चैत्र उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा
23 डिसेंबर रोजी नाशिक येथे राहणाऱ्या, माझ्या वहिनीचा मला फोन आला, "माझ्या धुळे येथील मैत्रिणी आणि मी दिनांक 21 आणि 22 मार्च रोजी 'अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स' कडून 'चैत्र उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला' जात आहोत, तुम्ही येता का आमच्याबरोबर?"
मला पर्यटन आवडते, हे तिला माहित होते आणि म्हणूनच तिने मला विचारले, मी ताबडतोब तिला होकार दिला. एवढ्या अगोदर, म्हणजे जवळ जवळ तीन महिने अगोदर नियोजन करणे आणि कोठे जाण्याची खात्री देणे, म्हणजे खरोखरच जोखीम होती. कारण माझी राजस्थानची टूर त्याच महिन्यात पूर्ण झाली होती आणि जानेवारी मध्ये लक्षद्वीपची टूर बुक केलेली होती. पण तरीही वहिनीच्या रूपाने, मला नर्मदा मैय्यानेच साद घातली होती, नर्मदा मैय्याच मला परिक्रमेसाठी बोलावत होती. आणि झालेही तसेच शेवटपर्यंत शारीरिक आणि मानसिक कष्ट उपसण्याची, थोडक्यात परिक्रमेसाठी चालण्याची सर्व ताकद नर्मदा मैय्यानेच मला दिली. तिच्याच आशीर्वादाने, अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मदतीने आणि इतर सर्व सोबत असणाऱ्या मैत्रिणींच्या सहकार्यामुळे तसेच वहिनीच्या साथीमुळे माझी ही परिक्रमा अतिशय उत्साहात, आनंदात, समाधानात, यशस्वीरीत्या पूर्ण झाली. नर्मदेच्या दर्शनाने आणि स्पर्शाने मन आणि शरीर पावन झाले 🙏🚩नर्मदे हर!!!! नर्मदे हर!!!!
परिक्रमे अगोदरच अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्सने, आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून, वेळोवेळी सूचना आणि माहिती देणे सुरू केलेले होते. परिक्रमेसाठी लागणारा पेहराव, आवश्यक त्या वस्तू, जसे की, शूज, टॉर्च, सन स्क्रीन लोशन वगैरे सोबत ठेवण्याविषयी सूचना दिलेल्या होत्या. शिवाय सकाळी तीन वाजेपासून दहा वाजेपर्यंत साधारण 15 किलो मीटर चालावयाचे असल्यामुळे, त्याविषयी सराव करणे, तसेच नाशिक येथील स्थानिक मैत्रिणींसाठी एक दोन वेळा एकत्रित जमून ओळख परिचय आणि सभा देखील ठेवण्यात आली होती. पण काही मैत्रिणी माझ्यासारख्या बाहेर गावच्या असल्यामुळे त्यांना त्यात सहभागी होता आले नाही. तरीही आज काय झाले हे, त्या ग्रूपच्या माध्यमातून आम्हाला कळत होते. जरी या मीटिंगला आम्ही हजर नसलो, तरी त्यावाचून आमचे पुढे काही अडले, आमची फजिती झाली असे शेवटपर्यंत झाले नाही! ग्रुप वरच सगळ्यांना अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे टीशर्ट आणि टोप्या देण्यात येणार असल्याचे कळाले होते. त्यानुसार सगळ्यांच्या टीशर्ट ची साईझ व्यवस्थित घेण्यात आली. बस मध्ये कोण कोण कोठून बसणार म्हणजे कोणाला कोणता स्टॉप सोयीस्कर होईल? कोणा कोणाला रूम मध्ये एकत्र हवे आहे, त्यांच्या जोड्या हे सर्व व्हॉट्सॲप ग्रुप वरच ठरविण्यात आले. कारण परिक्रमा जरी सगळ्यात