रंगीला राजस्थान

आजपर्यंत रंगीला राजस्थान विषयी खूप ऐकलेले होते, रेगीस्तान विषयी ऐकलेले होते. पराक्रमी महाराणाप्रताप आणि त्यांचा घोडा चेतक, हळदी घाटीचे युद्ध, जोहार पद्धत ह्यांच्याविषयी इतिहासात वाचलेले होते, थोडेफार दूरदर्शनवर बघितलेले होते. पण प्रत्यक्षात राजस्थानमध्ये जाऊन ते पाहण्याचा योग काही आजपर्यंत आलेला नव्हता. गत वर्षी माझ्या लहान सासूबाई आणि सासरे "महाले टूर्स" तर्फे राजस्थान टूर वर जाऊन आलेते आणि त्यांनीच आम्हाला त्यांच्या अनुभवावरून, "महाले टूर्स अँड ट्रॅव्हल्स" ह्यांची पर्यटनाच्या बाबतीत खूप चांगली सेवा आहे, असे सुचविले. म्हणून आम्ही ऑगस्ट 2025 मध्येच 20 नोहेंबर 2025 ची "रॉयल राजस्थान" ही त्यांची टूर बुक केली. या अगोदर आमचे राजस्थान मधील फक्त माऊंट अबू पाहून  झालेले होते. तेही 30/32 वर्षापूर्वी! बाकी राजस्थान मधील कोणतेच ठिकाण आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. बारा दिवसांची टूर, थंडीचे दिवस!  त्यामुळे इतर कपड्यांबरोबर उबदार कपडे देखील जवळ ठेवणे आवश्यक होते. बॅग साधारण वीस किलो पर्यंत घ्यायच्या, असे महाले सरांनी सांगितलेले होते. पण ऐनवेळी असे काही बंधन आहे, अस वाटले नाही. प्रत्यक्षात बऱ्याच यात्रेकरूंनी खूप मोठमोठ्या दोन दोन बॅग्स घेतलेल्या होत्या. माझ्या मते  सर्व यात्रेकरूंच्या तुलनेत आमच्या बॅग्स छोट्याच होत्या. त्याची भर आम्ही एक नवीन बॅग प्रवासात खरेदी करून, भरून काढलीच! 
टूर नाशिक येथून सुरू होणार असल्याने, आम्हाला वाटले, प्रथम आम्हाला नाशिक येथेच जावे लागेल, पण महाले सरांनीच सांगितले की, "गाडी मालेगांव मार्गेच जाणार आहे, तर तुम्ही नाशिक येथे येण्याची गरज नाही. फक्त तुम्ही मालेगांव येथे मनमाड चौफुलीला किंवा टेहरे चौफुलीला, जे तुम्हाला सोयीस्कर असेल तेथे येण्याचे करावे. आपल्याला रात्रीचे जेवण देखील आम्हीच देऊ, आपण रात्रीच्या जेवणाची चिंता करू नये". गाडी नाशिक येथून दुपारी साधारण तीन वाजता निघणार होती. त्यानुसार आम्ही साडेपाच वाजताच टेहरे फाट्यावर आलो, परतू गाडीला थोडा विलंब झाला आणि ती जवळ जवळ पावणे सात वाजता तेथे आली. गाडीत बसताच कमिटमेंट प्रमाणे आम्हाला पाण्याच्या दोन बाटल्या, प्रत्येकी पाच पराटयांचे एक पॅकेट, त्यात व्यवस्थित शेंगदाण्याची चटणी आणि गोड लोणचे देण्यात आले. तसेच दोन अतिशय उत्कृष्ट पुरण पोळ्याचे पॅकेट देखील देण्यात आले. (वाडेकर साहेबांचा वाढदिवस 21 नोहेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशीच होता. जणू काही त्यासाठीच या पुरणपोळ्या मिळाल्या! ) त्या जेवणावरून लक्षात आले की, संपूर्ण टूर होईपर्यंत आपल्याला अतिशय चांगले जेवण मिळणार आहे. आपले खाण्यापिण्याचे हाल होणार नाहीत. आणि खरच शेवट पर्यंत झालंही तसंच! प्रत्येक वेळी, गरम गरम, सात्विक अन्न पदार्थ महाले टूर्सने आम्हाला जेवणात दिले. चहा, कॉफी, बिस्किटे, नाश्ता, जेवण, सर्वच शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थित होते आणि पोटभर होते. त्यामुळे बाहेरचे खायला पोटात जागाच राहत नसे! बाहेरचे खाणे नाही, म्हणून तब्येत बिघडण्याची शक्यता देखील कमी झाली.
21 तारखेला सकाळी आम्ही दहा वाजता चितोडगड येथे पोहोचलो. आमच्याजवळ फक्त आमची एक सॅक आणि पर्स होती. बाकी दोन्ही मोठ्या बॅग्स डिकी मध्ये होत्या. चितोड गड येथे आम्ही "श्री जी" हॉटेलला जाताच आम्हाला लगेच चहा बिस्किटे देण्यात आली. पाच मिनिटात आमच्या rooms allot झाल्या. आणि आम्हाला direct रूम मध्ये जायला सांगितले. तुमच्या बॅग्स, तुमच्या रूम मध्ये बरोबर येतील असे सांगितले गेले. आणि खरच दहा मिनिटांनी आमच्या दोन्ही मोठ्या बॅग्स आमच्या रूम मध्ये पोहोचल्या. नंतर ताजेतवाने झाल्यावर आम्हाला नाश्ता देण्यात आला आणि चितोड गड पाहण्यासाठी सहा सहा यात्रेकरूंसाठी एक एक रिक्षा करून देण्यात आली तसेच एक गाईड आणि नरेश सोबत आला. 
चितोड गड पाहण्याची खूप उत्सुकता मनात होतीच. खूप सारे वळण घेऊन, चढ घेऊन रिक्षा चालत होती. रस्त्यावरची स्वच्छता आणि रस्त्यालगत असणारी भिंत मनात भरत होती. एव्हढ्या पूर्वीचे दगडाचे ते बांधकाम पाहून आश्चर्य वाटत होते. कित्येक वळण आणि चढ घेऊन आमची रिक्षा गडाजवळ थांबली. त्यावरूनच लक्षात आले, की गड किती उंच आणि भव्य, दिव्य असावा. आम्हाला आज जे प्रेक्षणीय स्थळ बघायचे होते, ते सर्व गडावरच होते, त्यामुळे रिक्षावाल्याने पुन्हा त्याच रिक्षाजवळ आम्हाला यायला सांगितले. गाईड आणि नरेश कायम आमच्या सोबत होतेच. महाले टूर्स ने दिलेल्या, पांढऱ्या रंगाच्या टोप्या सतत घालून ठेवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे आमचा ग्रुप आम्हाला आणि गाईडला ओळखायला सोपा झाला. आमची अजून गाडीतील इतर यात्रेकरूंशी ओळख झालेली नव्हती. पण पांढरी टोपी दिसली की, आपलाच ग्रुप आहे हे लगेच कळत होते. कारण इतर पर्यटकांचीही खूप गर्दी होती.
