नयनरम्य लक्षद्वीप
रक्ताच नातं जसं एकमेकांना आकर्षित करत, त्याला भेटण्याची ओढ लागते, तसंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मैत्रीचं नातं जुळून येत. विचार जुळले की, एखाद्या चुंबकाप्रमाणे त्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. वर्षानुवर्षे त्यांची भेट झाली नाही तरी प्रेम काही कमी होत नाही, ते वाढतच जात. सूर जुळतच जातात आणि मैत्रीचे थरावर थर चढून ते नात वृद्धिंगत होत जात. पुणे येथील स्मिता बुरांडेच आणि माझही असंच काहीस झालं. आम्ही दोघी आमच्या न्यू इंडिया च्या pre retirement च्या training ला तीन दिवस एकत्र आलो आणि जणू काही आमची फार पूर्वीपासून ओळख आहे अशी घट्ट मैत्री झाली. आम्ही दोघी मे महिन्यात रिटायर्ड झाल्यानंतर ती आणि तिचे यजमान सप्टेंबर महिन्यात, माझ्याकडे मालेगाव येथे आले आणि हे आमचे मैत्रीचे संबंध आमच्या दोघींपुरता मर्यादित न राहता त्याचे रूपांतर कौटुंबिक मित्रत्वात झाले. ही आमची मैत्री दृढ होण्यासाठी बुरांडे साहेबांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी प्रथम मालेगांवला येवून खऱ्या अर्थाने या आमच्या मैत्रीची जी पायवाट होती तिचा हमरस्ता तयार केला. मी पण आक्टोबर महिन्यात पुण्याला दिरांकडे आल्यानंतर स्मिताकडे गेले होते. त्यावेळी ते दोघे नुकतेच श्रीलंका दौरा करून आले होते. आम्हालाही श्रीलंकेला जायचे होतेच, म्हणून मी त्यांच्याकडे चौकशी केली, तर ते म्हणाले, "तुमचे लक्षद्वीप झाले आहे का? जर नसेल झाले तर आम्ही जानेवारीत लक्षद्वीप करीत आहोत, तुम्ही आमच्याबरोबर अगोदर लक्षद्वीप करा आणि नंतर श्रीलकेला जा". मलाही स्मिताचा सहवास आणि संगत हवीच होती, त्यानुसार बुरांडे सरानीच पुढाकार घेऊन पुण्याच्या बी जी केळकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे आमचे आणि त्यांचेही तिकीट बुक केले. आमच्या बरोबर अजून त्यांचे एक मित्र श्री योगेश आणि निता डांगरे हे पण येणार होते.
आमची टूर 20 जानेवारीला पुणे येथून सुरु होऊन 25 तारखेला तिची पुणे येथेच सांगता होणार होती. परतू आम्हाला मालेगांव येथून प्रवासाची सुरुवात करावयाची असल्यामुळे आम्ही दिनांक 18 जानेवारीला रात्रीच मालेगांव येथून निघून 19 तारखेला सकाळी पुणे येथे पोहोचलो. म्हणजे आमची टूर दिनांक 18 तारखेलाच सुरू झाली म्हणायची!
दिनांक 20 जानेवारीला दुपारी एक वाजता, आम्हाला पुणे येथून गोवा जाण्यासाठी flight होती. आमचा गोवा येथे एक दिवसाचा मुक्काम होता. आम्ही 19 तारखेला पुणे येथे दीरांकडे आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा नाश्ता करून, सव्वा नऊ वाजता टॅक्सी ने लोहगाव विमानतळावर साधारण साडे दहा वाजता पोहोचलो. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक बरीच होती. बुरांडे आणि डांगरे कुटुंबीय साधारण अकरा वाजता विमानतळावर पोहोचले. स्मिताने आणि बुरांडे साहेबांनी डांगरे कुटुंबाशी आमची ओळख करून दिली आणि नंतर विमानतळावरच आमचा सहा जणांचा एक छानसा ग्रुप बनून गेला. डांगरे कुटुंबाशी नुकतीच ओळख झालेली आहे, असे चुकूनही वाटले नाही. ते दोघेही अतिशय सुस्वभावी आहेत. नीताच्या लाघवी स्वभावाने माझे मन लगेच जिंकून घेतले. सहाही जणांनी एकत्रितपणे सिक्युरिटी चेकिंग केले. त्यानंतर स्मिता आणि बुरांडे साहेबांनी आम्हाला खूपच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी आमच्या सहाही जणांचे जेवण सोबत बनवून आणलेले होते! पुणे विमानतळावर आमची सहा जणांची छान अंगत पंगत बसली. स्मिताने आणि बुरांडे साहेबांनी बटाट्याची भाजी, पोळी, मसाले भात, चटणी, लोणचे काय काय आणले होते, काही विचारुच नका! त्यात त्यांचे अजून आग्रह करून करून वाढणे! शरीर आणि आत्मा एकदम तृप्त झाला. एव्हढ्या सकाळी, प्रवासाच्या तयारी बरोबर, हे रुचकर जेवण बनवून आणण्याचं काम या दोघांनी केले आणि आम्हा चारही जणांना सुखद धक्का दिला! बर जेवण पॅकिंग करून आणलेले म्हणजे अगदी चमच्यांपासून सगळ कस व्यवस्थित! साग्रसंगीत! खरच खूप मनापासून धन्यवाद स्मिता आणि बुरांडे साहेब 🙏