महत्वाची असली तरी, मैत्रिणीचा सहवासही तेव्हढाच हवाहवासा होता. आपली मैत्रीण खूप दिवसांनी तिच्या आणि आपल्या घराची काळजी, चिंता सोडून पूर्ण वेळ गप्पा मारायला मिळणार आहे, हा आनंद फक्त ज्या मैत्रिणी आहेत, त्याच जाणू शकतील. त्यामुळे आपली जीवश्य - कंठस्य मैत्रीणच आपली जोडीदार राहावी, असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच होते. आणि त्यासाठी अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स पूर्ण प्रयत्न केले 👍. थोडक्यात जे जे शक्य होते, सोयीस्कर होते, ते ते सर्व अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने आम्हाला देण्याचा प्रयत्न केला. अगदी दोन दिवस अगोदर सुद्धा कोणाच्या मैत्रिणीची परिक्रमेसाठी यायची इच्छा झाली, तरी तिला अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स जोडून घेतले होते, यातच त्यांचा मोठेपणा दिसत होता. इच्छा असणाऱ्या कोणालाही त्यांनी परिक्रमेपासून वंचित ठेवले नाही. त्यामुळे एकाच वेळी म्हणजे 21 तारखेला सकाळी त्यांच्या दोन मोठ्या लक्झरी बसेस आणि एक टेम्पो ट्रॅवेलर्स, तसेच धुळे येथून एक इरटिका परिक्रमेसाठी निघाल्या.
21 तारखेला सकाळी पाच वाजता नाशिक येथून निघायचे असल्यामुळे, आणि मला मालेगांव येथून नाशिक येथे जायचे असल्यामुळे, मी मालेगांव येथून दिनांक 20 मार्चलाच निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता, सर्वांच्या सोयीनुसार ठरविलेल्या वेगवेगळ्या स्टॉप वर सगळ्या मैत्रिणी पाच वाजता हजर होत्या. 'स्त्रीयांना नेहमीच तयार व्हायला वेळ लागतो, तिच्यामुळे नेहमी उशीर होतो ' असे म्हणणाऱ्यांसाठी ही एक मोठी चपराक होती. आशिष सर आणि सारिका शिंपी आमच्या संपूर्ण टूर च्या व्यवस्थापक होत्या. आशिष सरांनी आमच्या बसचे व्यवस्थापक रोहित दादा आहेत म्हणून सांगितले. कारण एकाच वेळी तीन गाड्या परिक्रमेसाठी निघत असल्यामुळे प्रत्येक गाडीत आशिष सर हजर राहू शकणार नव्हते! पण ते आणि सारिका मॅडम देखील आमच्या सोबत होतेच. सव्वा पाच वाजता बसने दिंडोरी नाक्याचा शेवटचा स्टॉप सोडला. पहाटेच्या रम्य वातावरणात 'नर्मदे हर, नर्मदे हर ' चा गजर गाडीत सुरू होता. "आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे गाडी आता सापुतारा येथेच नाश्त्यासाठी थांबेल" अशी सूचना आमच्या गाडीचे व्यवस्थापक रोहित दादानी दिली. प्रत्येकाने, प्रत्येक स्टॉप वर गाडी थांबली की, सीट बदल करावयाचे, थोडक्यात rotation करण्यास सांगितले. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नव्हता आणि प्रत्यकीची जोडी पण तुटणार नव्हती. मी आणि वहिनी त्यामुळे शेवटपर्यंत बरोबरच राह्यलो. आमच्या सामानात असणाऱ्या 'कॉमन वस्तू' आम्हाला विभागून वापरता आल्या. प्रत्येक वेळी वेगवेगळी वस्तू काढण्याचा आणि ठेवण्याचा त्रास यामुळे कमी झाला. आमचे सामानही त्यामुळे प्रथमपासूनच मर्यादेत राहिले.