चितोड गड, विजय स्तंभ, मीराबाईचे मंदिर, जल महल पाहून खूप आश्चर्य वाटले. त्याकाळात कोणत्याही सोयी सुविधा नसतांना अशाप्रकारचे बांधकाम कसे केले गेले असेल, कोणता इंजिनियर असेल, कोणता आर्किटेक्चर असेल? ह्याचे खरोखरच कौतुक वाटले. त्या काळाची पडदा पद्धत, जोहार पद्धत ऐकून खूप वाईट वाटले. जोहार करण्यासाठी देखील स्वतंत्र सोय केलेली पाहून आश्चर्य, कौतुक आणि वाईट असे एकाच वेळी वाटले. आजचा  काळ चांगला की, तो काळ चांगला होता? या विचारांचें द्वंद्व मनात सुरू झाले. एकीकडे डोळे पाणावले होते, तर दुसरी कडे तेच डोळे गडाचं वैभव मनात आणि हृदयात साठवत देखील होते. बोटाला टाचणी लागली, तरी हळहळणारी आम्ही माणसे! एक आई आपल्या मुलीला पाठीशी बांधून कशी जोहार करत असेल. आईला निदान ती कशासाठी बलिदान करते आहे याची जाणीव तरी होती, पण त्या बालिकेच काय? तिला जेव्हा त्या धगधगत्या ज्वालेची झळ पोहोचत असेल, तेव्हा तिचा जीव काय म्हणत असेल? कल्पनाच केलेली बरी! आम्हा आजच्या युगात राहणाऱ्या, स्वच्छंदी बागडणाऱ्या, हवं ते सुख मिळविण्यासाठी काहीही करायला तयार होणाऱ्या स्त्रियांना, याची कल्पना तरी करता येईल का? असो
गाईड खूप चांगली माहिती देत होता. राजपूत राजांनी किती पराक्रम केलेले आहेत ह्याची पुन्हा पुन्हा  उजळणी होत होती. भव्य दिव्य चितोड गड पाहून, आपण आजपर्यंत राजस्थानात का आलो नाही, ह्याची खंत वाटली. खरं म्हणजे आपल्या भारतातच एव्हढी प्रेक्षणीय स्थळे आहेत, की एक जन्म अपूर्ण पडावा. अमृतघट भरले तुझ्या घरी का वणवण फिरसी बाजरी? तसे आम्ही बाहेरच्या देशात भटकतो, पर्यटन करण्यासाठी जातो, पण आम्हाला भारतातील प्रेक्षणीय स्थळे दिसत नाहीत! असो. 
दुसऱ्यादिवशी सकाळी पाच वाजता उठून सहा वाजेपर्यंत नाथद्वारसाठी निघालो. आज प्रत्येक यात्रेकरूने, माईक हातात घेऊन आपली स्वतःची ओळख करून दिली. त्यामुळे कोण कोठून आलेले आहे हे कळाले. बहुतेक यात्रेकरू नाशिक येथीलच होते, परंतू काही यात्रेकरू येवला, धुळे, पिंपळगाव आणि आम्ही मालेगांव येथून आलेलो होतो. थोडक्यात कसमादे पट्ट्यातीलच सर्व जण होते.  बहुतेक सर्व शिक्षक आणि प्राध्यापक होते. आज एकमेकांची ओळख झाल्यामुळे, सर्वजण आपापसात गप्पा करू लागले होते. गाडीत सकाळी सुरुवातीला प्रार्थना आणि एकदोन भजने देखील म्हटले गेले. वाडेकर साहेबाना गाण्याची प्रथमपासूनच आवड आहे, त्यामुळे ह्यांनी दोन गाणी म्हटली. त्यानंतर आम्ही श्रीकृष्ण मंदिराचे दर्शन घेतले. तेथे फारशी गर्दी नव्हती. हळदी घाट आणि नाथद्वार मंदिराचे दर्शन घेतले. नाथद्वार मंदिरामध्ये मात्र बरीच गर्दी होती, पण विशिष्ट पास काढून आम्हाला जरा कमी वेळात दर्शन झाले. (नाहीतरी आजकाल मंदिर म्हणजे उघडउघडपणे भाविकांना लुबाडण्याचे एक केंद्र झालेले आहे) त्यानंतर आम्ही उदयपूर कडे निघालो. कारण आमचा आजचा मुक्काम उदयपूर येथे होता. उदयपूर येथे आम्ही संध्याकाळी पोहोचलो. जेवण तयारच होते. जेवण करून  आम्हाला लगेच झोपण्यास सांगण्यात आले. सकाळी साधारण आठ वाजता तयार होऊन आम्ही सिटी पॅलेस बघण्यासाठी निघालो. नेमके त्याच दिवशी सिटी पॅलेस मध्ये साऊथच्या एका अनिवासी भारतीय (NRI) च्या मुलाचे लग्न होते. थोडक्यात, कोणातरी बड्या आसामीचे लग्न होते, त्यासाठी ज्युनिअर ट्रम्प देखील आलेला होता. त्यामुळे सिटी पॅलेस मध्ये अंतर्गत सजावटीची तयारी जोरात चालू होती, म्हणून पॅलेस अकरा वाजताच बंद होणार होता. सर्वात प्रथम रवीना टंडन चे लग्न सिटी पॅलेस मध्ये झाले आणि त्यानंतर श्रीमंत हौशी मंडळींना ती सवयच जडली. त्यामुळे बऱ्याच वेळा येथे अशी शाही लग्न होऊ लागलीत. आसपासची सर्व मोठी हॉटेल त्यामुळे बुक होतात. अशी माहिती गाईडने आम्हाला दिली. सिटी पॅलेस पाहण्याची उत्सुकता खूपच होती. आणि खरोखरच तो पाहून डोळ्याचे पारणे फिटले. समोर दिसणारा फत्तेसागर तलाव, प्रत्येक मजल्यावर चढल्यानंतर देखील प्रत्येक मजला हा तळ मजलाच आहे असे वाटते आणि तो आहेच. कारण पॅलेसची रचनाच अशी करण्यात आलेली आहे की, सगळ्यात वरच्या मजल्यावर देखील जमिनीत आपल्याला मोठमोठी झाडे लावलेली दिसतात. पॅलेसच सौंदर्य आणि बांधकामाच तर मी काय वर्णन करू? त्यासाठी तो प्रत्यक्षच पाहणेच योग्य ठरेल. तो शीश महल, तो राज्याभिषेक चौक, तेथील दरवाजे, ते जिने कसलं कसलं वर्णन करणार? खरखरच अवर्णनीय! त्या काळात एव्हढे अवाढव्य बांधकाम, त्याच्या सौंदर्यात कोठेही कमतरता न सोडता कसे पूर्ण केले गेले असेल? आपले मस्तक खरच त्या कारागिरांपुढे, त्या राज्यकर्त्यापुढे नतमस्तक होत. डेकोरेशनचा आम्हाला म्हणावा तसा त्रास झाला नाही. ही एक चांगली गोष्ट झाली. आम्ही बरोबर अकरा वाजता पॅलेस मधून बाहेर पडलो आणि तिकीट खिडकी बरोबर अकरा वाजताच बंद झाली. आमचे नशीब चांगले होते, म्हणून आम्हाला संपूर्ण पॅलेस व्यवस्थित पाहता आला. आणि विशेष म्हणजे, घनश्याम नावाचा उत्कृष्ट गाईड देखील आम्हाला मिळाला होता .त्याने अतिशय सुंदर माहिती आम्हाला पॅलेस पाहताना दिली. तो त्या दिवशी दिवसभर आमच्या बरोबरच होता. पॅलेस पाहिल्यानंतर आम्ही फत्तेसागर तलावाला भेट दिली, तेथे बोटिंग केले. त्यानंतर पवित्र अशा हळदी घाटीचे दर्शन घेतले आणि प्रतापस्मारक पाहण्यासाठी पुढे निघालो. प्रतापस्मारक पाहताना महाराणा प्रतापांच्या शौर्याने मन भरून आले. त्यांची देशासाठी त्यागाची वृत्ती पाहून नकळत त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी होऊ लागली! परंपरेने मिळालेले राजवैभव सोडून, ऐश्वर्य सोडून ही प्रतापी व्यक्ती गुहेमध्ये जाऊन राहते, झाडाच्या पानांवर जेवते, किती देशभक्तीने प्रेरित झालेली माणसे ही?
