हे (पोहणे) इतके अवघड असते! : भाग 2



आता मी रोज डीप वॉटर मध्ये आडवे न थांबता दोन-तीन फेऱ्या आणि उभ्या पुलाला तीन-चार थांबा करत, एक फेरी मारत होते. दम बाकी खूपच लागत होता. ती एक फेरी सुद्धा मला जड वाटत होती. शिवाय रॉडच्या अगदी चिटकुनच पोहत होते. तो रॉड माझ्या हाताला खूप वेळ नकळत लागून जात होता , पण तरीही त्याची संगत मी सोडत नव्हते. रॉड जवळ कोणी नाही ना? आणि तरीही सगळ्यांचे लक्ष माझ्याकडे आहे ना? हे पाहूनच उडी टाकत होते. सर, कोणाला काही शिकवत असतील, कोणाशी बोलत असतील, तरी मी त्यांना , " सर मी डीप वॉटर मध्ये जात आहे हं! " अस चार-चार वेळा सांगत असे. थोडक्यात अजूनही माझं सुरक्षितता आणि सावधानता बाळगूनच सार काही चालू होतं. एक तर मी, म्हणाव तेव्हढ खोल पाण्यात अजून रिलॅक्स होत नव्हते आणि माझी ताकदही कमी होती, शिकण्याची गती इतरांपेक्षा निश्चितच कमी होती,  हे सगळ मला मान्य होते. म्हणूनच मी पुढच शिकण्याची घाई करत नव्हते. माझ्या मर्यादा मला कळत होत्या. पोहताना थांबल्यानंतर खूप म्हणजे खूपच दम लगत होता, कोणी माझ्याशी बोलले, तरी थोडा वेळ मला बोलता येत नव्हते! थोडक्यात नॉर्मल व्हायला बराच वेळ जात होता. पण मी थांबलेले आहे, म्हणून माझ्या काय-काय चुका होत आहेत, मी काय करायला हवं आहे, हे सांगायला माझ्या अनुभवी मैत्रिणी माझ्याजवळ येत होत्या. या सगळ्या माझ्या प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष गुरुच होत्या🙏. मी त्यांना कस सांगणार की, मी त्यांचा याबाबतीत म्हणजे 'गुरू म्हणून' किती आदर करते ते! त्यांना ते आवडलेही नसते! इतक्या त्या साध्या आणि सरळ होत्या आणि आहेत! मी उभा पूल पार करताना मध्ये थांबले, की रॉड पकडून माझा हात दुखून येत होता. मी माझ्या हातांवर पूर्ण जोर देऊन पाण्याच्या जास्तीत जास्त वर उभे राहत होते! (हे देखील या मैत्रिणी मला सतत सांगत असत. त्या रोज प्रत्येक वेळी, किती-किती टिप्स मला देत असतील याची खरच गणतीच नाही!) मला रॉड पकडून लगेच श्वास घेऊन, पाण्यात स्वतःला झोकून देता येत नव्हतं. माझे दंड रॉड धरून पार दुखून येत होते. पुन्हा पाण्यात जाण्यासाठी मला खूप विचार करावा लागत होता. पूर्वीतर मी सरळ पुलामधून बाहेर पडत असे, पण आता विचारातच ब्रह्मांड पालथे घालीत असे. म्हणूनच मला सर अजून श्वासाच गणित शिकवत नव्हते. आता पुन्हा पंधरा दिवसांचा खंड पडणार होता. जेव्हढ येत आहे, तेव्हढच आलं, तरी मी समाधान मानत होते. काश्मीर हून परतल्यानंतर बाकीचे पाहून घेऊ, म्हणून रोज फक्त सरावच करत होते. काश्मीर टूरमुळे फक्त पंधरा दिवसांचाच गॅप जाईल असे वाटले होते; परतू दीड-दोन वर्षापासून माझ्या पाठीत एक छोटी गाठ होती, ती आम्ही काश्मीर येथून येताच फुटली, 'ती ऑपरेट करून लगेच काढावी लागणार', म्हणून डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर बारा-चौदा दिवस आंघोळ, केस धुणे काहीच करायचे नव्हते, तर मग स्विमिंगला कसे जाणार? खूप वाईट वाटत होते. पोहणे शिकताना एव्हढा गॅप जायला नको होता हे कळत होते, माझ्या सारख्या कच्च्या विद्यार्थिनीचा तर एव्हढा गॅप नकोच होता! पण मी काहीच करू शकत नव्हते. टाके काढल्यानंतर जवळ-जवळ आठ दिवसानंतर, मी पाण्यात जाऊ शकणार होते. आता फक्त वाट पाहणे, एवढेच माझ्या हातात होते.