Flight ला दहा पंधरा मिनिटे विलंब झाला. त्यामुळे आम्ही गोवा येथील मनोहर एअर पोर्ट वर साधारण अडीच वाजेपर्यंत पोहोचलो. थोड्याच वेळात आमची टेम्पो ट्रॅव्हलर आम्हा सहा जणांना घेऊन "झोन कनेक्ट" या गोवा येथील हॉटेल मध्ये घेऊन आली. हॉटेल अतिशय उत्कृष्ट होते. बुरांडे साहेबांनी त्यांच्या रूम मध्ये आम्हाला चहा पिण्याचे आमंत्रण दिले आणि अतिशय उत्कृष्ट चहा त्यांनी आम्हाला देऊ केला. नंतर संपूर्ण प्रवासात, हॉटेलमध्ये चहा मिळाला नाही की, बुरांडे साहेबांनी आम्हाला चहा तयार करून द्यायचा, (मग त्यांना तो प्यायचा असो वा नसो)असा जणू अलिखित नियमच झाला! त्यांच्या त्या चहाचे पैसे देणे अजून बाकी आहे 😃
त्यानंतर आमच्या रूम मध्ये येऊन, तयार होऊन साडे चार वाजता आम्ही त्याच गाडीने "बागा बीच" वर गेलो. बीचवर खूप सारे फोटो काढले, गप्पा मारल्या. आमच्याच टूर मधील पुणे येथील जोशी कुटुंबिय देखील आम्हाला याच बीचवर परिचित झाले. त्याच्याबरोबर त्यांचा भाचा आणि भाची आपापल्या जोडीदारासमवेत आलेले होते. भाचेजावयाला तर बुरांडे साहेबांनी "जावईबापूच" बनवून टाकले. जावईबापू देखील त्यांना अतिशय उत्तम रित्या प्रतिसाद देत होते! शेवटपर्यंत त्यांचे "बापू" हे नामकरण कायम राहिले. हे चारही जण तरुण होते. म्हणजे आमच्या मुलांपेक्षाही लहान असावेत. आम्हाला त्यांचे सहकार्य शेवटपर्यंत मिळाले. त्यांच्यामुळे आम्हाला कोठे विलंब झाला असे कधीच झाले नाही. उलट फोटो काढायचा असो की एखादी राईड ठरवायची असो, त्यांनी आपण होवून पुढाकार घेतला आणि आम्हाला सहकार्य केले.
"बागा बीच " वर समुद्राचा आणि सुर्यास्ताचा आम्ही सर्वांनी आनंद लुटला. येथेच बी जी केळकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या आम्हा तेरा सदस्यांचा पहिला ग्रुप फोटो काढला गेला. वाडेकर साहेबांनी बीच वर एक सुंदर गाणे म्हटले आणि सात वाजता आम्ही हॉटेलला परत आलो. साडे आठला हॉटेलमध्ये जेवण केले आणि साधारण नऊ वाजताच आपापल्या रूम मध्ये गेलो, कारण उद्या सकाळी साडेचार वाजता तयार होऊन आम्हाला विमानतळ गाठायचे होते. उद्या लक्षद्वीप साठीची आमची flight सकाळी सात वाजताच होती.
सकाळी सव्वा तीन वाजता उठायचे ठरविले होते, पण नेहमीप्रमाणे मी पावणे तीन वाजेच्या आतच उठले. रात्रीही लवकर झोप येईना. एकतर उद्या सकाळी उठायचे टेन्शन म्हणा किंवा जागा बदल असेल, पण झोपेची खूपच आराधना करावी लागली. तरीही " मला लवकर जाग यावी आणि मी फ्रेश होऊन उठावे," ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे. मी यासाठी नेहमीच त्याचे आभार मानते🙏. झोप कमी झाली, म्हणून मला कधीच त्रास होत नाही.
सकाळी उठताच रूम मध्ये मस्त पैकी कॉफी केली. अंघोळ करून नंतर ह्यांना उठविले. त्यांच्या बरोबर पुन्हा कॉफी घेतली. तेव्हढ्यात बुरांडे साहेब परत आम्हाला चहा प्यायला बोलवायला आले. आदल्या दिवसाप्रमाणेच त्यांनी स्वतः चहा तयार करून आम्हाला दिला.
बरोबर तरुण मंडळी असल्यामुळे सकाळी एअर पोर्ट वर जायला आपल्याला विलंब होईल, असे मला वाटत होते, परंतु सव्वाचार वाजता आम्ही अगदी तयार होतो. बी जी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या 13 ही सदस्यांनी आपली वेळ शेवटपर्यंत अगदी अचूक पाळली. पावणेपाच वाजता आम्ही एअर पोर्ट साठी रवाना झालो. Passengers कमी असून देखील, गोवा विमान तळावर check-in साठी खूपच वेळ लागला. त्यांची काम करण्याची पद्धत अगदीच संथ होती, शिवाय permit वगैरे जास्तीच्या कागदपत्रांची अधिक तपासणी होत होती. त्यामुळेच मानदुखी साठी नेहमीच असणारा, माझ्या पर्स मधील "मूव स्प्रे " पुणे विमानतळाच्या तपासणीत सुटला होता; पण गोवा विमानतळावर मात्र तो फेकून दिला गेला. पर्स मधील छोट्या पाण्याच्या बाटलीतील पाणी, मला पिऊन दाखवावे लागले. एव्हढी तपासणी कडक होती. असो.