प्रतापस्मारक येथे त्यांच्या प्रकरणाची गाथा सांगणारे अनेक हुबेहूब देखावे आपण पाहू शकतो. एक दहा पंधरा मिनिटांचा माहितीपट देखील तेथे आपल्याला दाखविण्यात येतो. हे सर्व पाहून आम्ही सहेलियोंकी बाडी पाहण्यासाठी गेलो. त्या काळात स्त्रीयांना पुरुषाच्या बरोबर बाहेर जाण्यास परवानगी नव्हती,  त्यासाठी राजा संग्रामसिंगांनी स्त्रियांसाठी ही बाग बनविली. विजेचा शोध लागलेला नसतांना निव्वळ गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर, बागेत ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कारंजे आपल्याला मंत्रमुग्ध करतात. प्रवेश करताच आपल्या अंगावर तुषारांची बरसात करणारे वेलकम फाऊंटन, डोळे बंद करताच पाऊस पडण्याचा भास होणारे सावन भादो, बिन बादल बरसात, आपल्याला वेड लावतात. या बागेत देखील मन खूपच रमून जाते. परत येताना आम्हाला संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी आम्ही परत येताच आम्हाला लवकर जेवण देऊन, उद्या सकाळी आपल्याला पाच वाजताच बाहेर पडायचे आहे, म्हणून सांगण्यात आले. त्यासाठी सकाळी चार वाजताच सगळ्यांना नरेश उठवायला आला. बहाद्दर, जोपर्यंत आपण दार उघडत नाहीत, त्याने आपल्याला उठलेले पाहिले नाही, तोपर्यंत त्याचे दार ठोठावणे चालूच राहत असे. त्यामुळे कोणी उठलाच नाही, अस कधी झालं नाही. त्यानंतर तो चहा साठी बोलवायला येत असे. लगेच बॅग्स तयार ठेवण्यासाठी येत असे. नंतर बॅग्स घ्यायला येई. आणि सगळ्यात शेवटी चला चला सांगायला येई! म्हणजे चार ते पाच या एका तासात त्याच्या किती तरी चकरा होत! कितीतरी वेळा ते होटेलचे माळे चढत आणि उतरत असे. ठरल्याप्रमाणे खरोखरच आम्ही सव्वा पाच वाजता गाडीत येऊन बसलो. गुलाबी थंडी आणि सर्वत्र अंधार! अशा वातावरणात आमची बस माउंट अबू कडे निघाली. आज आम्हाला माउंट अबू पाहून, संध्याकाळी जोधपूर येथे पोहोचायचे होते. माउंट अबू आमचे 32 वर्षापूर्वी एकदा पाहणे झाल्यामुळे मला माउंट अबूचे एव्हढे आकर्षण नव्हते. तरीही तेथील दिलवाडा टेम्पल, निक्की झील आम्ही पाहिले. निक्की झील मध्ये आम्हाला सोबत देण्यात आलेला नाश्ता आम्ही खाल्ला. प्रजापिता ब्रम्हकुमारी हॉल काही कारणास्तव बंद होता. तो आम्हाला पाहता आला नाही. आम्ही लगेचच जोधपूर कडे निघालो कारण तीन/साडेतीन तासाचा प्रवास आम्हाला अजून करायचा होता. संध्याकाळी साधारण सात वाजता आम्ही जोधपूर येथे येऊन पोहोचलो. "रॉयल डिझायर" या हॉटेलला आम्ही उतरलो. नेहमीप्रमाणे आम्ही फक्त सॅक आणि पर्स घेऊन खाली उतरलो. पाच मिनिटात मोठ्या बॅग्स आमच्या रूम मध्ये आल्या! आणि हे अस आता प्रत्येक ठिकाणी होत होत!  44 यात्रेकरूंच्या जवळ जवळ 50 बॅग्स आणि स्वतःचे सामान, संपूर्ण किचन, संध्याकाळी पाच वाजता जेथे असू, तेथे चहा तयार करणे, बिस्किटे देणे, ही सर्व कामे, किचन स्टाफ आणि आमचे गाडीचे चालक आणि मालक श्री रतन चौधरी हे करत. श्री रतन चौधरी सरांचे तर कौतुक करावे तेव्हढे कमीच होईल. एव्हढा उत्साह ही मंडळी कोठून आणतात, हा मोठा प्रश्नच आहे. रतन चौधरी स्वतः एव्हढे ड्रायव्हिंग करून, लगेच आम्हाला वाढण्यासाठी, आमची खाण्यापिण्याची वैयक्तिक चौकशी करण्यासाठी ताजेतवाने होऊन उभे राहत, तेव्हा त्याचं खरच आश्चर्य वाटत होत. बर ही व्यक्ती फक्त गाडीची चालक आणि मालकच आहे का? नाही अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापक, उत्कृष्ट मार्गदर्शक, उत्कृष्ट गाईड, सरळ मार्गाने चालणारी, प्रत्येकाला योग्य तो सल्ला देणारी, वैचारिक बाबतीत म्हणाल तर भल्याभल्यांनाही मागे टाकणारी, असामान्य व्यक्तिमत्वाची ही व्यक्ती आहे. ते उत्तम शेर शायरी देखील करू शकतात! म्हणजे शायर देखील आहेत. त्यांच्या आईने त्यांचे नाव अगदी योग्य असेच ठेवले आहे. आणि तेही त्या नावासाठी पात्र आहेत. सर्व स्त्रीयांना, कोठेही काहीही खरेदी करू नका असे हक्काने सांगणारी, गाडीतील एकमेव व्यक्ती म्हणजे रतन चौधरी! नाहीतर अशी हिंमत आहे का कुणाची? गमतीचा भाग सोडून द्या, पण खरच जेव्हा जेव्हा आपण पर्यटन करताना खरेदी करतो, तेव्हा त्यातील कोणतीच वस्तू आपल्याला चांगल्या प्रतीची, स्वस्त आणि मस्त मिळत नाही. जेथे जातो तेथे प्रेक्षणीय स्थळ बघावीत, ती डोळ्यात साठवावित. दुर्मिळ पदार्थ असेल, तर तो अवश्य चाखावा, दुर्मिळ वस्तू असेल तर अवश्य  घ्यावी, पण विनाकारण घरात कचरा आणूच नये. ज्याला आपण भेट म्हणून ती वस्तू देऊ, त्याला ती नाही आवडली तर आपली एव्हढी हमाली आणि पैसे वाया जातात. आपल्या स्थानिक बाजारपेठेत जे मिळत, त्याहून स्वस्त आणि टिकावू अस दुसरीकडे कधीच मिळत नाही. स्थानिक बाजारातून आणलेली वस्तू, आपल्याला नाही आवडली, तर आपण त्या दुकानात जाऊन परत करून येऊ शकतो. जाऊ द्या . हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . 
