आमची पहिली अमेरिका वारी
दि. २२/7/ 2019 ला येथील 2 वाजेच्या सुमारास आम्ही दोघे फिलाडेल्फियाच्या विमानतळा वर उतरलो. सर्व कागदपत्रे क्लिअर होते आणि सामानही मर्यादेत असल्यामुळे काहीही त्रास झाला नाही. विमानतळा वर घेण्यासाठी माझा मुलगा पारस आलेलाच होता, त्याला पाहताच आमचा प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळाला. रेल्वे वाहतूक काही अपरिहार्य कारणासाठी 2/3 दिवस बंद होती, त्यामुळे आम्ही बसनेच घरी येण्यासाठी निघालो. SEPTA कंपनी च्या ह्या बसेस! अतिशय चांगली सेवा! अपंग व्यक्तींसाठी किंवा वयस्कर व्यक्तींसाठी तर पावलागणिक काळजी घेतलेली दिसते. गाडीत चढायचे असो की crossing करायचे असो. प्रत्येक ठिकाणी wheel chair जाईलच अशी व्यवस्था केलेली. पायी चालणाऱ्या व्यक्तींसाठी पण नेहमीच प्राथमिकता देण्यात येते. कितीही मोठी गाडी असेल तरी पादचार्याला पूर्ण crossing करू दिल जात. पर्यटक आहात, म्हणून नजरानजर होताच hi!! Hellow!!! How are you? Enjoy!!!अस म्हटले जाते. Sorry आणि Thank you हे शब्द तर एव्हढ्या वेळा म्हटले जातात, की विचारायला च नको! कोणी शिवी दिली तरी ही माणसं Thank You म्हणतील की काय असं मला सहज वाटून गेलं.
आम्ही आलो तेव्हा इकडे जरी उन्हाळा चालू असला तरी त्या दिवशी वातावरण थोडे ढगाळ च होते. आम्ही एव्हढा प्रवास करून आलो होतो तरी थकवा असा खूप जाणवत नव्हता. एक दीड तासात फ्रेश होऊन आम्ही जवळच असलेल्या drexel park मध्ये गेलो. थोड्या वेळातच पावसाच्या सरी सुरू झाल्या. पाऊस येऊनही गार्डन मध्ये चिखल माती गारा काहीही झालं नाही. एव्हढी झाडे असूनही घाण बिलकूल च नाही. सगळीकडे हिरवळच हिरवळ! Pens आणि drexel युनिव्हर्सिटी चा एरिया असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी च येथे दिसतात. प्रत्येक ठिकाणी lawns एकदम स्वच्छ आणि सुंदर! ठिकठिकाणी खुर्च्या आणि बाक ठेवलेले! Dust beans ठेवलेल्या! आणि हं कुत्र्याला फिरवताना प्रत्येकाच्या हातात प्लास्टिक च्या पिशव्या!कुत्र्याने शी केली की लगेच उचलून dust bean मध्ये टाकणार. त्यामुळे कोठेही दुर्गंधी नाही. नंतर तर आम्ही घरी असलो की रोजचसकाळी तसेच संध्याकाळी drexel पार्क मध्ये, किंवा buckly green वर फिरायला येऊ लागलो. कधी सूनबाई बरोबर तर कधी पारस ला सुट्टी असेल तर दोघांबरोबर जवळची प्रेक्षणीय स्थळ बघू लागलो. येथून जवळ च रॉकीज स्टेप्स, drexel युनिव्हर्सिटीची बिल्डिंग, पेन्स युनिव्हर्सिटीच टेनिस कोर्ट, स्ककल नदीचा किनारा, दानामंडी म्हणून असणारा indian mall वगैरे ठिकाणी जाऊन आलो.
बेंजामिन फ्रॅंकलिन ब्रिज आणि पेन्स लँडिंग बघायला जाण्यासाठी आम्ही प्रथम च येथील subway ( एक प्रकारची रेल्वे) ने गेलो आणि स्टेशन आणि trains बघून आश्चर्य चकीत झालो. भुयारी रेल्वे ही संकल्पना फक्त ऐकून च होतो, पण ती प्रत्यक्ष पाहण्यात वेगळीच गंमत वाटली. येथील स्ककल नदीपात्राच्या खालून जाणारी ही रेल्वे!
लोकसंख्या कमी असूनही आणि प्रत्येकाकडे four wheeler असूनही, येथील public transport Service एकदम वाखाणण्याजोगी! गाडीत प्रत्येक ठिकाणी बसायला जागा शक्यतो वर मिळतेच, फक्त न्यूयार्क ला बाकी खूप गर्दी असते. तेथे नाही मिळत गाडीत बसायला जागा!