आम्ही लवकर आल्यामुळे आमचं सगळे check-in वेळेत आटोपले आणि आम्ही सात वाजेपर्यंत गेट वर येऊन पोहोचलो. विमान बरेच छोटे होते. म्हणजे जेमतेम सत्तर प्रवाशांचे असावे. विमानात बसताच सगळ्यांनी एक एक डूलकी घेतली. कारण आदल्या दिवसाचा प्रवास, फिरणे, त्यामुळे बरीच दमादम झालेली होती. त्यात सकाळी भल्या पहाटे उठल्या मुळे सगळ्यांनाच झोपेची गरज होती. लक्षद्वीपचे अगत्ती विमानतळ येण्यापूर्वी सर्वांची झोप होऊन, सर्वजण उतरण्यासाठी तयार झाले. विमानात मी विंडो सीटवर होते, त्यामुळे मला दुरूनच लक्षद्वीप दिसू लागले होते. एखाद्या झाडाच्या पानाच्या आकारासारखे हे बेट आहे. विमानाने लँडिंग घेण्यापूर्वी असे वाटत होते की, समुद्राचा स्पर्श विमानाला होतो की काय? एव्हढा समुद्र जवळ दिसत होता. वैमानिकांच थोड जरी वेळेच गणित चुकलं, तरी काय संकट उभ राहील हे सांगता येणार नाही!
विमानतळाच्या दोन्ही बाजूला समुद्र दिसत होता. धावपट्टी तर विमानातून अक्षरश: समुद्राच्या किनाऱ्याला चिकटलेली दिसत होती. आता मला छोट्या विमानाचे रहस्य उलगडले! Agatti
विमानतळावर permit, return tickets, Aadhar card अशा बऱ्याच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आमची सर्व कागदपत्रके तयार होती, तरीही आम्हाला तेथे अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागला असावा. या विमानतळावर अजून एक गोष्ट लक्षात आली की, येथे आमचे लगेज, सरकत्या बेल्ट वर नाही, तर मॅन्युअली देण्यात आले. येथील विमानतळावर सरकता बेल्ट नव्हताच. विमानतळावर आम्हा बी जी केळकर टूर्स च्या 13 सदस्यांसाठी तीन गाड्या आलेल्या होत्या. त्या तीनही गाड्या आम्हाला आमच्या "सी व्ह्यू " या हॉटेलमध्ये घेऊन आल्या. हॉटेल मध्ये येतानाच आम्हाल दोन्ही बाजूला समुद्र किनारा आणि मध्ये आमचा रस्ता असा देखावा दिसत होता. Agatti ची लोकसंख्या साधारण सात साडेसात हजार असेल आणि क्षेत्रफळ चार हजार स्क्वेअर किलोमीटर पेक्षाही कमी असावे, अशी माहिती आम्हाला ड्रायव्हरने दिली. हॉटेलच्या प्रांगणात प्रवेश करताच आम्हाला जे दिसलं, ते पाहून आमच्या डोळ्याचे खरोखरच पारणे फिटले. समोर अथांग समुद्र, त्यातील काचेसारख स्वच्छ निळेशार पाणी, पांढरी स्वच्छ वाळू त्यासमोरच असणाऱ्या आमच्या रूम्स! स्पीड बोट, साध्या बोट, मोटर बोट सगळेच प्रकार दिसत होते. हॉटेलच्या आवारात ठिकठिकाणी झोपाळे , झुले, सन बाथ घेण्यासाठी झोपायचे लाकडी बेड, खुर्च्या, लायटिंग, स्टेज सगळच दृश्य भारावून टाकणार होतं. प्रत्यक्षात असे रमणीय दृश्य मी कधीच पाहिले नव्हते. आपण स्वप्न नगरीत तर आलो नाहीत ना? हा भास तर नाही ना? अस क्षणभर वाटून गेल, पण जे काय समोर दिसत होतं ते पाहून खूप आनंद झाला. येथे आपल्याला तीन चार दिवस राहायचे आहे, यावर विश्वासच बसत नव्हता.