सापूतरा येथे आम्ही साधारण नऊ-सव्वा नऊ वाजता पोहोचलो. सापुतरा येथील अतिशय प्रशस्त जागेत, निसर्ग रम्य वातावरणात,
' चित्रकूट हॉटेल ' मध्ये एकाच वेळी आमच्या तिन्ही गाड्या थांबल्या. हॉटेल आणि तेथील झाडी, पाने फुले, कारंजे खूपच मनमोहक होते. रातराणी, गुलाब, मधुमालती, पांढरा आणि लाल चाफा सर्व प्रकारच्या फुलांचे साम्राज्य सगळीकडे होते. वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची, विविध आकारांच्या पानांची रोपे मन मोहून टाकत होती. ठिकठिकाणचे पुतळे मन वेधून घेत होते. प्रवेश द्वाराजवळ असणारे कारंजे तुषार उडवित होते. समोर दिसणारा तलाव आणि इतर निसर्ग सौंदर्य आम्ही न्याहाळत होतो. पण... पण आम्हाला कळाले की,
गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे इतर सर्व हॉटेल्स बंद होते, त्यामुळे आम्ही या ज्या ' चित्रकूट हॉटेल ' मध्ये ब्रेकफास्ट करणार होतो, तेथेच इतरही यात्रेकरू होते. एकाचवेळी आमच्याच तीन गाड्या थांबल्यामुळे वॉशरूम साठी मोठी रांग लागली होती. एव्हढ्या लोकांचा ब्रेकफास्ट अजून तयार नव्हता, त्यामुळे थांबाव लागणार होत. पण आजुबाजूच्या त्या प्रसन्न वातावरणामुळे आम्हाला विशेष जाणवले नाही, आम्ही निसर्गाची, सृष्टी सौंदर्याची मजा लुटत होतो, परंतु या घिकाणी ' खर्च झालेला जास्तीचा हा वेळ' आम्हाला पुढे भरून काढता आला नाही. त्यामुळे पुढच्या सर्वच गोष्टी विलंबाने होत गेल्या.
चित्रकूट मध्ये आमचा नाष्टा अतिशय उत्कृष्ट झाला. इडली सांबार, चटणी, गरम गरम पोहे, सँडविच, पराठा आणि वरून चहा! एकदम पोटभर नाश्ता करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. प्रवास खरच खूपच लांबचा होता, घाटाचा होता. मधून मधून गाडीत गाणी आणि भजन म्हणणे चालू होते. साधारण सहा वाजता आम्ही निळकंठेश्वर मंदिर आणि कुबेर धाम पाहण्यासाठी उतरलो. ही दोन्ही स्थळ मी अगोदर पाहिलेली असल्यामुळे मला माहिती होती. अंधार होण्याच्या आत कुबेर धाम पाहणे आवश्यक होते. म्हणून आम्ही प्रथम कुबेर धाम पाहण्याचे ठरविले. त्यासाठी आपल्याला जीपने, नर्मदा नदीपात्रातून, दगड गोट्यावरून साधारण अर्धा किलो मीटर अंतर जावे लागते. त्यानंतर बोटीने पुन्हा अर्धे अंतर जावे लागते आणि त्यानंतर काहीशा उंच पायऱ्या चढून आपण कुबेर धाम मध्ये पोहोचतो. आम्ही संख्येने जास्त असल्यामुळे एकाच वेळी एव्हढ्या जीप उपलब्ध होणे शक्यच नव्हते. आम्ही जस जशा जीप येत गेल्या, तस तसे जीप ने जाऊ लागलो. बोटीचेही तसेच होते, पण तरीही त्याची तत्परता वाखाणण्यासारखी होती. अतिशय कमी वेळात त्यांनी आम्हा सर्वांना कुबेर धाम मध्ये पोहोचविले. उलट आम्हालाच पायऱ्या चढण्यासाठी जास्त वेळ लागला असावा. कुबेर धामचे दर्शन घेऊन आम्ही परत तसेच नीळकंठेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलो. अतिशय भव्य दिव्य मंदिर, त्याला सुंदर अशी विद्युत रोषणाई ! या मंदिराची मी शब्दांनी काय स्तुती करणार? त्यासाठी ते प्रत्यक्ष पाहायलाच हवे!! तेथील बगीचा, मुर्त्या, रथ, पुतळे, झाडी, कारंजी, आणि शेजारी वागणारी नर्मदा मैय्या! सारेच विलोभनीय! स्वच्छता तर अप्रतिम. हे मंदिर खरच अतिशय सुंदर आहे.
निळकठेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गरुडेश्वर येथे टेंबे स्वामीच्या मठात गेलो, तेथे 'नर्मदा परिक्रमेचा ' संकल्प सोडला आणि रात्री साधारण साडे दहा वाजता हॉटेल 'व्हॅली 'मध्ये जेवणासाठी आलो. तेथेच आम्हाला अनुभूती टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आमच्या मापाचे टीशर्ट देण्यात आले. टोपी त्यापूर्वीच देण्यात आलेली होती. प्रत्येकाचे नाव आणि साईज लिहून अतिशय व्यवस्थितरित्या हे टीशर्ट्स पॅक करून आणलेले होते. त्यामुळे गडबड गोधळ बिलकुल झाला नाही. यासाठी अनुभूती टूर्स चे खरच मनापासून धन्यवाद 🙏
रात्री साडे अकरा वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. मेंबर्स जास्त असले तरी नियोजन चांगले होते. त्यामुळे रूम allotment अतिशय कमी वेळात, शिस्तबध्द पार पडले. वेळही खुप झालेला होता. शिवाय सकाळी तीन वाजताच तयार व्हायचे होते, म्हणजे सव्वा दोन अडीचलाच उठायला हवे होते. दिवसभराच्या प्रवासाचा खूपच शीण आलेला होता. सकाळी जाग येईल की नाही अशी शंका येत होती. पण नर्मदा मैय्यानेच आम्हा सर्वांना उठविले. दीड दोन तासाच्या झोपेने आम्ही अगदी ताजेतवाने झालो होतो. पहाटेच्या तीन वाजता सगळ्या मैत्रिणी आपापल्या बॅग्स घेऊन, गाडीत येऊन बसल्या होत्या, हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. साडे तीन वाजता आमची बस रामपुरा येथे जाण्यासाठी निघाली. पण पुढे खूप गर्दी झाल्यामुळे पोलिसांनी सर्व गाड्या पार्किंगच्या आतच, थोपवून ठेवल्या. जवळ जवळ एक तास आम्ही गाडी निघण्याची वाट पाहत होतो. शेवटी पावणे पाच वाजता गाडी रामपुरा येथे पार्किंसाठी निघाली. आणि आमची एव्हढ्या वेळ केलेली प्रतीक्षा संपली. रामपुरा येथे खूप गर्दी होती, पण आमच्या टीशर्ट आणि कॅप मुळे आम्हाला आमच्या मैत्रिणी सहज ओळखता येत होत्या. आशिष सरांनी पार्किंग नंबर आणि परीक्रमेसाठी काही सूचना दिल्या. रणछोड दास मंदिरात प्रसाद घेऊन तेथेच सर्वांनी थांबायचे वगैरे आम्हाला सांगितले आणि परिक्रमेला सुरुवात करायला लावली. 👍
ज्या क्षणाची आम्ही तीन महिने झाले वाट पाहत होतो, तो क्षण आता आला होता. मी आणि वहिनीने अगोदरच, थंड वेळ आहे तोपर्यंत जेव्हढे जास्तीत जास्त अंतर चालता येईल तेव्हढे चालून घ्यायचे असे ठरविले होते. रामपुरा येथे सुरुवातीला जी गर्दी होती, ती नंतर कोठे गेली कळालेच नाही. आम्ही आता व्यवस्थित मोकळे मोकळे, सुटसुटीत चालत होतो. पहाटेचा गारवा, मनातील आणि शरीरातील उत्साह वाढवत होता. आमच्या ग्रूप मधील आम्ही दोघी बऱ्याच पुढे होतो. आम्हाला ऊन होण्यापूर्वीच आमची