दि 29/07/2019 ला पारसने statue of liberty ची तिकीट स अगोदर च काढुन ठेवलेली होती, म्हणून आम्ही सकाळीच फिलाडेल्फिया येथून न्यूयार्क साठी निघालो. बस ची तिकीट ही अगोदर च काढलेली होती. येथे विमानाच्या तिकीटां सारख असते, जेव्हढ्या लवकर तुम्ही booking कराल तेव्हढे तुम्हाला कमी पैसे लागतील. मग ते कोणतेही booking असो, त्यामुळे advance booking करण्याकडे सगळ्यांचा कल दिसतो.असो.
ह्या बस चे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे ह्या बस मध्ये toilet होते. बस मध्ये toilet ही आपण कल्पना ही करू शकत नाही.
तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो, पण न्यूयॉर्क येण्यापूर्वी आम्ही अजून एक आश्चर्य पाहिले, ते म्हणजे हडसन ह्या मोठ्या sss नदी खालून गेलेला tunnel!!! आपणास जाणवत देखील नाही, की आपण नदीखालून जातोय म्हणून! बराच वेळ चालणारा हा लिंकन टनेल पाहून खरोखरच कौतुक वाटले.
आणि मग वेळ आली ती जगप्रसिद्ध statue of liberty पाहण्याची! खूप उत्सुकता होती तो पाहण्याची. आणि खरंच भव्यदिव्य असा तो पुतळा पहिला आणि धन्य वाटलं! त्याच बांधकाम प्रत्येक इंजिनिअर ने पाहण्यासारखं! मंत्रमुग्ध करणार! आपण खूप नशीबवान आहोत असं त्या क्षणी जाणवलं!
Statue of liberty पाहून झाल्यानंतर ellis island ला आम्ही आलो. ,तेथे इमिग्रेशन सिस्टीम विषयी माहिती होती, त्यात आम्हाला रस वाटलं नाही, त्यामुळे तेथून आम्ही लगेचच ferry ने न्यूयॉर्क ला आलो आणि world trade center पाहायला गेलो. World trade center च्या102, 101 आणि 100 या मजल्यावरून, पूर्ण न्यूयॉर्क शहर, statue of liberty, हडसन नदी आणि असंख्य उंच इमारतींचे दर्शन झाले. World trade center ची लिफ्ट ही अनुभवण्यासारखी!!!लिफ्ट मध्ये बरीच माहिती मिळते आणि तीही अंगावर शहारे आणणाऱ्या पध्दतीने! काही क्षणात च ही लिफ्ट आपल्याला वरती घेऊन येते आणि येताना माहिती वजा करमणूक ही करून देते. हवेच्या प्रेशरने आपल्या कानांना जेव्हा जाणवते, तेव्हा कळते, की आपण किती उंच आलो आहोत ते! येथे एका गोष्टी च मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते म्हणजे ज्या कारणा मुळे आपली आणि ह्या इमारत ची ओळख झाली, त्या कारणांचा येथे कोठेही उल्लेख केलेला आढळला नाही. वाईट गोष्टी मनातून काढून च टाकायच्या हेच ह्यातून शिकायला मिळाले. World trade center मधून निघावस वाटतच नव्हतं, पण आमची परतीची बस नऊ वाजता होती.
येथे साधारण आठ साडे आठ पर्यंत उजेड च राहतो, त्यामुळे रात्रीचे 11/12 वाजणे काहीच वाटत नाही. आणि सांगण्यासारखे म्हणजे दिवसा काय आणि रात्री काय कोठेही एकटी दुकटी मुलगी बिनधास्त फिरते, प्रवास करते. मुळात restrooms/washrooms सोडले तर लिंग भेद कोठेच दिसत नाही. स्त्री आणि पुरुषांचे चालणेही तेव्हढेच आत्मविश्वा साचे!स्नायू ही भरभक्कम! उंचीही भरपूर! व्यायामाची तेव्हढीच आवड. भर उन्हातही रस्त्याने धावणे, बॅडमिंटन खेळणे सर्वत्र!!! ऑलिम्पिक पदके ह्यांच्या वाटेला एव्हढी का येतात, ह्याच रहस्य उलगडले.
सायकल, स्केटिंग, स्केटिंग बोर्ड, फक्त एकाच व्हील ची सायकल, तीन व्हील्स ची सायकल सरास दिसतात. वेळही वाचवतात, तंदुरुस्त ही ठेवतात. समतोल ही साधतात मनाचाही आणि शरीराचाही!!!शिवाय प्रदूषण मुक्त!