आम्ही ब्रेकफास्ट घेतला. थोड्यावेळाने रूम मध्ये जाऊन फ्रेश झालो आणि लगेच समुद्रात ओले होण्यासाठी गेलो. मी तर जवळ जवळ दोन तास पाणी पाणी खेळत होते. खूपच मजा वाटत होती. आज मी लहान मूल झाले होते. लक्षद्वीप येथे असेपर्यंत सगळेच दिवस "उनाड दिवस " म्हणूनच साजरे करायचे असे मी मनाशी ठरवूनच टाकले होते. दुपारी जेवणानंतर थोडा आराम केला. संध्याकाळी चहा घेऊन आम्ही जवळच असणारा, जेथे जहाज थांबतात तो "धक्का" बघायला गेलो. नाहीतरी चार हजार किलोमीटरच्या परिसरात लांब राहून राहून अस कितीस लांब राहणार ? धक्क्यावर आम्हाला एका गाडीमध्ये मोठे मोठे मासे असणारे कॅरेट भरताना माणसे दिसली. चौकशी करता तो "तुना" मासा होता असे कळाले. मासे ठेवण्याची पद्धत देखील खूपच शिस्तबद्ध होती. रांगेने आडवे आणि उभे मासे मोजून घ्या, अशारितीने एका रांगेत ते मासे ठेवलेले होते. मला तर अगोदर ते सर्व मासे एकसारखे दिसत असल्यामुळे कृत्रिमच वाटले ; पण माशांचा वास कसा लपणार? ह्यां सर्वांनी ते मासे हातात धरून फोटो काढले. तीन साडेतीन किलोचा एक एक मासा होता! गाडीत माशांचे कॅरेट ठेवणारा, आम्हाला असाच गिफ्ट म्हणून एक मासा घेण्याचा आग्रह करत होता, पण आम्ही तो घेतला नाही. धक्का बघून आणि माशांची टेम्पो बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्याच गाडीने सूर्यास्त पाहण्यासाठी "लगून बीच " वर गेलो. हा ही बीच अतिशय सुंदर होता. पांढरी स्वच्छ वाळू आणि अथांग पसरलेला समुद्र! क्षितिजापलीकडे होणारा सूर्यास्त. अतिशय रमणीय दृश्य, आम्ही आमच्या डोळ्यात साठविले. तेथे खास फोटोसाठी असणाऱ्या सायकल, टॅक्टर यावर बसून आम्ही सर्वांनी फोटो काढले, आनंद लुटला. रात्री परत हॉटेलवर येऊन जेवण केले. जेवणानंतर हॉटेलच्या आवारातच, येथील स्थानीक कलाकाराचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता, तो पाहिला. त्या कलाकारांनी खूपच मेहनतीने आपल्या कला सादर केल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सूर्योदय पाहण्याचा आणि त्यानंतर मॉर्निंग वॉक करण्याचा बेत केला. आणि ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच सूर्योदय पाहण्यासाठी निघालो. आमच्या हॉटेलपासून रस्ता ओलांडून दुसरे हॉटेल "सी सोल" हे होते आणि लगेच सुंदर बीच होता, तेथूनच आम्हाला सूर्योदय पहायचा होता. आमच्या "सी व्ह्यू" या हॉटेल मधून सूर्यास्त, तर समोरच्या " सी सोल " या हॉटेलमधून सूर्योदय! किती आश्चर्य आहे ना? यावरूनच लक्षद्वीप हे बेट कसे असेल याची तुम्हाला कल्पना येईल. एव्हढ्या सकाळी चहा मिळणार नाही, हे आम्ही गृहितच धरले होते, परंतु बुरांडे साहेबांनी, हॉटेलच्या किचन मध्ये जाऊन आम्हाला अतिशय उत्कृष्ट चहा दिला. बुरांडे साहेब आमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीची चिंता नव्हती. कोणताही प्रश्न ते चुटकीसरशी सोडवत होते. आमच्या सर्वांची ते अतिशय काळजी घेत होते. त्यांची सोबत आम्हाला मिळाली, हे खरच आमचे भाग्यच म्हणायला हवे. योगेशदादा (डांगरे) देखील तसेच उत्साही होते. आमच्यासाठी वेगवेगळे पदार्थ आणून, खाऊ घालण्याचा त्या दोहोंचा उत्साह तर खूपच दांडगा होता. त्यादिवशी गणेश जयंती आणि गुरुवार असल्यामुळे आमचा सगळ्यांचाच उपवास होता. पण एकादशी आणि दुप्पट खाशी अशी त्यांनी आमची अवस्था करून टाकली!
सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही सहा वाजता निघालो, पण दोन मिनिटांच्या अंतरावर बीच असल्यामुळे आणि सूर्योदय सात वाजता होणार असल्याने, आम्हाला पुन्हा भल्या पहाटे बीचवर फिरण्याचा आनंद लुटता आला. बीच वर कोठे कोठे पांढरे खेकडे दिसत होते, म्हणून थोडी भीतीही वाटत होती. सात वाजता सूर्योदय पाहून आम्ही एक तास भटकंती केली आणि आठ वाजता हॉटेलवर आलो. तयार होऊन नाश्ता करून, दहा वाजता, डॉल्फिन बघण्यासाठी गाडीने धक्क्या पर्यंत गेलो. तेथून एका बोटीने समुद्रात गेलो जवळ जवळ एक तास आम्ही बोटीने प्रवास केला असेल, त्यानंतर आम्हाला दोन ते तीन वेळा अगदी लांबून ओझरते डॉल्फिनचे दर्शन झाले. त्यानंतर आमची बोट पुन्हा आम्हाला "स्नोकलिंग" करण्यासाठी साधारण एक तासाचा प्रवास करून घेऊन गेली. समुद्रातील हा बोटीचा प्रवास देखील खूपच आल्हाददायक वाटत होता. आमच्या बोटीमध्ये आम्ही फक्त बी जी केळकर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे 13 मेंबर्स होतो. आणि आता हे आमचं 13 जणांचे एक कुटुंबच बनून गेल होत! त्यामुळे आता एकमेकांना सगळे जण नाव धरून संबोधू लागले होते. बहुतेक सर्व पुरुष मंडळींना पोहणे येत होते, म्हणून ते "स्नोकलिंग" करण्यासाठी उत्सुक होते. महिला वर्ग बाकी नाही नाही म्हणत होता. एक दोघींनी प्रयत्न देखील केला, पण त्या लगेच घाबरून वर आल्या. मी मात्र प्रथमपासूनच मनाची तयारी करू ठेवली होती. काहीही झाले तरी आपण हा अनुभव घ्यायचाच! आपण काही पुन्हा लक्षद्वीपला येणार नाहीत, ही संधी पुन्हा आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही. मी हिमतीने पाण्यात तर गेले आणि एका मिनिटातच माझ्या तोंडात आणि नाकात पाणी जायला लागले. मी घाबरले, पण त्या गाईडने नाकावर मास्क दाबून पाणी काढण्यास सांगितले आणि मी तसे करताच मला बरे वाटले. तोपर्यंत समुद्राच्या तळाचे सौंदर्य मला खुणावू लागले होते आणि मी खरोखरच देहभान विसरून, भीती विसरून ते सौंदर्य प्राण कंठाशी आणून डोळ्यात साठवू लागले. ते रंगीबेरंगी विविध आकाराचे मासे, त्या विविध रंगी वनस्पती आणि खडक सारंच कल्पनेच्या पलिकडचेहोते ! मी आतासुद्धा ते शब्दात सांगू शकत नाही. ते सौंदर्य आपण प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहायला हवे, अनुभवायला हवे! अतिशय रोमांचित करणारा, हा सुखद अनुभव होता. त्यानंतर बोटीवरच आम्हाला दुपारचे जेवण देण्यात आले; परतू आमचा काही जणांचा उपवास असल्यामुळे आम्ही सोबत नेलेले फराळाचे पदार्थ खाल्ले. जेवण झाल्यानंतर बोट परतीच्या प्रवासाला लागली. परत येताना देखील बुरांडे साहेबांनी अजून एक धक्का आम्हाला दिला. तो म्हणजे त्यांनी बोटीच स्टिअरिंग स्वतः हातात घेतल आणि बराच वेळ बोट चालविली. साधारण साडे तीन वाजता आम्ही हॉटेल मध्ये आलो. अंघोळ वैगेरे करून, चहा घेतला. थोडा आराम केला. बाहेरच्या खुर्च्यांवर बसून मस्त पैकी समुद्राचा आनंद लुटला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला "स्कुबा डायव्हिंग " करावयाचे होते. ज्यांना "स्कुबा डायव्हिंग" करावयाचे असेल त्यांनी दोन तास अगोदर ब्रेक फास्ट करावा, नाहीतर त्रास होण्याची शक्यता असते, असे सांगितल्यामुळे आम्ही लवकरच ब्रेक फास्ट केला. आमच्याच हॉटेल मध्ये, स्कुबा, कायकिंग, ग्लास बोट, मोटर बोट असल्यामुळे कोठे बाहेर जायची आम्हाला गरज पडली नाही. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी एक declaration form आमच्याकडून भरून घेण्यात आला. आणि तेवढ्याच म्हणजे सात व्यक्तींना एका बोट मध्ये बसविण्यात आले. 10/15 मिनिटाच्या समुद्री प्रवासानंतर आमच्या बोट मधून परत दुसऱ्या बोट मध्ये आम्हाला बसविण्यात आले. तेथे पाच स्कुबा मास्टर तयारच होते. ते एका मिनिटात बोटीमधून येऊन, क्षणार्धात समुद्रात दणादणा उद्या मारायचे. त्यांना पाहताच मला कमांडोंची आठवण झाली. एव्हढी चपळाई त्यांच्यात होती. त्यात एक लेडी स्कुबा मास्टर देखील होती. तिही इतर मेल मास्टर पेक्षा कोठेही कमी दिसत नव्हती. याही क्षेत्रात स्त्रियां असाव्यात, हे पाहून मला तिचा अभिमान आणि कौतुक वाटले. आम्हाला एकेकाला मास्क लावून स्कुबासाठी जे ऑक्सिजन किट असत ते लावण्यात आले. तोंडात एक उपकरण टाकून, तोंडाने श्वास कसा घ्यायचा ते समजावून सांगण्यात आले. "ओके, अस्वस्थ, छान, वर चला, खाली चला, खाली जाण्यासाठी तयार आहात का?" यासाठी हाताच्या खुणा कशा करावयाच्या ते समजावून सांगण्यात आले. आमच्या पैकी चार पुरुष आणि तीन महिला, स्कुबा डायव्हिंग करणार होतो. तीन महिलांपैकी दोन तरुणी आणि मी होते, त्यातील एक तरुणी मास्क घालण्याच्या आतच घाबरून नाही म्हणाली, दुसरीने मास्क घातला आणि पाण्यांत उतरताच परत वर आली, मी बाकी "स्कुबा डायव्हिंग" करण्यासाठी अगोदर पासून तयार होते, परंतु आता त्या तरुण मुलींकडे पाहून मी हे करू शकते की नाही, म्हणून माझा विश्वास थोडा डळमळू लागला होता. त्यामुळे मी घाई करून ताबडतोब पाण्यात उतरले. माणसाला विचार करायला वेळ मिळाला की, त्याला अनेक दिशा मिळतात. तो त्या गोष्टीचे नको तितके विश्लेषण करत बसतो आणि हे विश्लेषण बहुतेक वेळा नकारात्मकतेकडेच अधिक झुकत जाते. म्हणून अशा वेळी घाई करावी आणि मनाला त्या नकारात्मक विचारांपासून त्वरित पळवून घेऊन यावं, अस माझं प्रामाणिक मत आहे. असो.