5 मे रोजी मी शेवटची स्विमिंग साठी गेले होते. त्यानंतर दिनांक 5 जून रोजी, म्हणजे तब्बल एक महिन्याच्या खंडानंतर मी स्विमिंग पुलामध्ये उतरले. देवाला आदल्या दिवसापासून काय, पण रोजच प्रार्थना करत होते, "बाबारे,  जेव्हढ आजपर्यंत शिकले आहे, तेव्हढ तरी येऊ दे🙏 मी जास्त काही मागत नाही"'. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्या दिवशी महेश सर यायला थोडा वेळ होता. पुलात जाताच मी प्रथम दोन-तीन फेऱ्या मारल्या, थोडक्यात पाण्यात चालले. त्यानंतर बब्लिंग केले, फ्लोटिंग केले, ते व्यवस्थित आले. दोन राऊंड फ्लोटिंगचे झाले. पुन्हा देवाचे नाव घेतले आणि किकिंग करत, हँड मुव्हमेंट करत आडवा पुल नॉन-स्टॉप पार केला, खूप आनंद वाटला. दोन महिन्यांची तपश्चर्या वाया गेली नव्हती तर ! त्यानंतर चार-पाच राऊंड नॉन स्टॉप पूर्ण केले. बऱ्याच मैत्रिणी भेटल्या. एका महिन्यात घडलेल्या घटनांची देवाण-घेवाण झाली. महेश सरही तोपर्यंत आलेत. त्यांनी मला अजून करीत आहे, तेच सुरू ठेवण्यास सांगितले.  म्हणजे मी अजूनही पुढचे 'काही' शिकण्यासाठी तयार झाले नव्हते तर! त्यांनी सगळ्या शिकाऊ मुलींना डीप वॉटर मध्ये नेले. कारण सुट्टी असल्यामुळे शिकणाऱ्यांची संख्या खूपच वाढलेली होती. मी मात्र डीप वॉटर मध्ये गेले नाही. अजून मला स्वतःचा एव्हढा आत्मविश्वास नव्हता. सरांनीही  खूप आग्रह केला नाही. माझी अजून एक मैत्रीण, सुचिता महाजन ही एके काळाची माझी जिमची मैत्रीण होती. ती दोन महिन्यांपासून स्विमिंगला येत होती, स्वतः मॅरेथॉन स्पर्धेत मालेगांव मधून स्त्रियांमध्ये प्रथम आलेली होती, पण तरीही तिला कोणताही गर्व नव्हता. तिचं माझं चांगलच सूत जुळल होत. ती माझ्या नंतर स्विमिंग शिकण्यासाठी आली आणि माझ्या खूप पुढे निघून गेली होती, पण स्वतः ला तरीही शिकावूच समजत होती. ती पुन्हा-पुन्हा, स्वतःचे पोहणे सोडून, मला श्वासाच गणित समजावून सांगत होती. मीही प्रॅक्टिस करू लागले, पण श्वासाच गणित काही केल्या जमेना! एका ठिकाणी थांबून, पूल बॉय  घेऊन, दोन्ही हातांनी रॉड पकडून, जर मला श्वास घेता येत नसेल, तर पोहता-पोहता तो कसा घेता येणार? सुचिता मला शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. पण मला एकदाही ते टेक्निक जमत नव्हत. सर, रोज उभा पूल पाच वेळा पार करायला सांगत होते, पण माझ्याकडून तो फक्त दोन वेळा पार होत होता ! तेही दोन किंवा तीन ठिकाणी थांबा घेऊन आणि सगळ्याचे माझ्याकडे लक्ष आहे हे पाहून! सुचिता मात्र आल्या-आल्या पाच वेळा उभा पूल पार करत होती. आमच्या हिशोबाने एक राऊंड म्हणजे एक टोकाकडून सुरू करून दुसऱ्या टोकाला जाणे🤪. पण प्रत्यक्षात एक राऊंड म्हणजे ज्या ठिकाणाहून सुरुवात केलेली आहे तेथेच परत येणे! आम्ही अजून शॅलो वॉटर कडून- डीप वॉटर कडे जाण्याचा विचारही केला