त्यानंतर वीक एन्ड ला पारस ने गाडी भाड्याने बुक केलेली होती. येथे गाडी भाड्याने मिळाते, पण ड्रायव्हिंग बाकी आपण करायचे! Left hand driving!! Auto gear गाड्या!! वाहतुकीचे नियम खूपच काटेकोर पणे पाळावे लागतात. त्यामुळे पूर्ण वेळ पारस लाच driving करायचे होते. ह्यांच्याकडे भारतातील licence होते आणि left hand driving करण्याची भीतीही वाटत होती.
गाडी घेऊन आम्ही पुन्हा न्यूयॉर्क साठी निघालो. न्यूयार्क म्हणजे भारताची मुंबई च जणू. गर्दी ही खूप गाड्यांची आणि माणसांची पण! गाडी पार्क करायला जागाच नाही, म्हणून आम्ही न्यूयॉर्क च्या अलीकडच्या स्टेशनवर गाडी park केली(journal square)आणि तेथून पाथ म्हणून एक train आहे त्या train ने Times square ला गेलो. तेथे मोठं मोठे screen ऊंच इमारतींवर लावलेले होते आणि ते पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. इतरही खाण्या पिण्याचे, करमणूकेचे स्टॉल्स होते. पायी चालणेही मुश्कील व्हावे असे वातावरण! फिलाडेल्फिया ला जेव्हढे शांत वातावरण, तेव्हढे येथे गजबजलेले!. पारस ने आम्हाला अगोदरच सांगितलेले होते, की न्यूयॉर्क जरी अमेरिकेत असले, तरी ते अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत नाही म्हणून! म्हणजे न्यूयॉर्क बघून तुम्ही असे गृहीत धरू नका की पूर्ण अमेरिका अशीच आहे! थोडक्यात अमेरिकेतील कोणत्याच शहरात न्यूयॉर्क इतकी गर्दी नसते, वर्दळ नसते. पण पाहण्यासारखे spots पण न्यूयॉर्क लाच आहेत, म्हणून आम्ही एक नव्हे दोन नव्हे तर चांगले तीन दिवस न्यूयॉर्क ला गेलो.
Times square नंतर आम्ही पायीच rockfeller center ही उंच आणि प्रसिध्द इमारत पाहण्यासाठी गेलो. ह्या इमारती च्या अवतीभोवती चा परिसर rockfeller ह्याच नावाने प्रसिद्ध आहे. त्यात कारंजा, हॉटेल्स वगैरे बरेच पाहण्यासारखे होते. फोटो घेण्यासारखे होते. ते पाहून आणि फोटो वगैरे घेऊन आम्ही त्या rockfeller center वर गेलो. जातांना लिफ्ट मध्ये खालपासून वरपर्यंत transferant glass होती. प्रचंड वेगाने वर जाणारी ती lift अंगावर शहारे आणत होती. वर गेल्यानंतर इतर उंच इमारती सारखीच ही पण होती. एव्हढ्या उंचीवरून दिसणारी ती न्यूयॉर्क सिटी आणि रात्रीच्या वेळी तिचा दिसणारा झगमगाट दिवाळीची आठवण करून गेला. त्यानंतर पुन्हा train ने आणि नंतर गाडीने आम्ही जवळ जवळ दोन वाजता घरी आलो. खूप थकलो होतो, कारण प्रत्येक ठिकाणी पायी चालावं लागत होतं आणि एव्हढे पायी चालायची आम्हाला सवय नव्हती.