स्कुबा डायव्हिंग करताना श्वास घेण्यासाठी जे तोंडांत टाकायचे उपकरण होते, ते जरा मोठे होते आणि माझा जबडा खूप टाईट असल्यामुळे मला त्याचा त्रास होणार, हे निश्चित होते. पण तरीही माझी मानसिक ताकद खूप जास्त होती. बराच वेळ माझ्या स्कुबा मास्टरने मला पाण्यावर तरंगत ठेवलं. नाकाने श्वास घ्यायचाच नाही हे समजावून सांगितले, पण कसलं काय? मी पाण्यात चेहरा टाकताच, मान खाली घालताच नाकाने श्वास घेऊ लागले. शेवटी स्कुबा मास्टरने माझे नाक हाताने दाबून ठेवले, मग मला लक्षात आले की, " नाक दाबले की तोंड उघडते"! त्यानंतर संपूर्ण स्कुबा डायव्हिंग होईपर्यंत, मी एक हाताने माझे नाक दाबून ठेवले होते. मध्येच अगदी काही सेकंदासाठी माझ्या तोंडातून श्वास घेण्यासाठी दिलेले उपकरण निघाले, पण ताबडतोब स्कुबा मास्टरने तसे न होऊ देण्याची हाताने मला सूचना केली आणि काही क्षणातच त्याने माझ्या तोंडांत ते उपकरण बसविले. आता मात्र हे लिहित असताना माझ्या मनात विचार येऊन जातो आहे की, जर त्याने ते उपकरण ताबडतोब माझ्या तोंडात बसविले नसते तर काय झाले असते? त्यानंतर मी पुन्हा केव्हाच ती चूक होऊ दिली नाही. डोळ्यात प्राण साठवून समुद्राच्या पोटातील ते आगळ वेगळं जीवन पाहात राहिले. विविध रंगातील आणि विविध प्रकारचे ते मासे, ते जीव जंतू, ती वनस्पती, ते खडक, ते सार सार खरोखर डोळे विस्फारून आणि कंठाशी प्राण आणून बघितले. खडकाला हात लावून बघितला. टिचकी वाजवून, त्या समुद्री जीवांना त्यांच्या घरात/बिळात जायला लावले. विविध रंगाचे ते सर्व प्राणी पाहिले. निसर्गाची किमया खरच न्यारी! खाली आता समुद्राचा तळ दिसू लागला होता. वाळू दिसू लागली होती, पाणी नितळ असल्यामुळे तळ अगदी लगेच आहे असा भास होत होता. पण बऱ्याच वेळाने माझे पाय खाली टेकले गेले, मी चार पाच पाऊले त्या समुद्रात टाकली आणि धन्य धन्य झाले! चालणे संपल्यानंतर स्कुबा मास्टर ने मला वर आणले. जणू मी खूप मोठा पराक्रम करून आले, अशा थाटात समाधानाने मी वर आले. पारसने माझ्या मुलाने मला "स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अवश्य जा, नव्हे ते करूनच ये" असे का सांगितले होते, ते लक्षात आले.
हॉटेल मध्ये आल्यानंतर जेवणासाठी अर्धा एक तास वेळ होता, मग तो असा कसा वाया जाऊ द्यायचा? कपडे ओले होतेच, म्हणून मी पुन्हा अर्धा तास पाणी पाणी खेळले. वेळ मिळाला की, मी पाण्यात जात असे किंवा पाणी पाणी तरी खेळत असे. मी सारखी पाण्यात जात होते, म्हणून स्मिता मला प्रेमाने " पान कोंबडी" म्हणू लागली होती.
संध्याकाळी आम्हाला, ग्लास बोट मधून "ग्रीन टरटल" बघायला जायचे होते. त्यानुसार चहा पाणी करून आम्ही ग्लास बोट ने समुद्रात गेलो. पुन्हा ते समुद्री जीवन काचेतून बघितले. हिरव्या आणि काळया रंगाची दोन मोठमोठी कासवे आम्हाला दिसली. निरनिराळ्या प्रकारचे विविध मासे आम्ही पुन्हा पाहिले. बोट बराच वेळ तेथे वर्तुळाकार फिरत होती. आणि समुद्री जीवांचे आम्हाला दर्शन घडवित होती. त्यांनतर बोट आम्हाला घेऊन "कलपट्टी "या निर्मनुष्य बेटावर घेऊन आली. या बेटावर घनदाट अशी चाफ्याच्या झाडासारखी झाडे आणि इतरही बरीच झाडी होती. दोन्ही बाजूला समुद्र किनारा आणि मध्ये पायवाट होती. या बेटाचे सगळ्यात मोठे आकर्षण मला वाटले ते तेथील वैशिष्ट्यपूर्ण जीवाश्मसाठी! विविध प्रकारची, विविध रंगांची आणि विविध आकारांची असंख्य जीवाश्म तेथे आम्हाला दिसून आली. मनात येईल तो आकार ते जीवाश्म धारण करत होते. मग ते कधी हळकुंड दिसत, कधी हत्ती, कधी पक्षी म्हणजे चिमणी, कावळा, कबुतर, कधी जिराफ तर कधी चक्क गणपती दिसत होते! बरेच मोठमोठे खडक ही येथे होते, त्या खडकांच्या कपारीत झुंडीच्या झुंडी काळया रंगाचे खेकडे होते. तेथे आम्ही सुर्यास्त बघितला, खूप सारे फोटो काढले आणि अंधार पडण्याच्या सुमारास परत निघालो. हॉटेलमध्ये येईपर्यंत अक्षरश काळाकुट्ट अंधार पडला होता. येथेही बुरांडे साहेबांनी यशस्वीरीत्या ग्लास बोट चालवून पाहिली!