परिक्रमा पूर्ण करावयाची होती. झपाझप पावले टाकीत आम्ही, सात वाजेच्या आत अर्धे अंतर पार करून टाकले होते. परिक्रमेच्या मार्गात ठिकठिकाणी मंदिरे आणि मठ होते. खाण्यासाठीही खूप पदार्थ मिळत होते. पण आम्हाला जाताना काहीच खायचे नव्हते आणि बसायचेही नव्हते. फक्त परिक्रमा पूर्ण करावयाची होती! थोड्याच वेळात आम्ही पायऱ्या उतरून नर्मदा मैय्याच्या किनाऱ्याला लागलो. किनाऱ्याला बरेकेट्स टाकलेले होते. पण तरीही दुरून मैय्याचे दर्शन होत होते. साधारण एक किलोमीटर अंतर आम्ही मैय्याच्या किनाऱ्यावरून चालत होतो. तेथेच कोणी दिवे घेऊन लावत होते, कारण नदीच्या पाण्यात दिवे सोडायला परवानगी नव्हती. थोड्याच वेळात आम्हाला मैय्याचे पात्र पार करावयाचे होते. म्हणजे आमची अर्धी परिक्रमा पूर्ण झाली होती. पात्र पार करण्यासाठी अतिशय सुंदर अशा पुलाची उभारणी करण्यात आलेली आहे. तेथे खाण्यापिण्याची , वॉशरूम ची सर्व सुविधा उपलब्ध होती. नर्मदेचे पात्र आम्ही पार करीत होतो. ठिकठिकाणी मगरींविषयी सावधानता बाळगण्याच्या सूचना लिहिलेल्या होत्या. पूलही अतिशय चांगल्या प्रकारे उभारण्यात आलेला होता. आजुबाजूच्या गोल छिद्रातून नर्मदा मैय्या चे दर्शन आम्ही घेत होतो. पुलावर आम्ही बरेच फोटोही काढले. आता आमची परतीची परिक्रमा सुरू झाली होती. हा परतीचा परिक्रमा प्रवास नर्मदा मैय्याच्या काठाकाठानेच होणार होया. येथेही नर्मदेच्या संपूर्ण किनाऱ्याला बेरकेटस् लावलेले होते. अगदी मोजक्याच ठिकाणाहून मैय्याच्या पाण्यात उतरता येत होते. सगळी कडे नर्मदेचे गोटेच गोटे दिसत होते. त्यांचे वेगवेगळे आकार पाहताना मजा वाटत होती. कधी लाडू, कधी पादुका, कधी पाव तर कधी बन पाव! कधी आंब्याची कोय तर कधी चिंचेचे बोटुक! किती सुंदर नर्मदेचे गोटे 😍 लहानपणी शिक्षकांकडून खुप वेळा नर्मदेचे गोटे आहात तुम्ही! असे ऐकले होते. ज्या कोणाला प्रथम ' 'नर्मदेचा गोटे' 'ही उपमा द्यायचा शोध लागला, तो खरच थोर! त्यावेळी शिक्षकांनी अस म्हटलं की खूप वाईट वाटत होत, पण आज त्याच गोट्यातलं सौंदर्य आम्ही न्याहाळत होतो. वहिनी आणि मी बरेच गोटे जमा करत होतो. पहिल्यापेक्षा दुसरा जास्त चांगला भासत होता, मग पहिला वजन होतंय, म्हणून फेकला जात होता! आता आम्ही चांगलेच रमत गमत चालत होतो. उर्वरित अंतर आम्ही अगदी आरामात चालून जाऊ, ही खात्री होती. चालण्या विषयीच्या शंका कुशंकाच भय केव्हाच संपले होते. असेच एका दुकानाच्या बाजूने आम्ही नर्मदेच्या पात्रात प्रवेश केला. गोट्यांवरून चालणे खूपच कठीण जात होते! पण नर्मदा मैय्याच्या पाण्यात पाय टाकताच, चालण्याचा शीण कोठल्या