीचही होत, असच मला वाटत.
सलाम आहे या माझ्या पिढीला!🙏 आणि मला अभिमान वाटतो की, या पिढीची मी एक सदस्य आहे 😇👍
धन्यवाद न्यू इंडिया आणि धन्यवाद माझे कौंटुबिक सदस्य🙏 तुमच्यामुळेच माझ्या वाटेला हे कौतुक आले आणि या गोड स्मृती जतन करता आल्या🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)