भारताचे नंदनवन
'महाले टूर्स' तर्फे आम्ही राजस्थान टूर सहा महिन्यांपूर्वीच केली होती. त्यांची त्या टूर मधील पर्यटन सेवा अतिशय उत्कृष्ट होती, आमचा तो मागील अनुभव खूपच चांगला होता. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडेल आणि तरीही त्यांची कोठेही आबाळ होणार नाही, यासाठी ते सर्वोत्तम आहेतच! म्हणूनच आम्ही दोघ आणि माझे लहान सासरे आणि सासूबाईं यांनी 'काश्मीर टूर ' बुक केली. घरचीच सोबत असल्यामुळे बरेचशे टेन्शन कमी झाले!
दिनांक 5 मे 2026 रोजी आमचा 44 जणांचा ग्रुप पंजाब मेल ने फिरोजापूर साठी रवाना होणार होता. टूर विषयीची मीटिंग दिनांक 25 एप्रिलला नाशिक येथे घेण्यात आली होती. परंतु आम्ही मालेगांव येथे राहत असल्यामुळे मीटिंगला हजर राहू शकलो नाही. मीटिंग मधील सर्व माहिती आम्हास फोन द्वारे महाले सर आणि काकांकडून (आमच्या सोबत येणारे माझे लहान सासरे) मिळाली. चार तारखेला महाले सरांचा " तुम्ही उद्या रात्री नाशिक रोडला दोन नंबरच्या प्लॅटफॉर्म वर या", म्हणून फोन देखील आला. परंतु आम्ही मनमाड येथून गाडीत बसण्याचे ठरविले आणि त्यानुसार टॅक्सी करून साधारण एक-दीड तास अगोदरच मनमाड स्टेशन वर येऊन हजर झालो. गाडीला अर्धा तास विलंब झाला आणि गाडी दिनांक 6 तारखेच्या सकाळी पाऊण वाजता स्टेशन मध्ये आली. काका डब्याच्या बाहेरच उभे होते. आम्ही ताबडतोब आमच्या बॅग्स आत ठेवल्या, कारण गाडीत खाण्याची सोय आम्हाला करावयाची असल्यामुळे बॅग्स ची संख्या वाढली होती. खाणे जरी एकच दिवसाचे असले तरीही थोडे-थोडे करत एक बॅगच खाऊची झाली होती. शेवट पर्यंत बॅग्सची सख्या तीच राह्यली, याचेच मला आश्चर्य वाटते? तरीही काकूंनी (लहान सासूबाई) मी जेवणाचा डबा आणणार आहे, तू आणू नकोस, म्हणून सांगितले आणि माझे ते काम आणि सामान कमी झाले.
संपूर्ण कंपार्टमेंट मध्ये आम्हीच महाले टूर्सचे प्रवासी होतो. आम्ही आमच्या सहप्रवाशांची ओळख करून घेतली आणि लगेच झोपी गेलो.
दिवस उजाडताच चहा, नाश्ता आणि गप्पा सुरू झाल्या. नाश्त्यासाठी तर खूपच पदार्थ सगळ्यांनी आणलेले होते. त्यामुळे बाहेरचे काहीच विकत घ्यावे लागले नाही. जेवणाचेही तसेच झाले, काकूंनी गोड आणि तिखट पराटे करून आणलेले होते. सोबत दोन तीन प्रकारचे लोणचे आणि चटणी! मी तर नाही म्हणत होते जेवणाचे, पण तरीही भरपेट जेवण केले. वरून काकूंनी बाटली भरून कैरीचे सुंदर पन्हे आणलेले होते, त्याचा स्वाद सगळ्यांनी घेतला आणि आराम केला. तो दिवस आमचा प्रवासातच गेला. प्रवास अतिशय सुंदर झाला. गप्पा, आराम, खाण सगळ कस एकदम व्यवस्थित, यथासांग पार पडले! महाले टूर्स चे नेहमीचे यात्रेकरू डब्यात येऊन आपली ओळख करून देत होते. इकडे तिकडे फेरफटका मारत होते. तेव्हाच इतर बऱ्याच सहयात्रेकरूंशी ओळख होऊन गेली.
तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता आम्ही फिरोजपूर स्टेशन वर उतरलो. गाडीचा तो शेवटचा थांबा असल्यामुळे आम्ही अगदी आरामात सगळ समान उतरवित होतो. इतर प्रवासी घाई करीत होते. आम्ही सगळ्यांचे संपूर्ण सामान बाहेर काढून, निघण्याची तयारी करू लागलो, तर नरेश, (महाले टूरचा मदतनीस) आमच्या समोर दत्त म्हणून हजर! आम्हाला तो आमचे सामान घेण्यासाठी आला, म्हणून खूपच आश्चर्य आणि कौतुक देखील वाटले! नरेशला पाहताच आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला. नरेशने जेव्हढे शक्य होते तेव्हढे, म्हणजे आम्ही तीन-चार जण मिळून धरू शकू, एव्हढे सामान एकट्याने घेतले आणि तो आमच्यापुढे गाडीकडे जाण्यासाठी चालू लागला. गाडीजवळ आम्हाला महाले टूरची इतरही मंडळी भेटली. रतन भैय्या ही भेटले. नेहमीप्रमाणे "तुमच्या बॅग्स व्यवस्थित ठेवल्या जातील, तुम्ही फक्त गाडीत बसा", म्हणून त्यांनी सूचना दिल्या. कोणी कोणत्या क्रमांकाच्या सीटवर बसायचे याचे नियोजन तयार होतेच. रोज सकाळी गाडीत बसताना एक सीट मागे जायचे, म्हणून सांगितले गेले. ते बऱ्याच जणांना माहित होतेच. कारण बहुतेक जण महाले टूर्स बरोबर नियमित जाणारे होते. गाडीत बसल्यानंतर, रतन भैय्यांच्या सर्व सूचना देऊन झाल्या. त्यानंतर त्यांनी माईक आम्हा प्रवाशांच्या हातात दिला. प्रत्येकाने स्वतः ची ओळख करून दिली. कोणाची चौथी पाचवी, तर कोणाची नववी ट्रिप महाले टूर सोबतची होती!
साधारण दोन अडीच तासात आम्ही अमृतसर येथील आमच्या 'रॉयल पॅलेस ' या हॉटेलमध्ये पोहोचलो. येथेही आमचा चहा तयारच होता. लगेच रूम अलॉट करण्यात आल्या. फ्रेश होऊन सगळ्यांनी नाश्ता करायचा आणि आठ-आठ च्या ग्रुप ने सुवर्ण मंदिर पाहायला जायचे असे सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही साधारण साडेदहा वाजता तयार होऊन सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी निघालो. मंदिर आजपर्यत चित्रात आणि व्हिडिओत बघितले होते. ते त्यापेक्षाही भव्य होते. मंदिरात प्रचंड गर्दी होती. एव्हढ्या लांबून येऊन दर्शन न घेताच परत जायला मन तयार होईना, म्हणून आम्ही अकरा वाजता रांगेत उभे राह्यलो. वरून सूर्य तापत होता, काही ठिकाणी छत होते, पण काही ठिकाणी अक्षरशः भर उन्हात आम्ही रांगेत उभे राह्यलो. दुपारी जवळ-जवळ दोन वाजता आमचे दर्शन झाले. एव्हढा वेळ उभे राहून आम्ही खूपच थकलो होतो.