नव्हता. माधुरी, पल्लवी, पूनम यांनी आम्हास तसे करण्यास सांगितले. सुचिताने खरच तसे केले! मी मात्र हिंमत केली नाही. बॅक फ्लोटिंग देखील सुचिता आता उत्कृष्ट करू लागली होती. ब्रिथींगही तिला बरचस जमू लागलं होत. तिला येतय ते सार मलाही यावं, म्हणून तिची तळमळ चालू होती, पण मला ब्रिथींग पण येईना आणि बॅक फ्लोटिंग पण येईना! उभ्या दोन-तीन फेऱ्या मारताच मला प्रमाणाच्या बाहेर दम लागत होता. खूपच थकून जात होते. मी एव्हढे थकत होते की, नंतर मला शॅलो वॉटर मध्ये पण पोहणे नको वाटत होते. आता मी खूपच निराश होत होते. कोचिंन सुरू करून तिसरा महिना सुरू झाला होता. माझ्या डोळ्यात माझ्या विषयीच्या निराशेने पाणी येत होते. एव्हढे दिवस पोहणे शिकून, फ्री स्टाईल पोहणे देखील, आपण अजून पूर्ण शिकत नाही, म्हणून आता मला न्यूनगंड वाटत होता. भावना, पूनम, पल्लवी, रागिणी आणि इतर सगळ्याच मैत्रिणींनी आज माझी समजूत घातली, उभारी दिली, प्रयत्न चालूच ठेवा, तुम्हाला लगेच स्विमिंग येईल, आम्हाला सहा-सहा महिने लागले, म्हणून सांगू लागल्या.  ही एव्हढी 'सायकॉलॉजी ' ह्या माझ्या मैत्रिणी कोणत्या महाविद्यालयात शिकल्या होत्या माहीत नाही, पण त्या मला माझ्या निराशेच्या गर्तेतून कायम बाहेर काढत होत्या. मला माझी कुवत आता लक्षात आली होती. वयाच पांघरूण घालून, त्यातून सुटका करून घेणे, चुकीचे वाटत होते. आपण शारीरिक बाबतीत खूपच कमकुवत आहोत, हे मला मान्यच करायला हवे होते! स्विमिंग आलेच नाही, तर कुणी मला शिक्षा देणार नव्हते, घरी तर 'हे' सारखे सांगत होते, "फक्त तुझी हौस म्हणून पाण्यात जा, तुला आनंद मिळतो आहे म्हणून पाण्यात जा, पण कोणतीही जोखीम पत्करू नको". आणि ते किती काळजी करत होते , याचा प्रत्यय मला एके दिवशी आलाच! प्रीतीचा 'बर्थ डे' होता, म्हणून सगळ्यांनी चहा पिण्याचे ठरविले. मी स्विमींगला सकाळी एका तासासाठी काय मोबाईल न्यायचा, म्हणून  तेव्हा मोबाईल सोबत नेत नव्हते. त्या दिवशी वाटले, दहा-पंधरा मिनिटे तर जास्तीचा वेळ लागणार! ह्यांच्या लक्षातही येणार नाही. खरोखरच दहा-पंधरा मिनिटेच विलंब झाला असेल, त्यामुळे मी कोणा मैत्रिणीचा फोन घेऊन, ह्यांना कळविण्याची तसदी पण घेतली नाही. माझी वेळ झाली, तरी मी घरी आले नाही, ह्यांना काळजी वाटू लागली म्हणून मला पाहायला हे स्विमिंग पुलाकडे निघाले. आमची रस्त्यातच भेट झाली म्हणून बरे! नाहीतर त्या दिवशी आमची चांगलीच फजिती झाली असती! तर एकंदरीत पोहणे शिकण्याचा एव्हढा अट्टाहास करण्याची गरज नव्हती, पण तरी शिकण्याचा मोह काही सुटत नव्हता. पोहणे शिकून मला काही कोणत्या स्पर्धेत उतरायचे नव्हते! किंवा  जिंकायचे पण नव्हते! तरीही स्विमींग यायलाच हवे होते! मला आता येत होत, ते सगळच कंटाळवाण वाटू लागलं होत. प्रॅक्टिस  करून-करून शेवटी किती करणार? त्यालाही मर्यादा