महाले टूर्सचा सर्व किचन स्टाफ आणि त्यांचे सहकारी देखील खरोखरच प्रशोशनेस पात्र आहेत. मग ते महाराज असो, अशोक असो, नरेश असो, सोनू असो, पांडुरंग असो की विमल मावशी, आणि लक्ष्मी मावशी असो. सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट सेवा दिली. सकाळी प्रत्येकाला उठविण्यापासून तर रात्रीचे जेवण आग्रह करून करून वाढण्यापर्यंत! आम्ही सर्व प्रवासी दमून आलो म्हणून, लिफ्ट ने जात होतो तर लिफ्टला गर्दी आहे, म्हणून हे बिचारे आमच्याबरोबर प्रवास करून, आमच्या बॅग्स आणि त्यांच्या किचनचा सर्व सामान, जिन्याने घेऊन जात होते. मला वाटत या विषयी थोड्या सूचना श्री रतन चौधरी यांनी यात्रेकरूना केल्या तर बर होईल. म्हणजे या लोकांचे विनाकारण होणारे श्रम वाचतील. ही सर्व मंडळी लगेच स्वयंपाक करत असत. आम्ही ताजेतवाने होत नाहीत, तोपर्यंत जेवणासाठी आम्हाला बोलवायला येत होते. लगेच गरमागरम स्वयंपाक आग्रहाने वाढत होते. बाहेर कोठे गेलो की, कुणी त्यांना फोटो काढायला सांगत होत, तर कोणी आपली पर्स सांभाळायला देत होत. तर केव्हा केव्हा ते  मागे रेंगाळलेल्या यात्रेकरूंना चार चार वेळा पुन्हा पुन्हा बोलवायला जात होते. नरेशचा या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन. तो एकच गड किंवा स्थान त्यासाठी चार चार वेळेस चढत होता. 
आमचे सर्वच सहप्रवासी गमतीदार, उत्साही आणि रसिक होते. एकेकाचा उल्लेख करणे, येथे शक्य नाही पण मी एवढेच म्हणेन की, अशी संगत लाभणे हे आमचे भाग्यच म्हणावे. प्रवासाचा वेळ कोठे जात होता ते कळत देखील नव्हते. सतत  गमतीजमती चालूच राहत. कधी थट्टामस्करी! कधी गाण्यांची अंताक्षरी ! तर कधी कोणाची नक्कल! वाडेकर साहेबाना वेगवेगळ्या गाण्यासाठी फरमाईश येत होती. त्यांचे सगळेच जुने गाणे पाठ असल्यामुळे आणि खूप छान म्हणता येत असल्यामुळे सगळ्यांचीच करमणूक होत होती. जवळ जवळ सगळेच जेष्ठ नागरिक होते, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या जोडीदाराला तर सांभाळत होताच, पण इतरांनाही सांभाळत होता. ज्या काही दोन तीन तरुण व्यक्ती होत्या  त्यांना असे वाटत होते, की या सर्व जेष्ठ नागरिकांची जबाबदारी आपल्यावरच आहे! ते हिरीरीने येईल ते काम करत होते! आणि सर्वांना  मदत करीत होते. असो.
जोधपूर येथून सकाळी आम्ही चहा नाश्ता करून साधारण नऊ वाजता,  उम्मेद पॅलेस पाहण्यासाठी निघालो. तो ही पॅलेस अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असाच होता. त्यातही vintage cars खूपच खास वाटल्या आणि त्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. हे एकाहून एक सरस पॅलेस पाहून त्या राजांच्या राजवैभवाची आपल्याला थोडी का होईना पण कल्पना येते. शिवाय अजूनही त्याचे वारस पिढ्यानपिढ्या त्या पॅलेस मध्ये राहतात, त्यांना योग्य तो मानसन्मान मिळतो. याचेही खूप आश्चर्य वाटते.
पॅलेस पाहून झाल्यानंतर आम्ही  रस्त्याने लागणाऱ्या एक खात्रीच्या दुकानात जाऊन, येथील परंपरागत  बांधणी आणि लहरिया साडी तसेच ड्रेसेसची खरेदी केली.(येथे स्वतः  रतन चौधरीच आम्हाला घेऊन गेले होते आणि येथे खरेदी केली नाही तरी राजस्थानमधील कलाकारी तरी पहा, असे त्यांनी आवर्जून सांगितले) त्यानंतर मेहरानगड पाहण्यासाठी आम्ही निघालो. मेहरानगड हा ही गड असाच भव्य दिव्य! त्याकाळचे वैभव सांगणारा! जवळ जवळ पंधरा मजले उंच असणारा! अतिशय स्वच्छ आणि सुंदर! येथे बारा मजल्यापर्यंत लिफ्ट असल्यामुळे विशेष जाणवले नाही. पण तरीही फक्त तीन मजले पाहत पाहत आणि चढत चढत आम्ही थकून गेलो. हे राजस्थान मधील गड आणि पॅलेस पाहताना त्या गडाची आणि पॅलेस ची स्वच्छता मनात भरून राहते. त्याचे त्या काळातील वैभव तर विचारुच नका! त्या समृध्द जगात आपण खरोखर जाऊन येतो. त्यानंतर  रामदेवरा साठी आम्ही साधारण दोन अडीच वाजता निघालो आणि संध्याकाळी सात वाजत येथील "नीळकंठ हॉटेल" मध्ये येऊन पोहोचलो. श्री रतन चौधरी ह्यांनी सांगितल्याप्रमाणे 10/15 मिनिटात ताजेतवाने होऊन रामदेवरा ह्याच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि येताना सगळ्यांनी थोडी थोडी खरेदी केली. दुसऱ्या दिवशी आम्हाला एका दिवसाचे कपडे आणि साहित्य घेऊन एक बॅग तयार  करावयाची होती आणि अशी बॅग आमच्याजवळ नव्हती, म्हणून आम्ही एक बॅग विकत घेतली, आणि आमचं कमी सामान आहे, छोट्या बॅग्स आहेत, ह्याची उणीव भरून काढली.😜