हॉटेलवर येताच तयार होऊन चहा बिस्किटे खाऊन आम्हाला वाघा बॉर्डरला जायचे होते. त्यानुसार साधारण चार वाजता आम्ही निघालो. रतन भैय्यांच्या हिशोबाने खूपच उशीर झालेला होता. पुष्कळ वेळा एक दोन यात्रेकरूंसाठी संपूर्ण यात्रेकरूनचा खोळंबा होतो. यावेळीही असच झालं! आम्हाला वाघा बॉर्डर वर होणारी परेड पाहण्यासाठी व्यवस्थित जागा मिळायला हवी, ही सर्वांचीच इच्छा होती, विलंब झाला, तर ते शक्य होणार नव्हते. परंतु आमचे नशीब खूप चांगले होते. परेड पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असूनही आम्हाला खूप छान जागा मिळाली. मला तर वाघा बॉर्डरवर बस मध्ये असतानाच अंगावर रोमांच यायला लागले होते. तेथे जाताच तो उत्साह अजून द्विगुणित झाला. सार वातावरण देशप्रेमाने न्हाऊन निघालेले! ते देशभक्तीपर गीत! ती कवायत! सारंच खूप पाहण्यासारख आणि अनुभवण्यासारखं होत! नृत्य करण्यासाठी स्त्रीयांना BSF च्या जवानांनी आवाहन करताच बऱ्याच स्त्रिया पुढे आल्या, त्यात काकूंही होत्या आणि त्यांनी सर्वांनी तेथे देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य केले. साधारण सव्वासहा वाजेपर्यंत हा सोहळा चालला. एव्हढा वेळ आम्हाला ना तहान लागली, ना भूक! डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम आज आम्हाला बघायला मिळाला होता!
दिनांक आठ तारखेला आम्हाला पहलगाम येथे जायचे होते आणि पहलगाम अमृतसर येथून जवळ जवळ पाचशे-साडेपाचशे किलोमीटर असावे. म्हणून आम्हाला सकाळी चार वाजताच उठावे लागणार होते. त्यामुळे वाघा बॉर्डरहून येताच ताजेतवाने होऊन आम्ही गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला, आणि लवकरच झोपी गेलो. सकाळी नेहमीप्रमाणे नरेश चार वाजता आम्हाला उठविण्यासाठी आला, पण माझे तोपर्यंत सर्व आटोपून मी तयार झालेले होते.
सहा वाजेपर्यंत सगळ्यांचे चहा पाणी आटपून आम्ही गाडीत बसून पहलगाम साठी रवाना झालो होतो. गाडीतच आम्हाला पाच-पाच पराटे आणि फ्लॉवरची भाजी याचे पार्सल दिले गेले. आज सकाळ पासूनच गाडीत अंताक्षरी आणि गाण्यांची छान मैफिल जमली होती. दोन-तीन तास सगळ्यांनी आपल्या गायनाची हौस भागवून घेतली आणि आमचे कान तृप्त केले. वाडेकर साहेबांचा तर त्यात पहिला नंबर होता. निरनिराळ्या गाण्यांची फरमाइश देखील त्यांना येत होती आणि ते आपल्या सुमधुर आवाजात गाणे ऐकावीत होते. गाडीत आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य बघत, रावी आणि इतर नद्या, त्यातील नर्मदेसारखे असणारे गोटे न्याहाळत आमचा प्रवास सुरू होता. गाडीने श्रीनगर सोडले आणि अतिशय खतरनाक असा घाट सुरू झाला. सगळेच जण मनातून चांगलेच हादरले होते. एव्हढा भयंकर घाट आजपर्यंत कोणीच पाहिला नव्हता. सृष्टी सौंदर्य बाकी डोळ्याचे पारणे फेडत होते. एका बाजूला सळसळत वाहणारी चिनाब नदी, तर दुसऱ्या बाजूला उंचच उंच मातीचा आणि गोट्याचा प्रचंड मोठा डोंगर! रस्त्यावर त्यातील माती आणि गोटे केव्हा पडतील ते सांगता येणार नाही अशी परिस्थिती! जीव मुठीत घेऊन सारे बसले होते. मध्येच चेनानी नाश्री म्हणून नऊ किलोमीटर चा मोठा टनेल लागला. छोटे छोटे बोगदे तर खूपच लागत होते. पण हा खूपच मोठा बोगदा होता. त्यानंतर तो कमी की काय म्हणून एक बारा किलोमीटरचा बनिहाल नावाचा दुसरा टनेल लागला. हा टनेल तर संपता संपत नव्हता. मागे अमेरीकेत मी असे बोगदे पाहिले होते. तेव्हा मला त्याचे खूप कौतुक वाटले होते, पण आज माझ्याच देशात, असे प्रचंड टनेल पाहून, मला अभिमान वाटला. काल वाघा बॉर्डरची परेड पाहून छाती अभिमानाने फुगली होती. आज हे मोठ-मोठे टनेल्स पाहून! खूप वेळ झेलम नदीच्या किनाऱ्यावरून आमची बस जात होती. मी खिडकीजवळच होते आणि पूर्ण वेळ त्या अतिशय खोल असणाऱ्या नदीच्या प्रवाहाकडे बघत होते. निसर्गापुढे मानव किती लहान आहे हे कळत होते, पण माणसाची आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा शक्तीही काही कमी नव्हती. संपूर्ण झेलम नदीत मोठ मोठे पिलर्स उभे करून मोठा रोड तयार करण्याचे काम सुरू होते. माणसाची करामत मोठी, की निसर्गाची? अनुत्तरित प्रश्न होता. त्याचा जास्त विचार न करता, मी दोन्हीच्या करामतीची दृश्ये मनात साठवीत होते. दुरून हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे मनाला भुरळ घालीत होती. मधूनच क्रॉस होणारा नदीवरील पूल, लगेच पुन्हा ती वळणावळणाची खळखळणारी नदी!