आहेतच ना! निराशेत जाण्यापूर्वीच काहीतरी नवीन शिकणे, म्हणजे ब्रिथींग शिकणे आवश्यक होते. शेवटी सरांच्या मागे लागून, नऊ जून रोजी सरांनी ब्रिथींग शिकविले. ब्रिथींग ही फ्री स्टाईल स्विमिंगची शेवटची आणि महत्त्वाची पायरी होती. अजून कोचिंन सुरू ठेवायला मला काहीही हरकत नव्हती. ( नापास  झालेले विद्यार्थी नाही का पुन्हा त्याच वर्षाला प्रवेश घेत? ) म्हणूनच मी 4 जुलै पर्यंत कोचिंनची फी भरून टाकली होती. पण मी यापूर्वीच सांगितलल्या प्रमाणे, फक्त फी भरून, आणि व्हिडिओ पाहून तुम्ही पोहणे शिकू शकतच नाहीत! सर देखील एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्हाला याबाबतीत push करू शकतात. बाकी हात-पाय तर तुम्हालाच हलवायचे आहेत, साहस आणि धाडस तर  तुम्हालाच करायचे आहे! तेथे सर काय करणार? मी स्वतःच "नको सर आता प्रॅक्टिस करायला, मी खूप थकले आहे, निघते मी" अस म्हणून स्विमिंग पुलामधून लवकर बाहेर पडत होते, तेव्हा सर काय करणार?
 " निघाल्या मॅडम तुम्ही?" अस म्हणून माझा मान राखत होते, त्यांच्या दृष्टीने, मी अजून काही वेळ प्रॅक्टिस करायला हवी असायची;  मी खूप लवकर थकते आहे आणि वेळेपूर्वीच पूल सोडते आहे, हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नव्हते. तस सरांचं बारीक लक्ष सगळ्यावरच  होत, कारण मी जेव्हा एव्हढ्या गॅप नंतर पोहत होते, तेव्हा मला वाटले सरांचे लक्षच नाहीये, परंतु सर मला म्हणाले, " मॅडम गॅप नंतर तुमच्या किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंट मध्ये चांगली सुधारणा झालेली आहे!" हे ऐकून मलाही समाधान वाटले. एव्हढ्या गर्दीत प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणे खरोखरच अवघड गोष्ट आहे! मला त्याच वेळी तेलरांधे मॅडमची आठवण झाली. जिम मध्ये कितीही मुली असल्या, तरी कोणाचे कोठे चुकते आहे, याकडे मॅडमची बारीक नजर असते. या अशा व्यक्ती 'गुरुपणांचे गुण'  ' गुरूची  भूमिका ' कधीच विसरत नाहीत, त्यांची चाणाक्ष नजर आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याला चुकीचे काम करू द्यायला परवानगी देत नाही. मला अशा गुरुंचा खरोखरच अभिमान आणि कौतुक वाटते . 
आता किकिंग सारखीच मला रोज ब्रिथींगची देखील प्रॅक्टिस करायला हवी होती. ती मी करतंच होते, पण ब्रिथींग एकदाही जमत नव्हते ! या प्रॅक्टीस बरोबर, डीप वॉटर मध्ये डाय मारणे, फ्लोटिंग करणे, स्विमिंग करणे सारंच चालू ठेवणे भाग होते. ते जर मी केले नाही, तर मी ते विसरून जाईल की काय, ही भीती मला सारखी वाटत होती. स्विमिंग करतानाच काय, पण पूल बॉय घेऊन सुद्धा एकदाही अचूक श्वास मी आतापर्यंत घेतला नव्हता. श्वास घेताना रॉड सोडलाच नव्हता. एका हाताने रॉड घरून पण मला श्वास घेणे जमेना!  आता सरावाने येईल तेव्हा येईल, अस म्हणून, फक्त सराव चालू ठेवला होता.