रात्रीचे जेवण करून, शांतपणे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी खूप घाई नव्हती. चहा, कॉफी, नाष्टा करून साधारण नऊ वाजता आम्ही हॉटेल सोडले. त्या अगोदर एक दिवसाचे कपडेलत्ते चौधरी दादानी वेगळे घेण्यास सांगितले होते, ती एक वेगळी बॅग घेतली. साधारण एक तासात आम्ही जैसलमेर येथे पोहोचलो. जैसलमेर येथे प्रथम हवेली पाहिली. अतिशय छोट्या गल्ली बोळातून आम्हाला आमचा गाईड घेऊन गेला. त्या अरुंद गल्लीच्या दुतर्फा मोठ मोठ्या हवेल्या दिसत होत्या. अतिशय कलाकुसरीने दगडावर आणि संगमरवरी वर केलेले कोरीव काम बघत रहावस वाटत होत. पण खाली चालताना एव्हढे अस्वच्छ वाटत होते की विचारता सोय नाही. सर्व ठिकाणी सांडपाणी आणि शेण! कित्येक दिवस गल्लीला झाडू सुद्धा मारलेला नसावा असे वाटत होते. बऱ्याच मोठ मोठ्या  हवेल्याना कित्येक दिवसांपासून कुलूप लागलेले असावे असे वाटत होते आणि तसे होतेच कारण बाहेर कुणीच दिसत नव्हते.  काही हवेल्यांमध्ये माणसे राहतात असे गाईडने आम्हाला सांगितले. ज्या हवेलीमध्ये माणसे राहत होती त्या मध्ये किती स्वच्छता होती माहीत नाही, पण बाहेर तर अजिबात स्वच्छता दिसत नव्हती. एक प्रकारची उदासीनता त्या हवेल्यामध्ये आणि आजुबाजूच्या वातावरणात दिसत होती. आम्हाला अशीच एक हवेली पाहण्यासाठी जायचे होते, ती हवेली आली. जशी अरुंद गल्ली, तसेच हवेलीच्या आतील जिने! अगदीच अरुंद, अंधारलेले आणि सरळ उभे! मोठ मोठ्या पायऱ्या. आमच्या बरोबर सर्व यात्रेकरू वयस्कर होते,  कोणाला बीपीचा त्रास, तर कोणाला मधुमेह, तर कुणाला गुडघेदुखी! त्यामुळे सगळ्यांचीच चालताना दमछाक झाली. हवेलीमध्ये गेल्यानंतर गाईडने त्याचे स्वागत कक्ष, बैठकीची खोली, व्यवहाराची खोली, किचन, बेडरूम ते वापरत असलेल्या मोठ मोठ्या डेगा, ताक तयार करायचे भाडे रवी, कढया ! सारेच दाखविले. परतू  ह्या सगळ्या खोल्या खूपच दाटीदाटीने बांधलेल्या आहेत असे वाटत होते. खोल्यांची संख्या बाकी खूप जास्त  होती. मोजता येणार नाही, किंवा लक्षातही राहणार नाही एव्हढी ! जिने आणि खोल्या! कमी जागेत खूपच खोल्या!  पर्यटकांची गर्दी पण जास्त होती. पायावर पाय पडतो की काय अशी भीती वाटत होती. जीव अक्षरशः गुदमरायला लागला होता. केव्हा एकदा या हवेलीच्या बाहेर पडतो अस झालं होत. पण त्यांच्या खोल्या काही संपत नव्हत्या. त्याच्या स्वयंपाकाची भांडी, रॉकेलवर चालणारा फ्रिज, रॉकेलवरच चालणारा पंखा पाहण्यासारखे होते. एकीकडे त्यांची सुबत्ता दिसत होती, तर एकीकडे ते एव्हढ्या छोट्या छोट्या खोल्यामध्ये हे का राहत होते, हा गहन प्रश्न पडला होता. शेवटी एकदाचे हवेलीच्या गच्चीवर गेलो तेव्हा थोड मोकळं वाटल. पण तरीही आजुबाजूला अतिशय दाट हवेल्या! जिकडे पाहावे तिकडे हवेल्याच हवेल्या! एक एक व्यक्तीच्या मालकीची ही एव्हढी मोठी हवेली! बापरे!! आणि आता त्यांना कुलुपे लावलेली! त्या ओस पडलेल्या!  वरच्या मजल्यावरून जैसेलमेरचा किल्ला दिसत होता. आम्ही गर्दीतून वाट काढत, जेवढ्या लवकर खाली येता येईल तेवढ्या लवकर खाली आलो. आम्ही गेलो होतो, त्यापेक्षा अधिकच अरुंद बोळातून किल्ल्याच्या ठिकाणी आलो. किल्ल्यावरही बरीच गर्दी होती. परतू हवेलीपेक्षा थोडा बरा मार्ग आहे अस वाटलं, पण कसलं काय. चार दरवाजे ओलांडून आणि त्याचा चढ चढून आम्ही दसहरा चौक म्हणून एक चौक होता तेथपर्यंत आलो, तो मार्ग थोडा बरा होता. पुढे दुतर्फा हॅण्डिक्राफ्ट ची दुकान लावलेली होती.  त्यामुळे होती नव्हती ती जागा त्यांनी अडवून ठेवली होती. काही लोक गडावर  राहत होते, त्यांची संख्या जवळ जवळ साडेचार हजाराची आहे, असे गाईडने सांगितले. त्यांची आणि दोनचाकी गाड्यांची पण वर्दळ होतीच  पर्यटकांची वेगळीच गर्दी! कसे बसे आम्ही पार्श्व नाथांच्या मंदिराचे दर्शन घेतल आणि जवळ जवळ एक दीड किलोमीटर पायीच मेन रोड पर्यंत चालतआलो. तेथे आमची बस आली आणि दुपारी अडीच वाजता आम्ही सॅम सँड च्या दिशेने कूच केले.
आता रस्त्याने मेलोन मैल वाळूच वाळू! ओसाड पडलेली जमीन , तिला केलेले दगडांचे कंपाऊंड , कोठे तरी एखादी ओस पडलेली हॉटेल! तुरळक काटेरी बाभळी, थोडी फार रुईची झाडे आणि समुद्राची असते तशी, पण अथांग पसरलेली बारीक वाळू ह्यांचे दर्शन झाले. न कसली वस्ती, ना पेट्रोल पंप, ना दुकाने ना मनुष्य प्राणी! सगळ कस निर्मनुष्य! आपण आता खरोखरच वाळवंटात आलो आहोत आणि रेगीस्तान म्हणतात ते हेच!  हे आता समजले. प्यायला पाणी नाही अशा ठिकाणी, अशा वाळूत ही येथील मंडळी काय शेती करणार? काय व्यवसाय करणार? मग त्यांनी जोपासली आपली अंगभूत कला! जे येथे दगडात, संगमरवरी दगडात कोरीव काम करतात, ते दुसरीकडे, परराज्यात जाऊन लाकडात करायचे, मुर्त्या घडवायच्या, स्वयंपाकाचे वेगवेगळे पदार्थ करून लोकांना खाऊ घालायचे. मग कोणी राजस्थानी मूर्तिकार झाला, तर कोणी सुतार, तर कोणी आचारी! पोटासाठी त्याच्यातील हे कला वैभव कामात आलं! दुसरा पर्यायच त्यांच्यासमोर नव्हता.
