वृक्ष वल्ली आम्हा सोयरे...

झाडे तोडून धरणी माता अगदी ओकी बोकी होत आहे. सिमेंटची जंगले तयार होत आहे. निसर्गाच्या ऋतुचक्रावर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.
अनेक वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवले आहे, "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे" या उक्तीनुसार झाडांची, पाना फुलांची मला प्रथमपासूनच आवड होती, परंतु वेळ मिळत नव्हता. घरात खास अशी जागा पण नव्हती. तरी सुद्धा घर बांधताना, घराच्या आवारात फरशी बसविताना, कंपाऊंडच्या बाजूला मी छोटे-छोटे वाफे तयार करून त्यात झाडे लावली. पण तार कंपाऊंड असल्यामुळे घुशी येऊन माझे सर्व रोप उकरून घाण करून ठेवत. फाउंडेशनच्या खालून येऊन बीळ करून ठेवत आणि माझ्या सर्व मेहनतीवर पाणी फिरे! त्या त्यांच्या बीळामुळे तसेच झाडांच्या मोठ मोठ्या मुळांमुळे दोन तीन वेळा फरशी पण विस्कटून गेली. शेवटी संपूर्ण घराच्या आवारात "फेवर ब्लॉक्स" बसवून वॉल कंपाऊंड करून टाकले. घुशीचा बंदोबस्त तर झाला, पण झाड आणि रोप कोठे लावणार? मग 25 लिटरची  रंगांची बादली असते ना त्या आणून, काही घरच्याच रंगाच्या निघालेल्या बादल्या घेऊन, त्यात सुरुवात केली. बागेचा श्री गणेश: तर झाला!
पण 2020 मध्ये करोना सुरू झाला. सर्व दुकाने बंद! करोनामुळे मी मात्र कार्यालयातून लवकर येऊ लागले. वेळ मिळू लागला. मग काय घरात होत्या त्या प्लास्टिकच्या गोण्या, खाद्य तेलाच्या रिकाम्या झालेल्या बरण्या घेऊन त्यात आजुबाजूची झाडाखालची, पाने मिश्रित माती टाकली. नारळाच्या शेंड्या टाकल्या. कारण लॉकडाउन मुळे कोकोपीट पण मिळत नव्हते. कॉलनीतच जी रोपे मिळाली, जे कटींग मिळाले, ते लावले त्यांची घरच्या घरी जेव्हढी शक्य होती तेव्हढी निगा ठेवली.  काद्याच्या सालीचे पाणी, मिरचीच्या ठेच्याचे पाणी, कडू निंबाच्या पानाचे पाणी ह्यांची फवारणी करू लागले आणि बाग बाळस धरू लागली. जास्वंद, मोगरा, गुलाब ह्यांना फुले येऊ लागली आणि मला उत्साह येऊ लागला. घरातील "किचन वेस्ट" एक छिद्रे केलेल्या ड्रम मध्ये टाकून, त्यात गुळ पाणी आणि दह्याचे पाणी, ताक असे घालून त्या पासून कंपोस्ट खत तयार करू लागले. त्यातून मला खरोखरच "काळे सोन" मिळू लागले. ते कंपोस्ट गाळताना मला मेहनत करावी लागत आहे, असे मुळीच वाटले नाही आणि आताही वाटत नाही. उलट एकेक रोपाला तो खाऊ वाटताना समाधान वाटत. ती रोपे त्यामुळे बहरत आहेत हे पाहून आनंद द्विगुणित होतो. माझी ही "कंपोस्ट खत" बनविण्याची प्रक्रिया, साखळी  अतिशय उत्तम रीतीने आजही सुरू आहे. घंटा गाडीत माझे फक्त प्लास्टिक रॅपर आणि ज्या वस्तू कंपोस्ट होऊ शकणार नाहीत, तोच कचरा फक्त जातो. नंतरच्या काळात खूप साऱ्या प्लास्टिकच्या हँगिंग्स आणि इतर कुंड्या आणून माझी बाग जास्तच बहरली. आज जवळ जवळ लहान मोठ्या मिळून अडीचशे-तीनशे कुंड्या माझ्याकडे आहेत. त्यात काही फुलझाडे, अळूची पाने, कॅक्टस, काही शो ची झाडे असे बरेच प्रकार आहेत. एकाच प्रकारच्या रोपापासून अनेक रोपे बनविण्याचा छंद देखील मला आहे. त्यामुळे नवनिर्मितीचा आनंद मिळतो. आपण नवीन लावलेल्या रोपाला जेव्हा पाने येतात, तेव्हा तो आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यायला हवी! या छंदामुळे माझ्याकडील कुंड्याची संख्या वाढतच गेली. जागा कमी असल्याने कंपाऊंड मध्ये, पोर्च वर आणि गच्चीवर अशा तीन ठिकाणी सर्व कुंड्या आणि हँगिंग्ज आहेत. त्यांना पाणी देण्यापासून, त्यांची माती बदलविणे, त्यांची फवारणी करणे, कटिंग करणे वगैरे सर्व कामे मी एकटीच करते. 
खरं म्हणजे मला तशी बागेची, रोपांची, शेतीची कोणतीही माहिती नव्हती , अनुभव नव्हता, पण हळू हळू स्वतः च्या अनुभवातूनच एकेक गोष्ट शिकत गेले. कोणत्या रोपाला पाणी जास्त लागते, कोणत्या रोपाला ऊन जास्त लागते, कोणते रोप फक्त त्याची काडी लावली तरी येवू शकते. कोणती रोपे हिवाळ्यात मृतावस्थेत असतात. मावा पडला तर काय करायचे. सार सार फक्त अनुभवातून शिकले. घरातील एक एक प्लास्टिकच्या वस्तूचा बागेमध्ये उपयोग करून घेऊ लागले. अगदी हार्पिक ची बाटली देखील माझ्याकडून सुटली नाही. आता तर हा पसारा एव्हढा वाढला आहे की, बऱ्याच व्यक्ती बागेसाठी माझा सल्ला घेऊ लागल्या आहेत. माझी बाग पाहायला येऊ लागल्या आहेत! आपणही असाच बगीचा बनवू या, म्हणून संकल्प करून घरी जावू लागल्या आहेत. एक दोघींनी खरोखरच माझ्यापासून प्रेरणा घेवून बाग विकसित केलेली आहे. 
मे महिन्यात रिटायर्ड झाल्यानंतर, थोडे किचन गार्डनिंग करावे, असे वाटू लागले होते. कारण आतापर्यंत मी हे सर्व काम ऑफिस करून करत होते. पण आता मला जास्त वेळ मिळणार होता. म्हणून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर घरीच प्लास्टिकच्या गोणींपासून एक लांब आकाराची कॅरी तयार केली. सहा सात मोठ्या कुंड्या आणल्या आणि त्यात खराब झालेले, पात आलेले कांदे लावले. थोडे वांग्याचे, मिरचीचे, गिलक्याचे, भेंडीचे बी आणून ते लावले. कांद्याची अतिशय चविष्ट पात तर आम्हाला कधीच मिळू लागली आहे. बाकीच्या भाज्या अजून प्रगतीपथावर आहेत. लवकरच त्याही सेंद्रीय भाज्या आम्हाला मिळतील, ही अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)