दुसऱ्या दिवशी देखील आदल्या दिवशी सारखं च प्रथम गाडीने आणि नंतर ट्रेन ने आम्ही जगप्रसिद्ध अशी empire state building पाहायला गेलो. 85 वर्षांपूर्वी ची ती इमारत पाहून खरच आश्चर्य वाटले. एव्हढे मोठे बांधकाम फक्त 13 महिन्यात पूर्ण झालेलं आहे आणि तेही त्या काळात, हे वाचून तर अजून आश्चर्य वाटले. त्यानंतर आम्ही मादाम तुसा म्युझियम पाहायला गेलो. मादाम तुसा म्युझियमच ही तसेच आश्चर्य वाटले. एव्हढे हुबेहूब पुतळे, की खरोखरचा माणूस कोणता आणि पुतळा कोणता? तेच समजेना! प्रवेशद्वाराजवळ प्रथमदर्शनी च प्रियंका चोप्रा चा पुतळा पाहून भारतीय अभिमान जागवला. त्यानंतर महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, शाहरुख खान वगैरे भारतीय व्यक्ती चे पुतळे पाहायला मिळाले. इतरही खूपच पुतळे होते, त्यांची रचना ही नाविन्यपूर्ण केलेली होती. त्या पुतळ्यांबरोबर वेगवेगळ्या pose मध्ये फोटो काढून, त्याही दिवशी रात्री दोन वाजता आम्ही घरी आलो.खूपच थकलो होतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आराम करू असे ठरविले. सुनबाई चा वाढदिवस ही होता, मग रात्री biryani city ह्या भारतीय हॉटेल मध्ये जेवायला गेलो. हे हॉटेल शहरापासून 40/45 km लांब होते जस काही दुसऱ्या गावाला च जात आहोत असं वाटले. तेथे ह्या तिघांनी अपोलो फिश आणि दम बिर्यानी खाल्ली. फिश तिघांनाही खूप आवडले. मी मसाला डोसा घेतला, तो नेहमीच्या आपल्या डोशापेक्षा बराच मोठा होता, पण टेस्ट चांगली होती. अमेरिकेत आपण हॉटेल मध्ये डोस खातोय, ह्याचाच मला जास्त अप्रूप वाटलं. रात्री अकरा साडे अकरा ला आम्ही घरी आलो आणि लगेच झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी पारसने आपल्याला long drive ला जायचे आहे आणि मी तुम्हाला काहीतरी surprise दाखविणार आहे असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी कितीही लवकर निघायचे म्हटले तरी दहा वाजलेच! तीन साडे तीन वाजेपर्यंत आपण बीच वर पोहोचू, अस पारस म्हणाला, म्हणून तो एखादा मोठा आणि सुंदर बीच दाखविणार असेल असे आम्हाला वाटले, पण तो काय दाखविणार आहे हे त्याने आम्हाला शेवट पर्यंत सांगितले नाही. तो driving करतच होता, पण रस्ता संपत नव्हता. मध्येच पाऊस काय सुरू झाला. एव्हढा जोरात पाऊस, की पुढचं काहीच दिसत नव्हते. टेंशन वाढतंच होते. दुपारचे चार साडे चार झाले तरी ह्याच surprise आम्हाला दिसत नव्हते. त्याने परत थोडा break घेतला, coffee घेतली, आणि आता मी तुम्हाला गंमत दाखवितो म्हणून सांगितले. आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि त्यानंतर आम्ही जे काही बघत गेलो, ते अक्षरशः जीव मुठीत धरून च!!! दोन्ही बाजूंनी पसरले ला अथांग अटलांटिक महासागर आणि त्याला चिरत जाणारा आमचा रस्ता!!! थोडा थोडका नव्हे, तर 23 मैल! दुतर्फा lights !!! Four lane!! डोळे भरून पाहिले ते आणि आणि मध्ये च आमची गाडी भुयारात शिरली! समुद्राच्या पोटात! वर प्रचंड समुद्र आणि त्यात भुयार! कल्पना ही करू शकत नाही आपण! एव्हढं मोठं tunnel! वरून मोठं मोठी जहाज जात होती आणि आम्ही आतून. परवा नदिखालून जाऊन आलो आज समुद्राखालून! केव्हढ आश्चर्य? एक नाही असे दोन दोन टनेल!! त्या समुद्राच्या पुलावरून जमिनीवरच्या पुलावर आलो आणि हुश ss झालं. पारसलाही आपण ह्यांना हे आश्चर्य दाखविले म्हणून समाधान वाटले. आम्हाला ही धन्य धन्य झाले! ह्या bridge चे नाव cheasapeck bay bridge आहे आणि tunnel च नाव cheasapech tunnel आहे अशी माहिती पारस ने आम्हाला दिली. आता कसला beach आणि कसलं काय?तरीही आम्ही तेथे असणारा verginia beach वर गेलो. अर्धा तास beach वर थांबून परत त्याच पुलावरून विरुद्ध बाजूने आमचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या अंधारात ती दिव्यांची रोषणाई समुद्राच्या सौन्दर्यात भर घालत होती. Beach तर आपण भरपूर पाहतो, पण असा पूल आणि अस tunnel पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही, म्हणूनच ते डोळे भरून पाहून घेतल आणि परतीच्या प्रवासाचं टेंशन घेऊन निघालो. कारण येताना 260 मैल एव्हढे अंतर कापले होते, आता परत 260 मैल कापायचे होते. Driving एकट्या पारस लाच करायचे होते. पण पठ्या कसलं driving करतो? आम्ही तिघेही पेंगत होतो, पण पारस मात्र डोळ्यात तेल घालून driving करत होता. Proud of you beta😇😇😇आणि रात्री अडीच तीन वाजता आम्ही फिलाडेल्फियाला सुखरूप येऊन पोहोचलो ह्या सगळ्या आठवणी घेऊन.