तीन सव्वा तीन पर्यंत आम्ही सॅम सँड ला येऊन पोहोचलो. सॅम सँड येण्यापूर्वी आम्हाला भरपूर उंटाच, उंट गाड्यांचं दर्शन झालं! सॅमसँड येथे "मालरा हेरिटेज कॅम्प" या हॉटेलला येताच आम्हाला आमच्या टेन्टमध्ये, आमची बॅग घेऊन जाण्यास सांगण्यात आले. आणि लवकरात लवकर ताजेतवाने होऊन यायला सांगितले. टेन्टमध्ये आम्ही प्रथमच राहणार होतो, टेन्ट खरोखरच चांगला होता. संडास बाथरूम अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके होते. हॉटेलमध्येच काय पण सर्वत्र पांढरी स्वच्छ वाळू दिसत होती. आम्ही फ्रेश होऊन चहा बिस्किटे घेतली आणि उंटाच्या सफारीला निघालो. त्या सफारीची सोय श्री रतन भाईंनीच अगोदरच करून ठेवलेली होती. आयुष्यात प्रथमच उंटावर बसत होतो. त्यामुळे खूप भीती वाटत होती. मुळात उंट उंचच असतो, त्यात आमचा उंट अजूनच जास्त उंच होता, ऊंट खाली बसलेला असताना देखील मला त्यावर लवकर बसता येईना, पण ह्यांनी मला एखाद्या लहान मुलीला पकडून उंचावर बसवावे, तसे बसवून दिले. ऊंट उठताना बऱ्यापैकी भीती वाटली. तो चालत असताना काही कमी भिती वाटत होती असे नाही, पण मज्जाही येत होती. आम्हाला ऊंट चालविणाऱ्याने उंटावर, सनसेट पॉइंट पर्यंत सोडले. येताना बाकी आम्ही उंटाच्या गाडीने हॉटेलला परत आलो आणि ऊंट गाडीचाही आनंद मिळविला. तेथून आल्यानंतर राजस्थानच्या परंपरेनुसार आमचे औक्षण करून, वाद्य वाजवून स्वागत करण्यात आले. राजस्थानी पारंपारिक ड्रेस परिधान केलेल्या तरुणीने आमचे स्वागत केले. आमच्या टेन्ट समोरच राजस्थानी कलाकारांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. गोलाकार अशी ती बिछायत होती. पुढे गादी आणि लोड, त्यांनतर खुर्च्या! तो कार्यक्रम सात वाजता चालू झाला. वातावरणात गुलाबी थंडी होती. आम्हाला भजे आणि चहा देण्यात आला. खूप छान वातावरण निर्मिती झाली. कार्यक्रमात प्रथम  भजनासारखे गाणे झाले, त्यानंतर एका कलाकाराने आगीचा टेंभा पेटवून,  त्याचे निरनिराळे प्रयोग करून दाखविले. त्यानंतर त्या गोलाकार प्रांगणात, मध्यभागी शेकोटी पेटवून, त्या भोवती फेर धरून राजस्थानी तरुणींनी पारंपरिक वेशात, काही राजस्थानी लोकगीत, तर काही चित्रपटातील गीतांवर नृत्य केले. सर्व प्रेक्षक देखील त्यांच्या नृत्यात सहभागी झाले होते. हा सगळाच अनुभव नवीन आणि उत्साहवर्धक होता. रात्री दहा वाजेपर्यंत हे नाच गाणे चालू होते. 
राजस्थानी कलाकारांचा अजून एक पैलू आम्हाला समजला. 
दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजताच आम्हाला उठविण्यात आले. आणि साडेपाच वाजता आम्ही बिकानेरसाठी रवाना झालो. जैसलमेर ते बिकानेर बरंच अंतर आहे. आम्ही रस्त्यातच सकाळी नऊ वाजता गरमागरम नाश्ता केला. आणि परत पुढील प्रवास सुरू केला. साधारण दीड वाजेच्या सुमारास आम्ही बिकानेर येथे पोहोचलो. येतानाच बिकानेरचा सुप्रसिद्ध जुनागड किल्ला पाहिला, हा किल्ल्याही पाहण्यासारखा आहे,  किल्ल्याच्या एका भागात होळी चौक, राजदरबार, डायनिंग टेबल, काही  स्वयंपाक घरातील वस्तू, त्याही सोन्या चांदीच्या ठेवण्यात आलेल्या आहेत. काही शाही घराण्यातील व्यक्तीचे पोशाख, कॅमेरे, पंखे, निरनिराळ्या प्रकारचे हत्यारे, राजांनी केलेल्या शिकारी,  शीश महल, दरबार चौक, वेगवेगळी अस्त्रे, शस्त्रे, आहेत. बारा बारा फुटांच्या दोन लांबच लांब बंदुका देखील होत्या. असंख्य गोष्टी आम्हास तेथे पहावयास मिळाल्या. किल्ल्याच्या  दुसऱ्या भागात म्युझियम आहे. त्यावरूनच किल्ल्याच्या भव्यतेची आपणास कल्पना येईल. 
त्यानंतर आम्ही लालगड किल्ला पाहण्यासाठी गेलो. त्या गडाचे रूपांतर एका शाही हॉटेलमध्ये करण्यात आलेले आहे. तेथे आम्ही गेलो तेव्हा दुरूनच सजावट चालू आहे हे दिसत होते, बँडचा आवाज येत होता. म्हणजे थोडक्यात तेथेही आज लग्न होते. किल्ल्याच्या थोड्या भागात येथेही म्युझियम होते. या किल्ल्याच्या उर्वरित भागात राजघराण्यातील वंशज राहतात. यावरूनच आपल्याला राजाच्या वैभवाची आणि संपन्नतेची कल्पना येईल. दोन्ही गडावर जवळ जवळ सर्वच ठिकाणी सोन्या चांदीचा मुलामा, नैसर्गिक रंग वापरून बनविलेली पेंटिंग्ज आणि भिंती, दरवाजे आपणास पहावयास मिळतात. हे सगळ पाहून चार वाजता आम्ही आमच्या बिकानेर येथील "मरुधर हॉटेल"ला परतलो. आज बिकानेर मध्ये वैयक्तिक खरेदी करण्यासाठी श्री रतन चौधरी सरानी वेळ दिलेला होता. पण आम्हा दोघांनाही काहीच खरेदी करावयाची नव्हती, म्हणून आम्ही रूम मध्येच थांबलो. आराम केला, थोडे प्रवास वर्णन लिहिले. कारण प्रवास वर्णन ताबडतोब लिहिले, तर सर्व बाबी जशाच्या तशा आठवतात, वेळ गेल्यानंतर काही मुद्दे सुटून जातात. असा माझा स्वतः चा अनुभव आहे. म्हणून मी रात्री कितीही थकलेले असले, दमलेले असले, तरी त्या दिवसाचे प्रवास वर्णन शक्यतोवर त्याच दिवशी लिहित होते. 
दुसऱ्या  दिवशी सकाळी लवकर तयार होऊन आम्हाला पुष्कर गाठायचे होते.