बऱ्याच वेळाने पहलगाम आले. सारथ्यासाठी रतन भैय्यांचे आभार मानणे आणि कौतुक करणे, आमचे आद्य कर्तव्य होते, ते आम्ही केले. खरोखरच त्यांच्या ड्रायव्हिंगला तोड नाही! एव्हढ्या प्रचंड घाटात, एव्हढी मोठी लोडेड गाडी चालविणे तोंडाचा खेळ नाही, पण एकदाही त्यांनी आमच्या काळजाचा ठोका चुकू दिला नाही. अतिशय ' स्मूथली आणि आयडियल ड्रायव्हिंग' अस त्यांचं ड्रायव्हिंग आहे! खरोखरच ते नावाप्रमाणे रतन आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद रतन भैय्या 🙏सलाम आहे आपल्या ड्रायव्हिंगला! पहलगाम येथील 'पाईन रॉयल' या अतिशय सुंदर हॉटेल मध्ये आमची बस आली. जरी आमची बस AC असली तरी गाडीच्या बाहेर येताच वातावरणातील गारठा जाणवला. काही प्रवासी तर कुडकुडायला लागले. थोड्याच वेळात आम्ही रूम मध्ये आलो. आमच्या रूम मधून समोरच बर्फाच्छादित डोंगर दिसत होता. उद्या लवकर उठण्याची काळजी नव्हती. पण कसले काय ! दोन तीन वर्षापासून मला सर्दी झालेली नव्हती. नेमकी आमची काश्मीर टूर सुरू झाली आणि मला सर्दीचा त्रास सुरू झाला. काश्मिरच्या थंडीत तिचा त्रास जास्तच होऊ लागला. रात्री हॉटेलच्या स्वागत कक्षात चहा कोठे मिळाले?' म्हणून चौकशी करायला गेलो, तर तेथील कर्मचाऱ्याने तुम्ही सर्दी साठी चहा घेऊ नका, मी तुम्हाला 'कावा ' करून आणतो. अस सांगून त्याने आम्हाला कावा करून आणला. 'पुन्हा रात्री झोपण्याच्या अगोदर या मी परत कावा देईन' असे सांगितले, परतू मला त्यांना पुन्हा त्रास द्यायला संकोच वाटला. कारण ते पैसे घ्यायला तयार नव्हते! कावा हे जेष्ठमध, दालचीनी, वेलदोडे वैगेरे मसाल्याच्या पदार्थांचा काढा असतो. काढा घेताच माझा घसा छान मोकळा झाला. पहलगाम नंतर बऱ्याच ठिकाणी कावा पिण्याचा योग आला. इकडे आपण चहा पितो तसा हा कावा घेतला जातो. थंड वातावरणामुळे ते आवश्यकच आहे.
त्या दिवशी सर्दीमुळे मला रात्रभर झोप आली नाही. सकाळी लवकर उठले, फ्रेश होऊन इतरांच्या उठण्याची आणि चहा मिळण्याची वाट पाहत बसले. थोडे प्रवास वर्णन अपूर्ण होत ते पूर्ण केलं. आज पहलगाम येथे दोन स्पॉट आम्हाला पाहायचे होते. पण आमच्या हॉटेलमधूनही आणि विशेष म्हणजे आमच्या रूम मधून जे काश्मीरच सौंदर्य दिसत होते, ते काही कमी नव्हते. बाहेर खूपच थंडी होती. त्यामुळे स्वेटर, स्कार्फ शाल सगळच अंगावर घ्यावं लागत होत. सगळ्यांचे आज खूपच निश्चिंतीने चालू होते. चहा पाणी आणि नास्ताही बराच उशिरा झाला. तोपर्यंत काही यात्रेकरूनी फोटो काढले, काहींनी हॉटेलच्या आवारात आलेल्या विक्रेत्याकडून शाल, जॅकेट आणि ड्रेसेस ची खरेदी केली तर कुणी जवळच असणाऱ्या गौरी शंकर मंदिरात जाऊन आले. आम्ही गौरीशंकर मंदिरात, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत गेलो. तेथील पुजारी परवेज होता, हे ऐकून आश्चर्य वाटले!
त्यानंतर अरु व्हॅली साठी आम्ही आठ-आठ जणांचे ग्रुप करून स्कॉर्पिओ गाडी मधून रवाना झालो. रस्ता खूपच वळणांचा होता, पण येथील ड्रायव्हर सराईत होते. पंधरा मिनिटात आम्ही अरु व्हॅलीला पोहोचलो. जाताना काश्मीरचा पूर्ण नजारा डोळे भरून पाहत होतो. लीडर नदीच्या काठाने आमची गाडी जात होती. मधूनच छोटे-छोटे लोखंडी ब्रीज पास करत होतो. खरोखरच काश्मीरला भारताचे नंदनवन का म्हणतात, ते समजत होत. मेल्यानंतर स्वर्गात जातो की नाही, माहित नव्हते पण आज बाकी आमचे प्राण न जाताही आम्ही स्वर्गात पोहोचलो आहोत, असे वाटत होते. एव्हढे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आम्ही पाहात होतो, की त्याला कोणतीही उपमा नव्हती. आमच्या दृष्टीने ते ' न भूतो न भविष्यती ' असे सृष्टी सौंदर्य होते! अरु व्हॅलीला तर मोठे गार्डन, शेजारून झुळुझुळू वाहणारा झरा, समोर बर्फाच्छादित पर्वत रांगा, काय-काय आणि कसे-कसे वर्णन करणार? खूप सारे फोटोसेशन करून आम्ही अरु व्हॅलीला बाय-बाय केले आणि पुन्हा त्याच गाडीने बेताब व्हॅली पाहण्यासाठी निघालो. तीही व्हॅली काही फार लांब नव्हती. त्या व्हॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे बर्फाच्या पाण्याची नदी! नदीत पाय टाकताच पाय बधिर होत होते. पण तेथेही आम्ही पाण्यात उतरून बरेच फोटोसेशन केले. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला आणि साधारण अडीच वाजता आमच्या पाईन रॉयल या हॉटेलमध्ये परत आलो. नंतर दुपारी आरामच केला, कारण माझी सर्दी बऱ्यापैकी त्रास देत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच श्रीनगरला जायचे होते. तेथून लागलीच छोट्या गाडीने आठ-आठच्या ग्रूपने गुलमर्ग येथे जायचे होते. म्हणजे मोठ्या गाडीने शंभर किलोमीटर आणि छोट्या गाडीने साठ किलोमीटर! असा बराच मोठा प्रवास आम्हाला आज करावयाचा होता. सकाळी चार वाजताच नेहमीप्रमाणे रामफुल भैय्या उठवायला आला, पण मला सर्दीमुळे रात्रभर झोपच आलेली नव्हती. चार वाजता माझी आंघोळ वगैरे आटोपून मी उर्वरित प्रवास वर्णन लिहित बसले होते. बरोबर साडेपाच वाजता आम्ही पहलगामला बाय-बाय केले. गाडीत बसताच आम्हाला आमचा डबा आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. साडेआठ वाजेपर्यंत आम्ही श्रीनगरला पोहोचलो. आम्हाला आमच्या छोट्या गाड्यांनी निघायला जवळ-जवळ साडेनऊ वाजले. आमचे गुलमर्ग येथील रोप वेचे तिकीट येथील हॉटेल मधील समीर भाईंनी काढलेले होते, पण अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला तिकीट दिलेले नव्हते. आमच्या हातात तिकीटाची प्रिंट मिळाली आणि आमच्या गाड्या गुलमर्ग येथे जाण्यासाठी निघाल्या. गुलमर्ग येथे जाताना विविध रंगाचे आणि आकारांचे मोठमोठे गुलाब प्रत्येक घरी, हॉटेलमध्ये, बागेत आम्हाला दिसत होते. आमचे सारे लक्ष त्या गुलाब पुष्पांकडेच होते. त्यामुळे नुकतीच मिळालेली तिकिटे, आम्ही उघडून देखील पाहिली नाहीत. थोड्यावेळाने