दिनांक 9 ला आम्ही वॉशिंग्टन पाहण्यासाठी पुन्हा गाडी केली. वॉशिंग्टन फिलाडेल्फिया येथून साडे तीन चार तासांच्या अंतरावर आहे. अडीच तीन वाजता आम्ही वॉशिंग्टन येथे पोहोचलो. प्रथम आम्ही प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी गेलो. भर दुपारची वेळ आणि कडकडीत ऊन, पण तरीही खूप झाडी आणि मधूनच सुरू असणारे पाण्याचे फवारे, त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होत होती. एखाद्या चक्र व्यूह सारख असणार ते प्रचंड मोठे प्राणिसंग्रहालय! कोठून आलो आणि कोठे जायचे राहिले आहे, तेच कळेना! प्राण्याची निगा आणि स्वच्छता खूपच चांगली ठेवलेली होती, त्यांना नैसर्गिकपणे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला होता. प्राणिसंग्रहालय पाहून झाल्यानंतर आम्ही national museum of nature history पाहण्यासाठी गेलो. तेथेही वेगवेगळ्या प्राण्यांचे पुतळे, समुद्री हिरे, मानवाच्या उत्क्रांती विषयी माहिती होती. ते सर्व पाहिल्यानंतर रात्री आठ वाजता आम्ही वॉशिंग्टन हुन परत आलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही परत वॉशिंग्टन येथेच उर्वरीत प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी निघालो. कालपेक्षा आज थोडं लवकर निघाल्यामुळे साडेबारा वाजताच आम्ही वॉशिंग्टन मध्ये येऊन पोहोचलो. तेथे प्रथम गाडी पार्क करून, capitol building पाहण्यासाठी आलो. भव्यदिव्य capitol building, तिच्या संपूर्ण परिसरातील ती हिरवळ, कारंज्या सर्वच मनमोहक होत. भर दुपारची वेळ असूनही झाडा खाली हिरवळीवर खूपच थंड वाटत होतं, त्यात आमच्यासमोरच दोन नवऱ्या photo session साठी आलेल्या होत्या त्यामुळे ती ही गंमत आम्हाला पाहायला मिळाली
Capitol building मध्ये अमेरिकेच्या इतिहासाविषयी एक शो असतो तो साधारण 20-25 मिनिटे चालतो. त्यानंतर तेथील guide विनामूल्य प्रत्येक हॉल ची माहिती देतात. अमेरिकेच्या सगळ्या प्रेसिडेंट चे पुतळे एका हॉल मध्ये आहेत तर एक हॉल मध्ये scientists आणि प्रसिध्द व्यक्ती चे पुतळे आहेत. ही इमारत जशी बाहेरून सुंदर दिसते तशीच किंवा त्याहून अधिक ती आतून सुंदर आहे. दोन तास देखील ती पाहण्यासाठी कमी पडतील. Capitol building पाहून झाल्यानंतर आम्ही समोरच असणारी लायब्ररी पाहण्यासाठी गेलो. ही पण इमारत तशीच पाहण्यासारखी! येथे इसवी सनापूर्वीची पुस्तके ठेवलेली होती. त्यांची बांधणीही खूपच सुबक! अमेरिकेतील स्त्रीयांनी मतदानासाठी कसा लढा दिला, ह्यासाठी एक स्वतंत्र दालनच आहे. आपण नशीबवान आहोत आपल्या ला हा अधिकार मिळविण्यासाठी काहीच करावं लागलं नाही!