कोठे पळाला. नर्मदा मैय्याचे स्वच्छ काचेसारखे पाणी पाहून आणि स्पर्श करून मन आणि शरीर पुलकित झाले. शतदा त्या पावन मैय्याला नमस्कार केला. नर्मदेच्या पाण्यातून उठावेसे वाटत नव्हते पण आता उन्हाचे चटके बसू लागले होते. थोडे चालणे अजून बाकी होते. धन्य धन्य ती नर्मदा मैय्या आणि धन्य धन्य तो माझा देश की ज्या देशात अशी पवित्र नदी आहे 🙏🇮🇳
आता थोडे चालून गेल्यानंतर आम्हाला बोटीने नर्मदा पार करायची होती. त्यानंतर रणछोड दास मंदिर लागणार होते आणि तेथेच आमच्या परिक्रमेची सांगता होणार होती. तेथे प्रसाद घेऊन सर्वांनी एकत्र यायचे होते. साडे नऊ वाजता आम्ही दोघी रणछोड दास मंदिरात पोहोचलो. प्रसादासाठी थोडी रांग होती. आम्ही रांगेत उभे राह्यलो. रांगेत उभे असतानाच प्रसादाची गुणवत्ता आमच्या लक्षात आली. आंब्याचा रस, शिरा बटाट्याची भाजी, पुरी ! अतिशय सुंदर जेवणाचा आम्ही लाभ घेतला. मंदिराच्या आवारातच मोठ मोठी वडाची तीन झाडे होती. त्यांच्या थंड सावलीत आम्ही जवळ जवळ दोन तास आराम केला. आता आमचे सहप्रवासी देखील येऊ लागले होते, गर्दीही खूपच वाढली होती. पण तरीही खूप चांगली व्यवस्था या मंदिराच्या परिसरात होती. थोड्याच वेळात ग्लास ग्लास भरून आंब्याचा रस प्यायला देत होते. मी देखील तो अतिशय उत्कृष्ट रस पुन्हा प्याले. थोड्या वेळाने म्हणजे जवळ जवळ एक वाजता आमच्या तिन्ही गाड्या नाशिक साठी रवाना झाल्या. नर्मदा मैय्याला पुन्हा एकदा नमस्कार केला. नर्मदा मैय्याने या आपल्या भेटीत खूप काही दिले होते. समाधान, शांती, परिक्रमेसाठीचे बळ!
गाडीत बसताच सर्व जणी पेंगु लागल्या होत्या. दोन दिवसांपासून प्रवास सुरू होता, झोप जवळ जवळ नव्हतीच. गाडी पुन्हा रात्री सापुतारा येथील, त्याच चित्रकूट हॉटेल मध्ये जेवणासाठी थांबली. रातराणी च्या सुगंधाने संपूर्ण आसमंत भरलेला होता. गुलाब, मधुमालती मधून मधून आपले अस्तित्व दाखवत होते, पण रातराणी पुढे कोणाचे काहीच चालत नव्हते! यावेळी आमच्या तीनच गाड्या हॉटेल मध्ये होत्या. त्यामुळे जेवण ताबडतोब मिळाले. जेवणही छान होते. एका. तासात जेवण आटोपून आमच्या गाड्या नाशिकच्या दिशेने निघाल्या. साधारण सव्वा अकरा वाजता एकेक स्टॉप येऊ लागला. एकेक मैत्रीण निरोप घेत होती, पुन्हा भेटण्याचं वचन देत होती. आमचा स्टॉप शेवटचा होता. आमच्या दोघींचे पाय एव्हढे सुजले होते की, शूज आणि चप्पल पायात जात नव्हती. भाऊ गाडी घेऊन स्टॉप वर आलेला होताच. आम्ही हातात पादत्राणे घेऊन, अनवाणी पायांनी गाडीत बसलो. आता खूपच थकवा जाणवत होता. घरी येऊन अंथरुणावर अंग झोकून दिले!
Comments
Post a Comment