लक्षद्वीपला आल्यापासून एकेक दिवस अविस्मरणीय ठरत होता. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आम्ही अनुभव घेत होतो, आनंद मिळवित होतो.
लक्षद्वीप मध्ये कधीच कोणताच गुन्हा/ चोरी होत नाही या गोष्टीचा येथे मला आवर्जून उल्लेख करावसा वाटतो. येथील आमच्या रूमचे कुलूप कायम उघडेच राहत असे. सगळ्यांच्या पर्स आणि मोबाईल देखील कोणत्याही जेवणाच्या टेबलावर पडलेला असे. भाड्याने घेतलेल्या गाड्यांच्या किल्ल्या देखील अशाच कोठेही असत, परंतु एक वस्तूही कोणाची हरविली नाही! लक्षद्वीपसाठी ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही समोरच्या बीच वर सूर्योदय पाहण्यासाठी गेलो. वातावरण थोडे ढगाळ होते, पण तरीही पूर्ण सूर्योदय आम्हाला पाहता आला. आमच्या समोरच्या या "सी सोल" हॉटेलच्या बीच वर देखील छान बैठक व्यवस्था होती. तेथे सूर्योदयाचा आनंद लुटता लुटता वाडेकर साहेबांनी एक सुरेख गाणे म्हटले.
त्यानंतर बुरांडे साहेब आणि डांगरे साहेबांनी दोन भाड्याच्या स्कूटर आणून ते चौघ संपूर्ण agatti बेटाला फेर फटका मारून आले. Agatti बेटावर 300 रुपयाला बारा तासांसाठी इलेक्ट्रिक स्कुटी भाड्याने मिळत होती.
आज ज्या मंडळीनी काल स्कुबा डायव्हिंग केले नव्हते, ज्या मंडळींची काल मानसिक तयारी झालेली नव्हती, ते स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेले. उर्वरित लोकांनी त्यांची वाट पाहत, मस्त पैकी झाडाखाली सावलीत कॅरमचा डाव मांडला. शेजारी शहाळीवाला होताच. सर्वांचे मधून मधून शहाळी घेणे चालू होते. मी ही शहाळ्याचा मनसोक्त स्वाद घेतला. आणि हो आमच्या हॉटेलच्या आवारात ताडीची आणि नारळाची झाडे होती, तशी ती संपूर्ण बेटावरच होती. त्याची नीरा सकाळी सकाळी काढली जात असे. आदल्या दिवशी अगदी नुकत्याच झाडावरून उतरलेल्या निराची चव आम्ही चाखली होती. आज एक लिटरची पूर्ण बाटलीच डांगरे साहेबांनी विकत घेतली आणि सगळेजण नीरा प्याले.
संध्याकाळी साडेचार वाजता कॉफी घेऊन आम्ही जेट मोटरबाईक वर राईड घेतली. त्यानंतर कायकिंग केले. या दोन्हीचा अनुभवही थरारक राहिला. विशेषकरून जेट मोटरबाईक चा! यात रायडर आपल्याला पूर्ण कव्हर करून संरक्षण देतो. तरीही या मोटारीच्या वेगाची आपल्याला भीती वाटते, जेव्हढा वेग जास्त तेव्हढाच त्याचा थरार जास्त वाटतो. लक्षद्वीप मधील स्कुबा मास्टरचे, बाईक रायडरचे, स्नोकलिंग करणाऱ्याचे मला खरोखरच कौतुक वाटले. ते आपल्याला खूप सकारात्कक पद्धतीने कोणतीही गोष्ट करण्यासाठी तयार करतात आणि आपल्याला आत्मबल देतात. म्हणूनच आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून या सर्व गोष्टी करू शकतो! "कुछ नाही होगा. मैं हुं ना!" हे त्यांचे ब्रीदच होते.
आजची संध्याकाळ म्हणजे आमची लक्षद्वीप वरील शेवटची संध्याकाळ होती. संध्याकाळी रूमच्या बाहेर आराम खुर्चीवर बराच वेळ समुद्राकडे पाहण्यात घालविला. मोटार बाइक्स, मोठ्या बोट, ग्लास बोट ह्याचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. लक्षद्वीप मध्ये चार दिवसांपासून समुद्राचा आनंद मिळविला होता. तो आता आयुष्यभरासाठी साठवून ठेवायचा होता. आठवणींचे गाठोडे बांधत बांधत लक्षद्वीपला बाय बाय करायचे होते. म्हणता म्हणता चार पाच दिवस कोठे आले आणि कोठे संपले काहीही कळाले नाही. "आनंदाचे आणि सुखाचे दिवस लवकर संपतात" हेच खरं!