लायब्ररी पाहून झाल्यानंतर आम्ही व्हाईट हाऊस पाहण्याचे ठरविले; परंतु व्हाईट हाऊस बऱ्याच अंतरावर असल्यामुळे आम्ही सायकल्स घेतल्या. येथे ठिकठिकाणी स्टॉल्स वर सायकल्स ठेवलेल्या असतात, आपण एक ठिकाणाहून सायकल घ्यायची आणि हवं तेथे जाऊन तेथील दुसऱ्या स्टॉल वर deposit करायची! सायकल मार्ट वगैरे काहीच भानगड नाही. अशा सायकल्स घेऊन आम्ही व्हाईट हाऊस पाहायला निघालो. तेथे बऱ्यापैकी गर्दी होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे बरेचसे पर्यटक भारतीय होते.. व्हाईट हाऊस पाहिल्यानंतर आम्ही सायकलनेच वॉशिंग्टन monument पाहण्यासाठी निघालो. सायकल्स प्रथम deposit करून दिल्या कारण आता जी स्थळ आम्हाला पाहायची होती ती जवळ जवळच होती. वॉशिंग्टन monument पाहून झाल्यानंतर आम्ही तेथून जवळच असणाऱ्या world war 2nd memorial ला गेलो. तेथील प्रचंड कारंजा, सभोवताली अमेरिकेतील सर्व राज्यांचे नावे असणारे मोठं मोठे सुशोभित pillars, मोठा तलाव, आणि त्यात समोर दिसणाऱ्या लिंकन मेमोरियल च प्रतिबिंब सारच अचंबित करणार! लिंकन मेमोरियल पाहून झाल्यानंतर आम्हाला खूपच थकायला झालं होतं. रात्री 11 वाजता आम्ही घरी आलो, सकाळी देखील लवकर उठायचं होत, कारण उद्या नायगरा धबधबा पाहायला जायचं होतं, आणि नायगरा जाण्यासाठी साधारण 800 km अंतर पार करायचे होते.
एकाच दिवसात एव्हढे driving पारस कडून कस होईल?हे tention वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोन वेळेचा tiffin घेऊन नायगरा धबधबा पाहण्यासाठी निघालो.आमचं अमेरिकेला येण्याचे निश्चित झाल्या बरोबर, Bufflow शहराच्या जवळच पारसने चार जणांसाठी एक रूम बुक करून ठेवली होती. येथे येण्यापूर्वी मला त्याने तुला अमेरिकेत काय काय पाहवस वाटतं? अस विचारले होते. तेव्हा मी त्याला मला इतिहासात आणि भूगोलात माहिती असलेले फक्त statue of liberty आणि नायगरा धबधबा हीच दोन ठिकाण सांगितली होती. पण तरीही ही ठिकाणे फिलाडेल्फिया पासून खूप लांब असतील आणि तुला काही त्रास होणार असेल तर नको असे सांगितले होते. पण मम्मी ने सांगितलेले आहे मग जायचेच, आणि त्या दोघांनी ही ही ठिकाणे अजून पाहिलेली नव्हती, म्हणून त्यांनी अगोदर च जय्यत तयारी करून ठेवलेली होती. मजल दर मजल करत साडे सात वाजता आम्ही बुक केलेल्या रूम वर आलो. रूम पाहून तर आम्ही सर्व जण एकदम खुश झालो. अतिशय सुंदर रूम होती. किचन, हॉल आणि 2 बेड रूम्स पूर्ण uptodate!!!!फ्रीझ, डायनिंग टेबल, मायक्रो वेव्ह, गॅस स्टो, TV, कपाटे, भांडीकुंडी आणि चहा, कॉफी , दूध,साखरे पासून सगळे सगळे साहित्य!!! बाथरूम मध्येही वेगवेगळ्या प्रकारचे तेल, बॉडी लोशन्स, सोपं, शॅम्पू काय नव्हते अस नाहीच. किचन मध्ये ही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी, चहा, फ्रीझ मध्ये दूध सगळे होते.त्यामुळे घरी असल्यासारखे च आम्हाला वाटले. आणि हं! आश्चर्य म्हणजे ह्या घराला कुलूप, care taker वगैरे काहीच नव्हते. तर कुलूपाच्या ऐवही पासवर्ड होता, जो रूम घेण्यापूर्वी पारसच्या मेल वर आलेला होता. आतापर्यंत अमेरिकेतील टुमदार घर आम्ही बाहेरून च बघत होतो, प्रथमच ते आतून पाहत होतो. पारस चे नाही म्हटले तरी apartment आहे; पण खेड्यातील जी टुमदार बंगाली आपण ज्याला म्हणू शकू, असे ते घर प्रथम च पाहिले. खूप म्हणजे खूपच आवडले, आणि जेव्हा पारस ने त्याचा rate सांगितला तेव्हा आम्ही उडालोच जवळजवळ 110 डॉलर!😳! सोबत आणलेलेच मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून आम्ही खाल्ले.