सकाळी साडेपाच वाजताच आमची बस बिकानेर येथून पुष्कर कडे जायला निघाली. थोड्याच वेळात करणी मातेचे, भरपूर उंदीर असणारे मंदिर आहे, तुम्ही दर्शन घेऊन या, अस आम्हाला रतन भैयानी सांगितले. नुकतंच उजाडत होत, थंडीही होती. आम्ही सॉक्स वगैरे घातलेले होते, ते आम्हाला मंदिराच्या बाहेर असणाऱ्या व्यक्तीने काढण्यास  सांगितले. देवाविषयी वाईट बोलू नये, म्हणू नये, पण मंदिरात प्रवेश करण्याअगोदरच मला उंदराचा, त्यांच्या विष्ठेचा, मलमूत्राचा वास येऊ लागला. मंदिरात सगळीकडे उंदीरच उंदीर होते. त्यांना खाण्यासाठी फुटाणे आणि इतर खाद्यपदार्थ ठेवलेले होते. मोठमोठे उंदीर इकडून तिकडे पळत होते. मला भीती आणि किळस वाटत होती. केव्हा एकदा यातून बाहेर पडते अस झालं होत. इतर यात्रेकरू मात्र त्या उंदराचे व्हिडीओ  काढण्यात दंग होते. मंदिराच्या बाहेर येताच बर वाटल. पण उंदरांचा वास येत आहे, असा भास कायम होत होता. पाय केव्हा एकदा धुवू, अस झालं होत! पण वेळच मिळत नव्हता. आमची गाडी आता पुष्करला निघाली होती. रतन भैय्यानी पुष्कर येथील पुरोहित कसे लुटतात, ह्याची सूचना वजा  कल्पना अगोदरच देऊन ठेवलेली होती. गर्दी पण खूपच होती. आम्हाला एक पुरोहित ब्रम्ह देवाच्या मंदिरात घेऊन गेला. त्यानंतर पुष्कर सरोवराला घेऊन गेला. पुष्कर सरोवर मंदिरापासून साधारण तीनशे मीटर लांब असेल. सरोवरावर पोहोचल्यानंतर त्या पुरोहिताने सरोवराची आणि ब्रम्ह मंदिराची कहाणी आम्हाला सांगितली. सरोवराच्या पाण्यात हातपाय धुवून येण्यास सांगितले. मी करणीमंदिरातून निघाल्यापासून हातपाय धुण्याचीच वाट पाहत होते, माझं ते काम झालं! त्यानंतर  त्या पुरोहिताने आम्हाला तर्पण करावयास लावले. ज्यांनी स्वेच्छेने दान दिले त्यांचीही पावती फाडली. ज्यांनी नाही दिले किंवा ज्यांची देण्याची इच्छा नव्हती, त्यांच्याकडून जबरदस्तीने वसूल केले. पुन्हा एकदा मंदिरात कसे लुबाडले जाते, ते दिसले! सरोवरापासून निघून आम्ही तडक गाडीजवळ आलो. काही यात्रेकरू स्रीयांनी तेथेही खरेदी केली. आमची गाडी साधारण सव्वा दोन वाजता पुष्कर मधून निघाली आणि रस्त्यात चहापाणी करून आम्ही सव्वा सात वाजता जयपूर येथे "हॉटेल प्राईम" मध्ये आलो. जयपूर येथे आमचा दोन रात्र मुक्काम होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी एव्हढी घाई नव्हती, म्हणून सहा वाजता आम्हाला उठविण्यात आले. मला स्वतःला कोणी सहा वाजता उठायला सांगितले की, मी साडेपाच लाच उठणार. नेहमी सगळ्याच्या अगोदर मी तयार व्हायला हवे, असे मला वाटते. माझा तो गुण आहे की अवगुण, मला माहित नाही. पण एव्हढ्या बारा दिवसाच्या यात्रेत जेव्हा जेव्हा नरेश आम्हाला उठवायला आला, त्या अगोदरच मी ऊठलेलेच काय पण माझी अंघोळ देखील झालेली राहत असे. तर आज आम्हाला जयपूर मधील स्थानिक स्थळच बघायचे होते. आम्ही सकाळी चहा नाश्ता करून आठ वाजता मोती डोंगरी, म्हणून जे गणपतीचे मंदिर आहे, तेथे गेलो, त्याच्या जवळच पंचमुखी हनुमानाचे मंदिर होते, तेथेही आम्ही दर्शन घेतले. दर्शन खूपच छान झाले. जयपूर शहराचे वैशिष्ट म्हणजे, हे पूर्वीपासूनच नियोजित  शहर आहे, शहराची रचना अशीच करण्यात आलेली आहे की, समोरासमोर मंदिर, समोरासमोर दुकाने!  शहराचे विभाजन तीन भागांमध्ये झालेले आहे. जवळ जवळ पन्नास किलोमीटर मध्ये शहर वसलेले आहे. शहराचा एक भाग जुना भाग, दुसरा भाग गुलाबी रंगात आहे, म्हणून ते पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते. त्या एरियामध्ये सगळ्यांना घराला गुलाबी रंग देणे, आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. आणि तिसरा भाग हा नवीन एरिया म्हणून ओळखला जातो. ही सर्व माहिती आम्हाला हॉटेलमधून बाहेर पडताच गाईडने दिली. आम्हाला महाले टूर्सने बिकानेर सोडले तर प्रत्येक ठिकाणी खुप चांगला गाईड दिलेला होता. जयपूरचा गाईडही अतिशय सुस्वभावी आणि गमतीदार होता त्याचे नाव दारा होते. आम्ही त्याला गमतीने दारासिंग म्हणायचो! त्यानंतर आम्ही आमच्याच बसने बिर्ला मंदिर पाहण्यासाठी निघालो, आणि पावणे नऊ वाजताच बिर्ला मंदिरात पोहोचून गेलो. बिर्ला मंदिर नऊ वाजता उघडणार होते. तोपर्यंत काही यात्रेकरूंनी फोटो काढले, तर काही मंदिराच्या मध्ये जाऊन बसले. थोड्यावेळात मंदिर उघडून आरती झाली. हे ही बिर्ला मंदिर इतर बिर्ला मंदिर असतात तसे स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके होते. बिर्ला मंदिरातून दहा सव्वा दहाला आम्ही हॉटेलमध्ये आलो. आमचे break fast cum Lunch तयारच होते. आम्ही गरमागरम जेवण करून पुन्हा आमच्याच बसने अमरगढ पाहण्यासाठी निघालो. काही अंतरापर्यंत आमची बस गेली, पण पुढे, आम्हाला जीपने जावं लागलं. रस्त्यात खूपच वाहतूक कोंडी होती . त्यामुळे जीपनेही आम्हाला खूप वेळ लागला. जीपने एका विशिष्ट अंतरावर आम्हाला सोडले आणि पुढे आम्ही आमच्या गाईड बरोबर चालू लागलो. पर्यटकांची खूपच गर्दी होती. राजस्थानातील प्रत्येक गड हा येथील राजाच वैभव सांगतो. हा गड देखीलअसाच उंचावर होता.  राजाला बारा राण्या होत्या. म्हणून बारा राण्यांच्या राहण्याची, सूर्य स्नानाची, स्पाची सोय केलेली होती, त्याना गरमी जाणवू नये, म्हणून गडावर उंचावरून पाणी सोडून, एका संगमरवरी चारीमधून ते पाणी राणीच्या महालात आणून थंडावा निर्माण केला जात होता, त्यात केशराची शेती करून, केशरयुक्त सुवासिक पाणी राणीला मिळावे म्हणून राजाने केशर उत्पादनाचे  प्रयत्नही केले होते, पण केशरची शेती करण्यात राजाला यश मिळाले नाही. हे त्याचे आणि राणीचे दुर्दैव!  त्या गडावर राणीला फिरण्यासाठी बगीचा, कारंजे, विविध प्रकारची फुलझाडे! शीश महल सर्वच होते!  प्रथम सांगितल्याप्रमाणे सगळ्याच राजाचं वैभव अवर्णनीय! आणि त्यांनी जे जे प्रयत्न केले, सुख सोयी केल्या त्या त्या सर्व राण्यांसाठीच!  सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही प्रथम जीपने आणि नंतर बस ने खाली आलो. त्यानंतर सवाई मानसिंह द्वितीय यांनी बांधलेले, अतिशय कौतुकास्पद, अभ्यासपूर्ण असे जंतर मंतर आम्ही पाहण्यासाठी गेलो. अजून मी कोणतेच जंतर मंतर पाहिलेले नव्हते. जंतर मंतर पाहताना खूपच आनंद झाला आणि राजाच्या कल्पकतेच कौतुकही वाटले. आमचा गाईड दारासिंग सर्व माहिती उत्साहाने सांगत होता ती माहिती ऐकण्या सारखी होती. कारण गाईड शिवाय आम्हाला जंतर मंतर काहीच कळाले नसते. त्या काळात, ग्रह ताऱ्यांचा एव्हढा सखोल अभ्यास कसा केला असेल? एव्हढी कल्पकता कोठून आणली असेल? असे प्रश्न जंतर मंतर पाहून मनात आले. खरोखर प्रत्येक अभ्यासू व्यक्तीने जंतर मंतर पाह्यलाच हवे!  माझा भारत महान आहे! एव्हढच मी जंतर मंतर पाहून म्हणेन!