वर सांगितल्याप्रमाणे, मी  आतापर्यंत फक्त डीप वॉटर मध्ये डाय मारून, शॅलो वॉटर कडे येत होते. त्यामुळे डीप वॉटरचा बरचसा भाग, डाय मारण्यामध्ये  आणि पहिल्याच दमात पार होत होता. परंतु दिनांक 13 तारखेला भावना मॅडम माझ्या खूपच मागे लागल्या. शॅलो वॉटर कडून डीप वॉटर कडे जाण्यासाठी! माझी अस करण्यासाठी तर  ' पाचावर धारणच'  बसली! पण भावना मॅडम काय ऐकतात का? त्यांनी अक्षरशः माझ्या हाताला धरून, मला पाण्यात जवळ-जवळ  ढकललेच म्हणा ना! आणि त्यानी स्वतः वॉटर ट्रेडिंग करत-करत माझ्याबरोबर येऊन, मला पूर्ण पूल पार करायला लावला! एका बाजूला रॉड आणि एका बाजूला भावना मॅडम! एकदाचा विरुद्ध बाजूच्या (शॅलो कडून डीपकडे) पाण्याचा, विरुद्ध हाताने पूल तर पार केला! याच्या मागे कर्त्या करविता अर्थातच भावना मॅडम होत्या, यात शंकाच नाही! त्यांनी मला एव्हढा आग्रह केला नसता, तर मी अस कधी केलं असत कुणास ठाऊक? पण मी बघितले, की स्विमिंग पूल मधील माझ्या या सर्वच मैत्रिणींना, सगळ्याना आपल्या बरोबर, दुसऱ्यालाही पोहणे शिकविण्याची, प्रचंड इच्छा आहे, आवड आहे. मलाच काय पण कुणालाही कोणती गोष्ट येत नसेल, तर त्या ताबडतोब उत्साहाने शिकवतात, प्रात्यक्षिक करून दाखवितात. समोरच्याची हिंमत होत नसेल तर कधी गोड बोलून, तर कधी अधिकार वाणीने, जबरदस्ती करून हिंमत देतात; परंतु ती गोष्ट करायलाच लावतात. आणि तिला शिकवून पारंगत करतात. जणू काही पोहणे शिकल्यानंतर सगळ्यांनीच हा 'वसा' घेतलेला आहे. आणि हा वसा त्या एखाद्या कहाणीप्रमाणें, कधी टाकत नाहीत. या सगळ्यांच 'जलपऱ्यांच' कितीही कौतुक  केले तरी कमीच होईल! कोण म्हणत, " स्त्रिया एकमेकींचा द्वेष करतात म्हणून?" माझ्या या सर्व मैत्रिणी तर एकमेकीसाठी अक्षरशः जीव टाकतात! मैत्रिणीलाच काय, पण पूल मधील प्रत्येक स्त्रीला सहकार्य करायच!  'सहकार्य करणे', हे जणू त्या सगळ्यांच ब्रीदच आहे ! 
माझी श्वासाची प्रॅक्टिस चालूच होती, माझ्या दृष्टीने त्यात प्रगती काहीच नव्हती. पण तरीही रोज भरपूर वेळ श्वासाच्या सरावामध्येच जात होता. सर उभ्या पुलाला पाच फेऱ्या मारायला सांगत होते, पण मी तीन फेऱ्याच कशा-बशा मारत होते. डाय मारताना माझे किती इयर प्लग हरविले त्याची गणतीच नाही. इयर प्लग वापरूच नये अस वाटत होतं, पण एक दोघींचे कानाच्या बाबतीतचे वाईट अनुभव ऐकून घाबरायला होई. तरीही कदम काकांना हरविलेल्या इयर प्लगचा रंग सांगितला, की ते तो इयर प्लग बरोबर आणून देत. हरवलेले इअर प्लग आठवणीने सांभाळून ठेवत! फक्त एअर प्लगच नाही, तर कोणाचा मोबाईल, कोणाचा स्कार्फ, तर कोणाची पाण्याची बाटली! सगळ्याच वस्तू! 