इकडे मला एक प्रोब्लेम होता, म्हणजे लंडन ला विमानात बसल्यापासूनच तो सुरू झाला, मला सगळ्या च बाहेर च्या पदार्थांचा एक उग्र वास येत होता, अगदी कॉफी चा देखील! त्यामुळे मला बाहेरचा कोणताच खाद्य पदार्थ चालत नव्हता, अपवाद फक्त त्या रात्री भारतीय हॉटेल मध्ये गेलो होतो तेव्हढा च, बाकी फक्त घरचेच पदार्थ मला खाता येत होते असो ते आपलं नेहमीच च आहे☺
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हीं साडे नऊ वाजता च रूम सोडली. नायगरा धबधबा तेथून फक्त 30/35 km होता. नायगरा धबधबा पाहण्याची तर खूप उत्सुकता लागलेली होती. आणि खूप दुरूनच मला धूर दिसू लागला, मला वाटले वणवाच पेटलाय, कारण इकडे लाकडाची घर असल्यामुळे सारखी कोठे ना कोठे आग लागलेलीच असते. Fire brigade च्या गाड्या सारख्या धावत च असतात. वाटलं आता जंगलात आग लागली असेल! पण नंतर लक्षात आले, ते नायगरा धबधब्याचे तुषार होते, एव्हढ्या दुरून धुरासारखे दिसणारे!!! गाडी पार्क करून आम्ही लगेच निघालो. खाण्यापिण्याचे कसलेही भान नव्हते. न भूतो, न भविष्य ती, !! आम्हाला नायगरा धबधबा पाहायला मिळणार होता. इतर पाहतात तसा मी ही तो you tube वर पाहिला होता, पण प्रत्यक्ष अनुभवणे काही औरच!! समोर कॅनडा देश दिसत होता. आमच्या पैकी फ़क्त पारस जवळच त्याच्या Ph D च्या कामा निमित्त कॅनडा चा visa होता, आमच्या तिघांजवळ नव्हता. पण तशी काही गरज पडली च नाही. कॅनडाच्या बोटी, कॅनडाच्या इमारती, कॅनडात जाणारा पूल, सर्व आम्हाला स्पष्ट दिसत होते. धबधबा पाहण्याची खरी अनुभूती आली, ती बोटीत बसल्यानंतर! बोटीत बसण्यापूर्वी आम्हाला प्रत्येकला एक एक use and throw चा rain coat देण्यात आला होता. त्यातही अमेरिकेतील बोटीसाठी निळा, कॅनडाच्या बोटीसाठी लाल आणि एक goat island म्हणुन एक island आहे, त्यासाठी पिवळा rain कोट दिसून आला. बोटीत बसण्यापूर्वीच अंगावर धबधब्या चे तुषार यायला सुरुवात झाली होती. बोट चालू झाल्यानंतर तर ते एव्हढे वाढले की, चष्मा काढावा, की फोटो काढावा, की हे सगळं सगळं डोळ्यात साठवावे काहीच कळेना झालं!!तरीही जे जमेल ते आम्ही करत होतो. सुवर्ण क्षणाची अनुभूती डोळ्यात आणि मनात साठवून घेत होतो. केव्हा केव्हा तर काहीच दिसत नव्हते! फक्त ओलेचिंब होत होतो. बोटीतील सह प्रवाशी देखील धबधब्याचा आनंद लुटत होते. बोटीने केव्हा turn घेतला हे आमच्या लक्षात देखील आले नाही, एव्हढे आम्ही गुंग झालो होतो. आणि बोट ज्या ठिकाणाहून निघाली होती तेथे परत आली. जगातील सर्वात मोठा धबधबा आपण पाहिला, ह्याचा खूपच आनंद झालेला होता. हे पाहिल्यानंतर अजून काही तेथे पाहण्यासारखे वाटले नाही. आजूबाजूला काही points आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली, पण नायगरा धबधबा बघितल्यानंतर मनाचे एव्हढे समाधान झालेले होते, मन तृप्त झाले होते, आता फक्त डोक्यात नायगरा च राहावा अस वाटत होते. कुठं जाण्यात रसच नव्हता.
आणि मग आम्हाला वर्तमानाचे भान आले. आज नऊ दहा तासांचा प्रवास आपल्या ला करायचा आहे, आणि पारस ला एव्हढे driving!!! आमची पाऊले आपसूकच गाडीकडे वळाली. दुपारी एक वाजता निघालेलो आम्ही रात्री अकरा वाजता घरी सुखरूप परत आलो. आता ह्यानंतर जाण्यापूर्वी काहीही बघायचं नाही. सर्वोच्च बिंदू गाठलेला आहे. आता count down सुरु करायचे! जायची तयारी करायची! अमेरिकेच्या आठवणी आयुष्य भरासाठी सोबत घेऊन जायच्या!! जवळजवळ तीन आठवडे झाले घर दार, ऑफिस, स्वयंपाक पाणी सगळं सगळं विसरून गेले होते आता ते सर्व आठवू लागले. एक एक काम डोळ्यासमोर नाचू लागले. मनात भारत आणि अमेरिका ह्याची तुलना सुरू झाली.