गाडीने घाट चढायला सुरुवात केली. खूपच कठीण घाट होता. आमची गाडी देखील खूप साथ देईल असे वाटत नव्हते. मध्येच ती गरम होत होती, तर केव्हा चालूच होत नव्हती. रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे असलेले दिसत होते. गाडी कशी-बशी पावणे अकरा वाजता गुलमर्ग येथे पोहोचली. समोरच उंचावर शंकराचे मंदिर होते. तेथे आम्ही दर्शन घेतले. अजून आम्ही सकाळचा नाश्ता केलेला नव्हता. त्या मंदिरात आमच्या आठही जणांच्या चमूने मस्तपैकी नाश्त्याचा स्वाद घेतला आणि आता आम्हाला रोपवेकडे जायचे होते. ते अंतर साधारण दीड किलोमीटर होते. पण रोपवे साठी खूप मोठी रांग आहे अशी माहिती मिळाली. घोडेवाले, घोड्यावरून जाण्याचा खूप आग्रह करीत होते. शेवटी काहीजण घोड्यावर, तर काही पायी असे आम्ही निघालो. तेथे जाऊन पाहतो तर प्रचंड गर्दी! बापरे! कधी लागणार आमचा नंबर? आम्ही रांगेत उभे राहिलो. जवळ-जवळ एक वाजता आम्ही चेकिंग पाशी आलो. आमच्या काही तिकिटावर फक्त नाव, तर काही तिकिटावर फक्त बारकोड होता. तेही आपापसात जुळत नव्हते. काही जणांच्या तिकिटावर एप्रिल महिन्याची दहा तारीख होती! ज्यांचा ज्यांचा असा प्रॉब्लेम येत होता, त्यांना त्यांना तेथील कर्मचारी लगेच बाहेर काढत होते. बाहेर काढताना अतिशय उध्दट आणि अद्वातद्वा भाषा तेथील कर्मचारी वापरत होते. आम्हाला काश्मीर टूर मध्ये असा हा पहिला आणि शेवटचा अनुभव मिळाला. बाकी संपूर्ण टूर मध्ये काश्मिरी लोक खूपच गोड बोलत होते. आतापर्यंत अतिशय गोड शब्दात स्वागत करणारे काश्मीर असे अचानक कसे काय बदलले? काहीच कळत नव्हते. आमचे साऱ्यांचे, एक दोन यात्रेकरू वगळता फोन देखील बंद होते. बऱ्याच वेळाने काहींचा प्रश्न सुटला, तर काही जण मात्र एव्हढे पैसे भरून, एव्हढा वेळ रांगेत उभे राहून, परत दिवसभर बाहेर थांबून राह्यले. त्यांना गुलमर्ग रोप वेचे पैसे भरून, तिकीट काढून रोप वेने जाता आले नाही. या गोष्टीची खंत कायम लागून राहील. गुलमर्ग मधील सर्वात मोठे आकर्षण रोप वे हेच होते. ते जर मिळाले नाही तर काय उपयोग? महाले टूर्स ने याबाबतीत स्वतः लक्ष घालून प्रत्येक यात्रेकरूला त्यांनी तिकिटाचे पैसे भरताच, त्यांना तिकीट पोहोचले की नाही, त्या तिकीटात काही चूक तर नाही ना या गोष्टीची दखल प्रत्यक्ष घ्यावी. ही कळकळीची विनंती 🙏 कारण आम्हाला अगदीच वेळेवर तिकीट देण्यात आल्यामुळे, ते चेक करता आले नाही आणि याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली, खूपच मनस्ताप झाला, वेळही वाया गेला.
आमचे फेज 1 चेच तिकीट असल्यामुळे, आम्ही तीन वाजता बाहेर आलो, पण आमच्या ग्रूप च्या सहकाऱ्यांचे फेज 2 चे तिकीट होते. त्यांना अजून वर जाण्यासाठी अडीच तास रांगेत वाट पाहावी लागली. त्यामुळे ते साधारण पाच वाजता बाहेर आले आणि एव्हढा वेळ रांगेत उभे राहून फक्त 15 -20 मिनिटे त्यांना त्या पॉईंटला थांबता आले. परत येताना आम्ही आठ जणांची टॅक्सी करून आमच्या पार्किंग कडे आलो. त्यानंतर शंकर मंदिराजवळ चहा घेऊन साडे सात वाजत आमच्या 'हॉटेल बुर्ज ' मध्ये परत आलो. हॉटेलच्या रूम अतिशय उत्कृष्ट होत्या. आमच्या रूम ताब्यात घेऊन रात्री साडेनऊ- दहा वाजता आम्ही सुंदर अशा डाळ बट्टीचे जेवण केले आणि दिवसभरात घडलेल्या नकारात्मक गोष्टींवर पडदा टाकला. कारण तेच ते जर उगाळत राहिलो असतो तर, संपूर्ण टूर बिघडली असती, आम्हाला आमच्या काश्मीर टूर चा आनंद मिळवायचा होता. एक दोन नकारात्मक गोष्टींसाठी संपूर्ण टूरचा विचका करायचा नव्हता. आयुष्यातही असेच नसते का? एक एक दुःखद प्रसंगांसाठी आपण दिवस न दिवस वाया घालविले तर जगण्याला काय अर्थ राहील? घडलेल्या घटनेचा एकदाच खोलवर विचार करायचा, त्यात काय चूक झाली? त्यात काय सुधारणा करता येईल ते बघायचे आणि पुढे चालायचे! अनवधानाने घडणाऱ्या या चुकानाच तर अपघात म्हणतात! असो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला लवकर उठण्याची घाई नव्हती. उद्या आम्हाला स्थानिक स्थळे दाखविण्यात येणार होती. चहा- पाणी आटोपून सात-साडेसात वाजता आम्ही आद्य गुरु श्रीशंकराचार्य यांच्या मंदिरात जाण्यासाठी आठ-आठ जणांच्या ग्रुपने छोट्या गाड्यांनी निघालो. मंदिर दहा-बारा किलोमीटर लांब असेल, पण संपूर्ण घाट असल्यामुळे आणि सिक्युरिटी चेकिंग जास्त असल्यामुळे आम्हाला जायला साधारण पाऊण तास लागला. मंदिरात जाताना आम्हाला डल लेकचे दुरून दर्शन तर झालेच, पण संपूर्ण रस्ता निसर्ग सौंदर्याने न्हाऊन निघालेला होता. काश्मीरला एव्हढ्या मुक्त हस्ताने परमेश्वराने निसर्ग सौंदर्य दिलेले आहे, की आपण खरोखरच थक्क होऊन जातो. आपले कोणत्या जन्मीचे पुण्य म्हणून आपण भारतात जन्माला आलो? भारतातील या नंदनवनाची स्तुती मी शब्दात करूच शकत नाही. या नंदनवनाचा आनंद उपभोगण्यासाठी आयुष्यात एकदा तरी हे नंदनवन पहायला हवेच! रस्त्याच्या दुतर्फा आम्हाला गुलाबाचे वेगवेगळ्या रंगांचे भरपूर ताटवे दिसत होते. गुलाबाची येथे कमी नाहीच. जिकडे पहावे तिकडे गुलाबच गुलाब! अगदी गटारी शेजारी, कंपाऊंडवर छोट्या छोट्या कुंडीत! त्यांना पानांपेक्षा फुलेच जास्त! अगदी बुकेच्या बुके! शंकराचार्यांचे मंदिर बरेच उंच आहे. आम्ही गाडीने घाट जरी चढून गेलो, तरी अजून आम्हाला पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. पायऱ्या मी मोजल्या नाहीत, पण साधारण अडीचशे पायऱ्या असाव्यात. वरती गेल्यानंतर, जो काही नजारा आमच्या दृष्टीस पडला, तो पाहताच आमचे डोळे विस्फारले गेले. आमचा पायऱ्या चढण्याचा थकवा कोठल्या कोठे पळाला. आम्ही वेड्यासारखे ते विहंगम दृश्य कॅमेरात बंदिस्त करू लागलो. मंदिरात खूप गर्दी नव्हती. अतिशय शांततेने दर्शन झाले. मंदिरात प्रसन्नता जाणवत होती. येताना 'तपश्चर्या स्थळाला' भेट देऊन आम्ही खाली उतरलो.