त्यानंतर त्या राजानीच बांधलेले सिटी पॅलेस संग्रहालय पाहण्यासाठी आम्ही गेलो. संग्रहालयात, काही भागात राजाचे वारस राहत होते, तर काही भागात संग्रहालय होते. राजा रोज गंगाजल पित असे, म्हणून दोन चांदीची मोठ मोठी रांजण तेथे होती! उर्वरीह भागात, एक शाही लग्नाची तयारी जोरात चालू होती. हस्तकलेचा बाजार येथेही भरविलेला दिसत होता. आता आम्ही चालून चालून खूप थकलोही होतो. काही यात्रेकरूना अजून खरेदी करायची होती. त्यामुळे साडेपाच वाजता आम्ही हॉटेल मध्ये परत आलो. सात वाजता जेवण केले. कारण उद्या सकाळी उज्जैन येथे जाण्यासाठी चार वाजताच उठायचे होते. पण प्रत्यक्षात पावणे चारलाच उठविण्यात आले. सवयीप्रमाणे मी साडेतीनलाच उठलेले होते! सर्व प्रवाशांचे सामान आता खरेदी करून करून खूप वाढले होते, म्हणून फक्त एक दिवसाचे सामान बाजूला काढून उर्वरित बॅग्स गाडीतच राहू द्याव्या, असा हुकूम रतन भाईंनी दिला. खरोखरच एव्हढ्या मोठमोठ्या बॅग्स उतरवून आणि चढवून त्यांचे सहकारी थकून जात होते. शेवटी सगळ्यांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त एक बॅग बाजूला काढून सर्व सामान आणि बॅग्स परत घरी पोहोचेपर्यंत गाडीतून बाहेर काढायच्या नाहीत, या हिशोबाने ठेवून दिल्या. सकाळी साडेपाच वाजता आम्ही जयपूरयेथून निघणार होतो, परतू पाच वाजताच, आमच्याबरोबर जे देशमुख म्हणून सहप्रवासी होते, त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळाली. त्यांना लगेच नाशिक गाठणे भाग होते, म्हणून रतनभाईनी त्यांना प्रथम जयपूर एअरपोर्ट वर सोडले आणि पुढे आम्ही उजैनसाठी निघालो. देशमुख कुटुंबावर कोसळलेल्या संकटाचे, दुःखाचे सावट आमच्यावर दिवसभर होते. त्यामुळे त्या दिवशी सगळे प्रवासी शांत होते.
संध्याकाळी साडेपाच वाजता आम्ही "गंगा पॅलेस" या उज्जैन येथील हॉटेलवर आलो. तेथून आम्हाला रतन भैयानी  जीप मध्ये बसविले आणि महाकालचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. सोबत रामफूल म्हणून नवीन मॅनेजर दिले. मंदिर बरेच लांब होते. जीपने जाऊन सुद्धा आम्हाला बरेच पायी जावे लागले. मंदिरात खूपच गर्दी होती, पण इतरांच्या मते आणि तेथील रांगेसाठी करून ठेवलेली व्यवस्था पाहता, ही गर्दी काहीच नव्हती. आमचे मोबाईल आणि पर्स आम्ही आमच्या गाडीतच ठेवले होते कारण मंदिरात ते चालणार नव्हते. मंदिरात ठिकठिकाणी तशी सूचनाही लिहिलेली दिसत होती. प्रत्यक्षात मात्र एव्हढ्या गर्दीत कोणीच काही पाहत नव्हते. बरेच भाविक मंदिराच्या गाभाऱ्याचा आणि आरतीचा व्हिडिओ काढत होते. रेटारेटी करत होते. मंदिराच्या परिसरात फेरीवालेआणि इतर दुकानदार ह्यांची खूपच गर्दी होती. साधारण आठ वाजता आम्ही दर्शन  घेऊन परत त्याच जीप ने हॉटेल मध्ये आलो. 
दुसरा दिवस हा आमच्या टूरचा शेवटचा दिवस होता. सकाळी लवकर उठून परतीचा प्रवास आम्हाला उजैन ते मालेगांव असा करायचा होता तर इतरांना उज्जैन ते नाशिक! म्हणजे जवळपास पाचशे किलोमीटर! आपण लवकर निघालो तर रस्त्यात बिजासनी देवीचे दर्शन घेऊ असे रतन भाईनी आम्हाला सांगितले, म्हणून आम्ही तत्परतेने पाच वाजताच गाडीत येऊन बसलो. साडे दहापर्यंत गाडी बिजासनीला आली. देवीचे मस्तपैकी निवांत दर्शन झाले. बिजासनी आमची कुलदैवत असल्यामुळे आम्हाला तिच्या दर्शनाचा लाभ झाला, म्हणून आनंद वाटला. विजासनीचे दर्शन घेऊन आम्ही जेवण केले. शेवटच्या दिवसाचा जेवणाचा बेत अजूनच भारी होता. आता आम्हाला घर दिसू लागले, घरातील कामे दिसू लागली. बारा दिवस झाले झाडू, पोचा, स्वयंपाक, पाणी सार आम्ही विसरून गेलो होतो. माझी तर अजून बाग होती. तिची काय अवस्था झाली असेल? त्याची चिंता मला आता भेडसावत होती. महाले टूर्स च्या जीवावर  गरमागरम तयार भोजन आम्ही करत होतो! घरी जाताच  थकवा विसरून कामाला लागावे लागणार होते. सहप्रवाशांचा सहवास अजून  हवाहवासा वाटत होता. पण निरोपाची वेळ जवळ येत होती. प्रथम धुळे येथील यात्रेकरू उतरले. त्यानंतर आम्ही! सारेच जड अंतःकरणाने आम्हाला निरोप देत होते आणि आम्ही तो घेत होतो . पुन्हा एकमेकांना भेटण्याची वचने देत टूर ची सांगता करत होतो. संध्याकाळी चार वाजता आम्ही मनमाड चौफुलीला उतरून रिक्षाने घरी आलो.

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)