25 तारीख हा आमचा लक्षद्वीप चा शेवटचा दिवस होता. मी रात्रभर जवळ जवळ झोपलेच नव्हते. आल्यादिवसापासूनच्या प्रवासाची, आनंदाची, उजळणी मनात अखंड चालू होती. मग कशी झोप लागणार? एक प्रकारची हूरहूर मनाला लागली होती. बेडवर लाटांचे आवाज ऐकू येत होते. नेहेमी प्रमाणे बुरांडे साहेबांनी सव्वा पाच वाजताच चहा साठी आवाज दिला, अजून हॉटेलचे किचन उठलेले देखील नव्हते. परंतु बुरांडे साहेबाना आता येथील किचन पूर्ण परिचित झाले होते. त्यांनी त्या किचन मध्ये गरम पाणी करून आम्हाला सर्वांना भल्या पहाटे उत्कृष्ट चहा तयार करून दिला. हॉटेलच्या आवारात, लक्षद्वीपच्या समुद्राच्या लाटांच्या आवाजात, मंद प्रकाशात आम्ही तो चहा घेतला. सोबतीला गप्पा चालू होत्या. हे क्षण, हे दिवस कधी संपूच नये असे वाटत होते. हा चहा लक्षद्वीपवरचा, बुरांडे साहेबांकडचा, आमचा शेवटचा चहा होता.
अतिशय भल्या, सज्जन, उदार मनाच्या व्यक्तिमत्वाशी आमची ओळख झाली होती. ज्या माणसाने आजपर्यंत पंचवीस देशांची सहल केलेली आहे, तरी त्या माणसाला कोणताही गर्व नाही. सडेतोड विचार आणि आचार, कसला बाऊ नाही की कसला भेदभाव नाही. मित्र म्हणजे मित्र! एकदा जीव लावला, की त्याच्यावर जीव ओवाळून टाकू की काय, अस वाटणारा आणि प्रत्यक्षात देखील तसंच वागणारा! अतिशय मोठ्या मनाची, उदार हृदयाची, अष्टपैलू व्यक्तिमत्वाची आगळी वेगळी अशी ही वल्ली! त्यांच्या स्वभावाची स्तुती करण्यासाठी माझे शब्द अपूर्ण पडतील. हॉटेल मधील मॅनेजर, वेटर, गाडीचा ड्रायव्हर, कोणाकोणशी ते ओळख करून घेतील आणि कोणाशी नाही, हे सांगताच येणार नाही. एकदा ते ज्याच्याशी बोलतील, ती व्यक्ती आयुष्यात त्यांना विसरणे शक्य नाही. अशा बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाच्या सहवासात, आमची ही ट्रिप झाली. खूप खूप धन्यवाद बुरांडे साहेब 🙏🙏🙏
चहा पिऊन, आपापल्या रूम मध्ये जाऊन सात वाजेपर्यंत आम्ही तयार होऊन आलो. हॉटेलचा नाश्ता आता तयार होता. तो घेऊन आम्हीही तयार झालो. डांगरे साहेबांनी आज देखील एक लिटर निराची ऑर्डर केलेली होती. स्मिता आणि मी सोडून उर्वरीत चारींनी मस्तपैकी ताजी आणि शुद्ध नीरा घेतली. लक्षद्वीप सोडून जाऊच नये असे वाटत होते. तरीही आम्ही साडेसात वाजता हॉटेल सोडून विमानतळ गाठले. आमची आजची flight सुद्धा गोवा पर्यंत होती. आणि goa येथून संध्याकाळी साधारण आठ वाजता पुणे येथे जाण्यासाठी दुसरी flight होती. मध्ये आम्हाला चार पाच तासांचा वेळ मिळणार होता.
Flight वेळेवर निघाल्यामुळे गोवा मध्ये ज्यांना थोडी खरेदी करावयाची होती, त्यांना ती करता येणार होती. गोवा येथून आमच्यापैकी चार जण रेल्वेने पुणे येथे जाणार होते. म्हणून आम्ही गोवा विमानतळावर उतरताच बी जी केळकर टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने पाठविलेल्या गाडीने पणजी येथे आलो. थोडी काजूची खरेदी केली, जेवण केले आणि रेल्वे स्थानक गाठले. त्यांना रेल्वे स्थानकावर सोडून आम्ही थोडे लवकरच म्हणजे साडेचार वाजत गोवा विमानतळावर आलो. आमची पुणे येथे जाणारी flight आठ वाजता होती. पण बाहेर कोठे जाण्यासाठी पुरेसा वेळ आमच्याकडे नव्हता. म्हणून आम्ही flight च्या वेळेपर्यंत विमानतळावरच वेळ व्यतीत केला. बरोबर आठ वाजता आमची flight गोवा येथून निघून पुणे येथे दहा वाजता आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. इतर सर्वांचा प्रवास पूर्ण झाला होता, पण आमचा दोहोंचा अजून बाकी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी डांगरे साहेबांच्या आग्रहास्तव आम्ही त्याच्या घरी गेलो. पुण्यातील इतर नातेवाईकांनाही अजून भेटणे बाकी होते, दिवसभरात त्यांना भेटलो आणि दिनांक 27 तारखेला सकाळी पाच वाजता पुणे येथून टॅक्सीने निघून दुपारी साधारण दीड वाजता मालेगांव येथे सुखरूप पोहोचलो.
Comments
Post a Comment