हॉटेलवर येऊन नाश्ता करून आम्हाला लगेच डल लेक मध्ये शिकारा सफारीचा आनंद घ्यायचा होता. आम्ही गरमागरम उपमा, भजे, चटणी ह्याचा नाश्ता करून, पुन्हा छोट्या गाड्यांमध्ये बसून डल लेकला पोहोचलो. तेथे पाच-दहा मिनिटात सगळ्यांनाच शिकारा उपलब्ध झाला. कारण जवळ जवळ 11-12 शिकारे एकाच वेळी उपलब्ध होणे अवघड गोष्ट होती. शिकारामध्ये आम्हाला चार-चारच्या ग्रुप ने बसविण्यात आले. आम्ही प्रथमच शिकारामध्ये बसत होतो. त्यामुळे खूपच उत्सुकता होती. अतिशय आनंद वाटत होता. आमचा शिकारा चालविणारी 'शमीम ' नावाची व्यक्ती होती. शमीम भाई खूपच चांगल्या स्वभावाचा आणि गाण्यांचा रसिक होता. शिकारा चालू होताच, माझ्या फर्माईशीनुसार वाडेकर साहेबांनी आणि काकांनी गाणी सुरू केली. शमीम भाई मधून-मधून आम्हाला आजूबाजूची माहिती देत होता, तर कधी आमच्या बरोबर गाणे म्हणत होता. एका रांगेत शिस्तबद्ध हाऊस बोट उभ्या होत्या. त्यावरील फुले आणि कुंड्या आम्हाला भुरळ घालीत होत्या. एक-एक हाऊस बोट पाहण्यासारखी होती. काही-काही बोटीत सहा-सहा बेडरूम्स आहेत, म्हणून आम्हाला शमीम भाईने सांगितले. एका अविस्मरणीय क्षणाचा आम्ही उपभोग घेत होतो. शिकारा चालू असताना, शेजारी लगेच कॉफी वाला, केसरवाला, लाकडी वस्तू विकणारा, फळांचा ज्यूस विकणारा, काश्मीरी ड्रेस मध्ये फोटो काढून देणारा कोण कोण येत होते. पण आम्हाला काहीही खरेदी करायचे नव्हते, तर फक्त या क्षणाचा आनंद लुटायचा होता आणि आम्ही तो लुटला. भारतातील एकमेव फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आम्हाला दुरून शमीमभाईने दाखविले. एका हाऊस बोट मध्ये कोणता तरी समारंभ चालू होता. आपल्याकडे जसे हॉटेल किंवा कार्यालय घेतात, तसे येथील लोक कार्यक्रमासाठी हाऊस बोट घेतात. एक-एक नवीन नवीन माहिती आम्हाला मिळत होती. आम्हाला आमच्या शिकारातून नेहरू गार्डन मध्ये जायचे होते. पंचवीसेक किलोमीटर पसरलेला हा डल लेक दोन दिवसात देखील पाहून होणार नाही! ही तर नुसती त्याची छोटीसी झलक होती. नेहरू गार्डन संपूर्ण फुलांच्या झाडांनी बहरलेलं होत. वेगवेगळ्या रंगांचे असंख्य गुलाब आणि इतर सर्व प्रकारचे फुले तेथे होती. काश्मीर ड्रेस वर फोटो काढून देण्याचा आग्रह तेथेही होत होता. आम्हीही काही फोटो त्यांच्याकडून हौसेखातर काढून घेतले. काश्मिरी लोकांचे एक वैशिष्ट मला दिसले, की ते आपण अगोदर पैसे दिलेले आहेत, म्हणून आपल्याला फोटो आणून देणार नाहीत असे होत नाही. संध्याकाळपर्यंत त्यांनी आमचे फोटो हॉटेलवर आणून दिले. शिवाय हे लोक आपल्याकडून चहा पाणी वगैरे काहीही घेत नाही. आम्ही शमीम भाईला आमच्या बरोबर कॉफी पिण्याचा खूप आग्रह केला. त्याने त्या दुकानदारांकडून कॉफी घेतली, पण आमच्याकडून घेतली नाही! साधारण एक तास आम्ही त्या नेहरू गार्डन मध्ये घालविला असेल. शमीम भाई शिकारातील परतीचा प्रवास आम्हाला डल लेक मधील ओल्ड मार्केट मधून घडविणार होता. या मार्केट मध्ये आमचा शिकारा आला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. पाण्यामध्ये आपल्या जमिनीवरील दुकानांसारखे, कापड दुकान, किराणा दुकान, हॉटेल्स, कॅफे, ड्राय फ्रूट्स ची दुकाने. आम्ही एक कॅफे मध्ये कॉफी घेतली. कॉफी अतिशय सुंदर होती. त्यानंतर शमीम भाईने आम्हाला तेथील भाजीपाल्याचा मळा, शिकारा बनविण्याचा कारखाना दाखविला. सगळ्यात आश्चर्य आम्हाला अजून एका गोष्टीचे वाटले, जेव्हा शमीम भाईने आम्हाला फ्लोटिंग लँड दाखविली! ही फ्लोटिंग लँड म्हणजे जमिनीचा असा तुकडा की,जो पाण्यावर कोठेही तरंगत जातो. पण असे झाले तर नुकसान होऊ शकते, म्हणून मग येथील माणसे त्या जमिनीच्या तुकड्याला लाकडी कंपाऊंड करून खाली जमिनीत घट्ट रोवून टाकतात! या फ्लोटिंग लँडवर पूर्वी नेट टाकून भाजीपाला घेतला जात होता. आता मात्र तेथे फक्त गवतच होते. येथील मुलीनं भरतकाम आलेच पाहिजे, मुलांना पोहणे आणि बोटिंग आलीच पाहिजे असा जणू अलिखित नियमच आहे. आपल्याकडील मुले बाईक वर जातात, तशी येथील मुले शाळेमध्ये बोटीने जातात. प्रत्येकाच्या घरापुढे बोटी पार्क केलेल्या! भाजीपाला विक्री देखील बोटीतूनच! असे असंख्य अविस्मरणीय अनुभव घेऊन आणि ऐकून आम्ही डल लेक वरून डायरेक्ट चष्मेशाही गार्डन पाहण्यासाठी रवाना झालो. एका गोष्टीची खंत मनात राहिली, ती म्हणजे, महाले टूर्स ने आपल्या यात्रेकरूंना हाऊस बोटीचे फक्त बाहेरून दर्शन न घडविता, आतून देखील दर्शन घडवायला हवे. कारण हाऊस बोट आतून कशी आहे, ही आमच्या मनातील उत्सुकता कायम तशीच राहिली. मी तर म्हणेन अगदीच वेळ पडली तर एक रात्र हाऊस बोट मध्ये घालवण्याची संधी महाले टूर्स ने यात्रेकरूंना दिली तर उत्तमच, पण कमीत कमी दोन-तीन तास तरी हाऊस बोट आतून दाखविण्यासाठी वेळ द्यावा, तिची आतून रचना कशी असते ते दाखवावे. ही नम्र विनंती 🙏