लागोपाठ दोन दिवस झाले माझे इयर प्लग हरवत आहेत, आता कदम काकांना सांगायलाही मला लाज वाटत होती. पण तरीही कदम काकांनी ते व्यवस्थित सांभाळून मला दिलेत. धन्यवाद काका🙏. 
आज तर डीप वॉटर मध्ये डाय मारताना इयर प्लग तर गेलाच, पण गॉगल आणि कॅप देखील वर सरकून गेली. सीतेचे रावणाने अपहरण केले, तेव्हा, तिने आपल्या अंगावरचे एक -एक अलंकार रस्त्यात टाकले! मी स्विमिंगचे हे अलंकार टाकून कोणाला माझा रस्ता सांगत होते कुणास ठाऊक?
माझ्या तीन फेऱ्या म्हणजे खरोखर त्या दीडच फेऱ्या होत होत्या. शॅलो वॉटर मध्ये , उभ्या पुलात बाकी सकाळी पावणे-सहा वाजेपासून  बऱ्याच फेऱ्या मारत होते. ब्रिथींगची प्रॅक्टिस देखील चालूच होती, पण ती गोष्ट मला काही केल्या जमत नव्हती. शेवटी आज महेश सरांना बॅक फ्लोटिंग शिकविण्यासाठी विनंती केली. त्यांनी पूल बॉय आणि फ्लोटर घेऊन ते करण्यास सांगितले. पण दोन्ही घेतले तरी मी रॉड सोडतच नव्हते. शेवटी पूनम आणि पल्लवी आल्या. त्यांनी पूल बॉय काढून टाकण्यास सांगितले आणि फ्लोटिंग पॅड पाठीला शर्ट मध्ये अडकवून दिले. "आम्ही तुम्हाला पकडलेले आहे, फ्लोट करा" म्हणून विनंती वजा हुकूम केला. मी तळाशी असणारे माझे पाय सोडण्यास तयार होईचना!  शेवटी त्यांनी माझ्या भावनेलाच हात घातला, "आमच्यावर विश्वास आहे ना?" म्हणून जवळ-जवळ खडसावलेच! मैत्रिणींवर नाही तर कोणावर मी एवढा गाढ विश्वास ठेवणार? त्या दोघींच्या हातावर मी माझी पूर्ण बॉडी झोकून दिली! खरोखरच तारा किंवा मारा! बुडवा नाहीतर तरंगवा! आणि काय आश्चर्य ? मी खरच फ्लोट होऊ लागले होते. शॅलो वॉटर कडून डीप वॉटर कडे जात होते. मला कोणीतरी मुद्दाम घाबरवित होते, चालल्या चालल्या डीप वॉटर मध्ये! पण पूनम आणि पल्लवी मला दिसत असल्यामुळे आणि त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे, मी बिनधास्त होते.  या माझ्या सर्व मैत्रिणी स्वतः चा जीव धोक्यात घालून, आपल्या मैत्रिणीला वाचवू शकतात, याचा अनुभव मला पुढे आलाच. आणि म्हणूनच मला कोणतीही भीती वाटली नाही. खूप खूप धन्यवाद पूनम आणि पल्लवी 🙏🙏🙏. पाण्यात मात्र मला त्या दिवशी उभेच राहता आले नाही. पूनमने मला पाण्यात बॅक फ्लोटिंग करतांना कसे उभे राहायचे, याचे प्रात्यक्षिक, खूप वेळा करून दाखविले. तरीही शेवटी मी त्या दोघींच्या मदतीनेच उभे राहिले. महेश सर आमची ही सारी गंमत दुरून बघत होते, हसत होते!  गुरूला सगळ्यात जास्त समाधानाचा आणि आनंदाचा क्षण कोणता असेल, तर तो म्हणजे आपला शिष्य, आपण दिलेले शिक्षणाचे दान दुसऱ्याला देत असताना पाहणे! महेश सरांना आज तो आनंद पूनम आणि पल्लवी कडून मिळत होता. ते कौतुकाने सारे पाहात होते. मी सुद्धा पोहणे शिकले, की असेच हे दान पुढच्या विद्यार्थ्यांना अवश्य देईन, आणि ही परंपरा अशीच चालू ठेवेन👍. त्यानंतर मी सुचिताला घेऊन बॅक फ्लोटचा पुन्हा प्रयत्न करून पाहिला. आता रोजच्या सरावात बॅक फ्लोटची पण भर पडली! पण मैत्रिणींच्या सहकार्याशिवाय ते शक्य होणारच नव्हते. 