आपण का नाही ठेऊ शकत एव्हढी स्वच्छता आपल्या देशात? त्यासाठी आम्हाला स्वच्छता अभियान का राबवाव लागत? आम्ही का नाही बांधत आमच्या देशात असे चांगले रस्ते? आम्ही का नाही बांधू शकत असे पूल? का आम्हला out dated झालेले पूल वापरावे लागतात?सावित्री चा पूल आठवतो ना? आम्ही का नाही एव्हढा व्यायाम करत? आम्ही का नाही ठेवत अशी स्त्री पुरुष समानता? आमच्या लेकीबाळीना बाहेरून यायला थोडा अंधार झाला तरी आम्हाला का भीती वाटायला लागते? आम्ही का नाही आमच्यातील जातीभेद मिटवू शकत?का? का? आणि का?
कारण आम्ही अनुकरण करतो अमेरिकेतील खाण्याचे, अनुकरण करतो त्याच्या स्वच्छंदी जीवनात चे अनुकरण करतो त्याच्या कपड्यांचे, त्यांच्या life style चे! त्यावेळी आम्ही आमच्या आनंदीबाई जोशी नऊवारी नेसून अमेरिकेत गेल्या आणि नऊवारी तच डॉक्टर होऊन भारतात परत आल्या, हे विसरतो, सावित्रीबाई फुलेंच ठसठशीत कुंकू विसरतो! प्रतिभाताई पाटील ह्याच लांब बाह्याचं blouse आणि डोक्यावर चा पदर विसरतो, आयुष्यात कोठे कमी पडल्या ह्या स्रिया? 50% आमची स्त्री शक्ती आहे आणि त्यातील बरीचशी असे चुकीच्या गोष्टीचेच अनुकरण करतांना दिसते आहे, की जे करायचे नाहीये, ज्या गोष्टी च अनुकरण करायचे आहे, त्या गोष्टींकडे मात्र पूर्ण डोळेझाक होते आहे.
आमच्या पूर्ण समाजाला कमी श्रमात, जास्तीत जास्त पैसा कमाविण्याची चटक लागलेली आहे, त्यासाठी ते वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या आयडिया शोधून काढतात. आमचा दोन रूम वरचा स्लॅब, आमचा दोनच महिने पावसाळा ऋतु राहतो, तरी गळतो. आमचे बांधलेले पूल दोन महिन्यांत खचतात. आणि ह्यांचा अथांग नदीतील, अथांग सागरातील पूल, टनेल वर्षानुवर्षे तसाच राहतो. कुठे आहे आमची quality? आणि quality work?
पण तरीही मला खात्री आहे आमचे संस्कार, संस्कृती आणि सभ्यता बरोबर घेऊन, जर आम्ही प्रगती केली तर आम्ही अमेरिकेच्याही पुढे निघून जाऊ. आमच्याकडे जे टॅलेंट आहे त्याचा आम्ही 100% चांगल्याच गोष्टीसाठी उपयोग करून घेतला तर सोनियाचा दिवस फार लांब नाही.
शेवटी काहीही असो
" सौ में से अस्सी बे इमान है! फिर भी मेरा भारत महान है"!🇮🇳🇮🇳🇮🇳 ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.
दिनांक 19 ऑगस्ट ला आम्हाला तेथील वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता फिलाडेल्फिया येथून flight होती. पण अजूनही पारसचे आम्हाला हे दाखवू, ते दाखवू काही संपत नव्हते. यायच्या दिवशी विमान तळावर जाण्यासाठी त्यानं टॅक्सी फक्त railway station पर्यंत केली. कारण आम्हाला तेथील railway आणि station दाखवायचे होते त्याला!मग आम्ही साधारण पाऊण तास त्या चकाचक railway ने विमानतळावर आलो. पारस कधीच फिलाडेल्फिया च्या विमान तळावर गेलेला नव्हता, पण तरीही तो एखाद्या माहिती च्या ठिकाणी फिरावं तसा सराईतपणे फिरत होता. तेथे security checking पर्यंत सोबत थांबता येत होते. आपल्या कडे मात्र एकदा आत गेले की गेले, परत सोबत आलेल्यांना भेटता येत नाही, पण तेथे कुणी सोडायला यायची पध्दतच नाही. त्यामुळेच कदाचित अस असावं. माझ्या डोळ्यांना अखंड धारा लागलेल्या होत्या. मी परत परत चष्मा लावत होते, पुसत होते. पारस मला समजावत होता. आता त्याची भेट कधी होणार? माहीत नाही. जड अंतकरणाने पारसचा निरोप घेतला. आणि अमेरिकेलाही बाय बाय केलं🙋🙋🙋
Comments
Post a Comment