"चष्मेशाही गार्डन मध्ये जिवंत पाण्याचा नैसर्गिक स्रोत असून,' हे पाणी खूप औषधी आहे. " तुम्ही तेथे जाताना रिकाम्या बाटल्या सोबत ठेवा, येताना त्या भरून आणा हे पाणी पंडित नेहरूंना रोज विमानाने पाठविण्यात येत होते" असे आम्हाला रतन भैय्यांनी अगोदरच सांगितले होते. या गार्डन मध्ये हे जिवंत पाण्याचे सुंदर झरे तर आहेतच; पण त्याच बरोबर अप्रतीम अशा विविध प्रकारच्या, आकारांच्या झाडांनी आणि फुलांनी बहरलेलं हे गार्डन आहे. स्वच्छता तर खूपच वाखाणण्यासारखी आहे. आम्ही तेथे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला, थोडे जवळचे खाण्याचे पदार्थ होते, त्यांचाही स्वाद घेतला येथील झऱ्याचे पाणी सोबत घेतले, थोडे तेथेच प्यालो, पण फक्त हे पाणी पिऊन काश्मिरी लोकांसारखे होणे, या जन्मी तरी शक्य नाही! पुन्हा आमची गाडी मुगल गार्डन पाहण्यासाठी निघाली. याही गार्डन मधील झाडांचे आणि फुलांचे मी काय वर्णन करणार? डोळे दिपवून टाकणार हे सृष्टी सौंदर्य आणि त्यांची उत्तमरित्या निगा राखणारे येथील लोक! येथील एक एक गुलाबाचे फूल आपल्या हातात मावणार नाही, एव्हढ्या आकाराचे होते. संपूर्ण जमिनीवर पायवाट सोडून रंगीबेरंगी फुलेच फुले होती. जिकडे पहावे तिकडे फुले! या फुलांनी खरोखरच डोळ्याचे पारणे फेडले. विधात्याने ही फुले बनविताना कोणकोणते रंग वापरले आणि कोणकोणते फटकारे मारले, हे कदाचित तो स्वतः सुद्धा सांगू शकणार नाही. काश्मीरची निर्मिती त्याच्याकडून एकदा होऊन गेली! होऊन गेली! पुन्हा तो सुद्धा दुसरे काशमिर बनवू शकणार नाही , याची मला खात्री वाटते.
संध्याकाळी पाच वाजता आम्ही शालिमार गार्डन मधून आमच्या हॉटेल मध्ये आलो. चहा-पाणी आटोपून आमच्याकडे थोडा वेळ शिल्लक होता. आमच्या कार्यक्रमात श्रीनगरचा लाल चौक नव्हता. म्हणून आम्ही आमच्या गाडीच्या ड्रायव्हरला घेऊन लाल चौक येथे गेलो. तेथे घंटा घरावर असणाऱ्या तिरंग्याला 🇮🇳 वंदन केले, फोटो काढले. काहीजणांना थोडीफार खरेदी करावयाची होती, त्यांनी ती केली आणि रात्री जेवणाच्या वेळेत हॉटेलमध्ये परत आलो. उद्या सकाळी आम्हाला सोनमर्गला जायचे होते.
सकाळी साडेचार वाजताच आम्हाला उठविण्यात आले आणि आम्ही सर्व जण सहा वाजता चहा-पाणी करून सोनमर्ग साठी निघालो. रस्त्यात खीर भवानी मातेचे मंदिर होते. मंदिरात देवीचे दर्शन घेतले. मंदिराचा परिसर खूपच मोठा होता, मात्र पाहण्यासारखे काहीही नव्हते. त्यामुळे लगेच गाडीत बसलो.
त्यानंतर आजूबाजूचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य बस मधून न्याहाळत आणि गाणे, अंताक्षरी खेळत आम्ही साडे नऊ वाजता सोनमर्ग गाठले. सोनमर्ग येण्यापूर्वी एक साडेसहा किलोमीटरचा टनेल आम्हाला लागला. हे मोठ मोठे टनेल बांधणे, म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. माणसाच्या बुद्धिमत्तेची खरोखरच कमाल वाटते. एव्हढा मोठा डोंगर पोखरून काढणे, म्हणजे केव्हढे जिकिरीचे काम! त्यात कधी पाऊस पडतो, तर कधी बर्फ!
सोनमर्गला आम्हाला छोट्या गाड्यांमध्ये बसविण्यात आले. रस्ता अतिशय खडतर होता. दोन्ही बाजूंना बर्फाच्छादित डोंगर होते. एका बाजूचे बर्फाचे पाणी सतत रोडवर येत होते. रस्त्याची दशा अतिशय वाईट होती. बरोबर आहे आपल्याकडे दोन महिने देखील व्यवस्थित पाऊस येत नाही, तरी पावसाला सुरूवात झाली की, आपले रस्ते पहिल्याच पावसात कामातून जातात. येथे तर रोडवर कायम पाऊस नाहीतर बर्फाचे पाणी!मग ते किती काळ तग धरणार? तरीही आमचा ड्रायव्हर खूपच सराईत होता. मध्ये दोन ठिकाणी थोडा ट्रॅफिक जॅम लागला. पण दहा पंधरा मिनिटात आमची सुटका झाली. रोडची दुर्दशा आणि ड्रायव्हरचे फास्ट गाडी चालविणे यामुळे आम्ही गाडीत, जीव मुठीत घेऊन आम्ही बसलो होतो. तेव्हढ्यात वाडेकर साहेबांनी "गाडीवाले गाडी धीरे हाकना " असे त्याला गाण्यात सांगितले. त्यावर ड्रायव्हर म्हणाला, "साहेब , या रस्त्यावर मी डोळे बंद करून देखील गाडी चालवू शकतो" एव्हढा त्याला आत्मविश्वास होता ! शेवटी लवकरच आम्ही झिरो पॉईंटला येऊन पोहोचलो! दोन्ही बाजूंना बर्फ, मध्ये रोड, समोर पर्वत रांगावर चकाकणारा बर्फ आणि हुडहुडी भरविणारी थंडी! कोणी अरसिक सुद्धा तेथे गाण गुणगुणणार नाही, असे होणारच नाही! रीळ बनविणारे आणि फोटो काढणारे आमच्या मागे लागले. आम्हीही खाली दरीत बर्फावर जाऊन रील बनविले. काही फोटो काढले. साधारण एक तास आम्ही त्या बर्फात होतो. हात थंडगार पडले होते, वाडेकर साहेब बाकी स्वेटर, सॉक्स, मफलर, कानटोपी, काहीही उबदार कपडे न घालता तेथे आनंदाने फिरत होते. त्यांना तसे पाहून सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटत होते. मला बाकी कौतुकाबरोबरच चिंता देखील वाटत होती! कारण त्यांना काही त्रास झाला तर तो मलाही होणार होता ! सुदैवाने असे काही झाले नाही! Really he is iron man 💪💪💪. थोड्या वेळाने पाऊस आणि स्नो फॉल सुरू झाला. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो. बारा वाजता आम्ही सोनमर्ग येथे येऊन पोहोचलो.
आतापर्यंत आमचा जेवणाचा डबा सोबत असूनदेखील आम्ही तो खावू शकलो नव्हतो. आल्यानंतर गाडीतच डबे खाल्ले आणि साडे चार वाजता श्रीनगर येथे हॉटेलला येऊन पोहोचलो. सगळेच जण खूप थकले होते. गरमागरम चहा घेऊन थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी जाणार होतो, पण वादळ आणि पाऊस सुरू झाल्यामुळे तेही रद्द केले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता कटरा येथे जाण्यासाठी निघालो. आज संपूर्ण दिवस प्रवासच होता. दहा वाजता गरमागरम कढी आणि खिचडी महाले टूर्सने खाऊ घातली. एव्हढा मोठा प्रवास असला तरी दर दोन तासांनी गाडी थांबवून, सगळ्यांना वॉशरूमला जाऊ देण्याची काळजी रतन भैय्या घेतात, ही खूपच चांगली गोष्ट आहे. कारण गाडीत बरेचशी मंडळी, जेष्ठ नागरिक होते. एव्हढा वेळ एकाच ठिकाणी बसण्याचा त्रास होतो. दोन-चार पाऊले फिरून आलं, तर बर वाटत. आज आमच्यातीलच बोरसे दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून त्यांच्या मित्रांनी मिठाई वाटली, तर यांनी सगळ्यांना चहा दिला. थोडक्यात देण्याघेण्यासाठी निमित्त मिळत होते. आपापसातील स्नेह अधिकच वृद्धिंगत होत होता.
संध्याकाळी चार वाजता आम्ही कटरा येथील आमच्या 'रेडिसन स्क्वेअर ' या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. प्रत्येकाला दहा मिनिटात रूम ताब्यात मिळाल्या.
आमच्या सर्वांच्याच रूमच्या खिडकीतून वेष्णवदेवीच्या कळसाचे दर्शन होत होते. थोड्याच वेळात चहा झाला. आमचा आठ जणांचा ग्रुप थोडे पाय मोकळे करून आला. येताना हॉटेलच्या समोर कैऱ्या दिसल्या. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले. कैऱ्या विकत घेऊन, किचन मधून कांदे लिंबू आणले. चिवडा आणि फरसाण सोबत होतेच. मस्तपैकी भेळ बनविली. सगळ्यांनी ती गप्पा मारत खाल्ली. पंचपक्वनाचा स्वाद त्या भेळला होता. मी कधीच भेळ खात नाही, पण त्या दिवशी खाल्ली आणि मला ती खूप आवडली. वातावरण, संगत आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम झाल्यानंतर त्या भेळेला पंचपक्वानाचा स्वाद येणारच!
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वैष्णव देवीचे दर्शन घ्यायचे होते. 1997 मध्ये स्वर्गीय ताईच्या कुटुंबा बरोबर आम्ही हे दर्शन घेतले होते. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत खूपच फरक होता. पण तेव्हाही आम्ही खूप थकलो होतो, हे चांगले लक्षात होते. आता आम्हाला पायी जाणे शक्यच नव्हते. हेलिकॉप्टरचे बुकिंग दोन महिने अगोदर करावे लागत होते. त्यामुळे आम्ही घोड्यांनीच जायचे निश्चित केले. आता वैष्णव देवी दर्शन करण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक होते. घोड्यासाठी देखील पावती घेणे आवश्यक होते. आपला घोडा करावा म्हणून घोडेकऱ्यांमध्ये झुंबड उडत होती. प्रसंगी भांडणेही होत होते. शेवटी आम्ही एकदाचे घोड्यावर बसलो! पण पायी चालणे सुखदायक, की घोड्यावर बसणे सुखदायक असा प्रश्न पडला! घोड्यावर खूपच दनके बसत होते. स्पॉडिलिसीस मुळे माझी मान चांगलीच दुखायला लागली. आस्टीओपोर्सिस मुळे सर्वच हाडे ठिसूळ! त्यामुळे एक एक हाड त्रास देऊ लागले. आमचे पूर्वज कसे काय घोड्यावर बसून, चालता चालता हुरडा खात होते, माहित नाही. येथे तर चांगला रस्ता होता, पण तरीही जीव मेटाकुटीस आला होता. घोडेकरी मात्र मस्त, आनंदात घोड्याची शेपटी धरून, गप्पा मारत चालत होते. एकही घोडेकरी जाड नव्हता, की कोणाचे पोट सुटलेले नव्हते. उंचपुरे, गोरेपान, धारदार नाकाचे जन्मतः बाह्य सौंदर्य घेऊन आलेली ही माणसे, निव्वळ शिक्षणा अभावी एव्हढे अंगमेहनतीचे काम करतात, हे पाहून खूप वाईट वाटते त्याचबरोबर त्यांच्या कष्टाचे आपल्याला कौतुकही वाटते. डोली वाल्यांचे देखील खूप कौतुक वाटते. जेथे आपल्याला स्वतःचे शरीर घेऊन चालणे मुश्किल होते, तेथे दुसऱ्याचे 90-90,100-100 किलो वजन घेऊन ही माणसे 12-12,15,-15 किलोमीटरचा चढ चढतात आणि उतरतात, खरच धन्य त्याची! घोडेकऱ्याला आता थोड थांबू या, म्हणायची देखील मला लाज वाटत होती, 'आम्ही एव्हढे पायी चालत आहोत आणि यांना घोड्यावर बसून त्रास होत आहे ' असे त्यांना वाटेल म्हणून! शेवटी एकदाची मी हिमत केलीच. आणि थोडा वेळ विसाव्यासाठी थांबलो. किती सुखवासी झालो आहोत आम्ही? ह्याची प्रचिती आली. आयुष्यात प्रथमच मला चहा ऐवजी कोल्ड ड्रिंक प्यावेसे वाटले. कारण शरीरातील ताकद कमी झालेली होती. याला महत्त्वाचे कारण म्हणजे स्वर्गीय ताई सोबत घेतलेल्या वैष्णव देवीचे दर्शनाच्या आठवणी पुन्हा-पुन्हा माझे डोळे ओले करीत होत्या. ताईला मनातल्या मनात मी आता, त्या रस्त्यात झालेला बदल जणू काही सांगत होते. पूर्वी संरक्षक जाळी नव्हती, पायी चालणाऱ्यांसाठी ज्या पायऱ्या आता आहेत, त्या नव्हत्या, वरचे शेड नव्हते. तेव्हा आम्हाला खाली रस्ता दिसला की, आम्ही एकमेकांचा हात धरून चढ चढत आणि उतरत होतो. त्यावेळी ताईचा आणि वाडेकर साहेबांचा आम्हाला किती आधार होता. सगळ्याच ठिकाणी ते दोघे पुढे राहत होते. आम्हाला धरून पुढे ओढत होते. ताईच्या या सर्व आठवणीमुळे, होणाऱ्या मानसिक वेदना आणि घोड्यावर बसल्यामुळे होणाऱ्या शारीरिक वेदना, अस वाटत होतं खूप खूप रडून घ्याव😢
अखेर शेवटी आम्ही वैष्णव देवी मंदिरापर्यंत पोहोचलो. दर्शनासाठी खूपच मोठी रांग होती. रांगेत उभे राहण्यापूर्वी आमचे सर्व सामान लॉकर मध्ये ठेवणे भाग होते. ते ठेवले आणि रांगेत उभे राह्यलो. साधारण दहा सव्वा-दहा पर्यंत आमचे दर्शन झाले. भैरव नाथ दर्शनाला जाण्यासाठी बिलकुल त्राण नव्हते. खरं म्हणजे खाली जाण्यासाठीच त्राण नव्हते, पण ते तर जावेच लागणार होते. भैरवनाथ दर्शन टाळू शकत होतो, म्हणून त्या मंदिराला मनपूर्वक तेथूनच नमस्कार केला. क्षमा मागितली आणि कटरासाठी पुन्हा घोड्यावर बसलो. घोड्यावर पुन्हा बसायला शरीर बिलकुल तयार नव्हते ; परंतु पायी चालणे देखील शक्य नव्हते. सहनही होईना आणि सांगताही येईना अशी कठीण परिस्थिती निर्माण झालेली होती. दुपारी तीन वाजता कटरा येथे पोहोचलो. तेथून सरळ जी रिक्षा मिळाली, तिने हॉटेलवर आलो आणि स्वतःला बेडवर झोकून दिले. आता काहीही करण्याची ताकद शरीरात नव्हती.
पाच वाजता रामफुल भैय्या चहासाठी बोलवायला आला, तो चहा फक्त घेतला. सव्वा सात वाजता जेवण घेतले. जेवणही करावेसे वाटत नव्हते, पण अशोक भैय्या, रामफुल भैय्या, नरेश नेहमीप्रमाणे आग्रह करून-करून वाढत होते. थोडेफार जेवण केले आणि पुन्हा रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत आराम केला. आज आमचा काश्मीर टूरचा शेवटचा दिवस होता. रात्री फिरोजपुर येथून पंजाब मेल होती. म्हणून सकाळी सात वाजता मोठ्या बॅग्स पॅक करून, नऊ वाजता नास्ता करून आम्हाला फिरोजपुर साठी निघायचे होते. त्यानुसार दहा वाजता आम्ही बस मध्ये बसलो.रस्त्यात दुपारचे चहा पाणी करून संध्याकाळी पावणे आठ वाजता फिरोजपुर येथे पोहोचलो. महाले टूर्स ने आम्हा सर्वांना निरोप दिला. त्यांना आता उद्यापासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या काश्मीर टूर साठी सज्ज व्हायचे होते. आम्ही फक्त गाडीत बसून एव्हढे थकतो, ही मंडळी आमच्या बरोबर प्रवास करून लगेच आमच्या बॅग्स काढणे, त्या वरती आमच्या रूम मध्ये आणून देणे, स्वयंपाकाची तयारी करणे, तो तयार झाल्यावर आम्हाला आग्रह करून करून वाढणे ही सगळी कामे करीत होती. बर हे करत असताना अगदी हसत खेळत! कधीही चिडचिड नाही, रागावणे नाही. रतन भैय्या देखील एव्हढे ड्रायव्हिंग करून पुन्हा आम्हाला जेवण देण्यासाठी, सूचना देण्यासाठी उभे असतात. आम्ही बाकी फक्त प्रवासानेच थकून जातो. खरच कोणत्या गिरणीचे पीठ ही मंडळी खातात? परंतु तस काहीच नाहीये. आमचे जेवण झाल्यानंतर लगेच ही मंडळी त्याच पदार्थांच जेवण घेतात, किचनची आवरा आवार करतात आणि निघतात. खरच त्याचं कौतुक करावं तेव्हढ थोडच आहे. आम्ही घरी जाऊन आराम करणार होतो, तर ही मंडळी, परत त्याच उत्साहाने दुसऱ्या ट्रिप चे स्वागत करण्यासाठी सज्ज होणार होती.
गाडी फिरोजपुर येथून निघणार असल्यामुळे आम्हाला घाई नव्हती. गाडी अगदी 9.50 म्हणजे 9.50 ला सुरू झाली. महाले टूर्स ने आम्हाला रात्रीसाठी सोबत डबा दिलेला होताच. महाले टूर्स चा एका जणाचा डबा म्हणजे दोन जणांचा डबा! जवळ जवळ सगळ्यांचेच एक डब्यात दोघांचे जेवण होऊन जात होते. एक डबा खाऊन आम्ही झोपी गेलो. उर्वरित डबा चांगला राहिला तर दुपारी उपयोगात येईल या हिशोबाने राहू दिला आणि खरोखरच तो डबा दुपारी एक वाजेपर्यंत अतिशय उत्कृष्ट होता. तो आम्ही दुपारी खाल्ला. सर्व यात्रेकरूंच्या आपापसात गप्पा-टप्पा चालू होत्या. या बोगीतून, त्या बोगीत जाऊन सर्वजण एकत्र जमून आपापली गप्पांची आणि गाण्यांची मैफिल रंगवीत होते. प्रत्येक बोगीत आपली माणसे आहेत, म्हणून एकमेकांना सांगत होते. जणू एक कुटुंबच तयार झालं होत. कोणी कोणाकडे काहीही मागायला कचरत नव्हते आणि कोणासाठी काहीही विकत घ्यायला मागे पुढे पाहत नव्हते. सगळ्याचा एकमेकांवर तेव्हढा हक्क आणि अधिकार निर्माण झाला होता. प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्यांनाच बांधून टाकले होते. पाण्याची, फळांची कसलीही खरेदी केली, तरी कोणीही पैसे देत होत, कसलाच हिशोब नव्हता.
तरीही घरी जाण्याचे वेद सगळ्यांनाच लागले होते. स्रीयांना घरातील कामे दिसू लागली होती. पंधरा दिवस झाले स्वयंपाक, पाणी काहीच पाहिले नव्हते. महाले टूर्स च्या जीवावर तयार जेवणाचा आनंद आम्ही मिळविला होता. स्री ला सगळ्यात मोठा आनंद होतो, जेव्हा ती म्हणते "आज मला स्वयंपाक करायचा नाही". माझीही स्थिती काही वेगळी नव्हती. माझं गार्डन मला साद घालत होतं. त्याचा विरह आता मला सहन होत नव्हता. माझ्या पश्चात माझ्या दिरांनी माझे गार्डन आणि सासूबाईंना सांभाळले होते. मी त्याची खरोखरच ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला काश्मीर टूरला येणे शक्य झाले. अन्यथा आम्हाला अगदी वेळेवर सुद्धा ही टूर रद्द करावी लागली असती. सकाळी पावणे चार वाजता आम्ही मनमाड येथे पोहोचलो आणि लगेच टॅक्सी करून पाच वाजता मालेगांव येथे घरी पोहोचलो. सकाळी अंधारात मला बाग दिसत नव्हती. पण उजेड पडताच मी प्रथम माझी बाग पाहायला धावले! माझ्या बागेची निगा माझ्या दीरानी खूपच छान राखली होती. धन्यवाद तात्या 🙏
सौ मंदा सतीश वाडेकर.
मालेगांव.
Comments
Post a Comment