डीप वॉटर मध्ये मी आता डाय पण छान मारते, अस मला महेश सर म्हणाले. खूप समाधान वाटले. काही ना काही तरी मला येत होत! उभा पूल तीन वेळा आता पार करत होते, पण कमीत कमी दोन-तीन ठिकाणी तरी थांबा घेत होते. सर, एकाच थांब्यांत जाण्यासाठी आग्रह करीत होते. पण ते कधी शक्य होणार? लक्ष्य एक थांब्याचे ठेवायला काहीच हरकत नव्हती! पण माझ्यासाठी ते लक्ष्य फार लांबचे होते! 
आजपर्यंत मी माझा स्विमिंगचा व्हिडिओ कधी काढलेला नव्हता. तस पाह्यलं तर शहा मॅडम मला व्हिडीओ काढण्यासाठी खूप दिवसांपासून सांगत होत्या. त्या मॅडम 40 वर्षांपासून स्विमिंग करतात. आता त्या 70 वर्षाच्या आहेत, तरीही त्यांचं नित्यनेमाने स्विमिंग चालूच आहे. पोहण्याचा प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्या दीड-दोन महिन्यांपूर्वीच परदेशात गेल्यात ( तेथेही त्यांचे स्विमिंग चालूच आहे) तत्पूर्वी त्या नेहमी मला काही ना काही सूचना देत असत🙏.  त्यांचे ते बहुमुल्य मार्गदर्शन मला आता मिळत नव्हते. त्या नेहमी मला म्हणायच्या " मंदा, तुझा पोहण्याचा व्हिडिओ एकदा कोणाकडून तरी काढून घे आणि तू कोठे चुकते आहे ते पाहा"  पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे व्हिडिओ काढायला कोणाला सांगायचे,  म्हणून मी टाळाटाळ करत होते. दिनांक 19 तारखेला स्विमिंगची अजून एक मैत्रीण माई पाटील ह्यांच्या हाताला facture झाले होते, तरी त्या गप्पा मारण्यासाठी आणि मैत्रिणींना भेटण्यासाठी स्विमिंगला आल्या होत्या, त्यांना विनंती केली आणि माझा पोहण्याचा व्हिडीओ त्यांनी काढला! धन्यवाद माई🙏! हाताला facture झालेले  असताना देखील तुम्ही माझा व्हिडीओ काढलात! खूप खूप धन्यवाद 🙏 त्या व्हिडीओ मुळेच मी कोठे कमी आहे, हे मला समजले!
बापरे!!! किती चुका करत होते मी? हाताचा पंजा वरती पाण्याबाहेर येत होता, हात मारताना प्रचंड घाई करत होते, किकिंग मध्ये तर काहीच जोर नव्हता! एक पाय कोठे, तर  एक पाय कोठे जात होता! शहा मॅडमने सांगीतले, तेव्हाच जर व्हिडीओ काढला असता, तर आतापर्यंत काहीना काही सुधारणा झाली असती!  अजून वेळ गेलेली नव्हती, पुन्हा सुधारणा करू👍. उशिरा का होईना पण 'शहा मॅडमच्या 'अनुभवाच्या बोलांचे मोल,'  मात्र मला नक्कीच कळाले होते! ' धन्यवाद शहा मॅडम 🙏
आता होत असलेल्या चुका सुधारणे, किकिंग, handmovement, ब्रिथींग, बॅक फ्लोटिंग, डीप वॉटर मध्ये डाय मारणे, साऱ्यांचीच प्रॅक्टिस करणे भाग होते.
मी हळू हळू का होईना, पण उभ्या पुलाला 'आमच्या व्याख्येतील तीन फेऱ्या  ' सहज नसले तरी दमादमाने, प्रत्येक फेरीत दोन-तीन ठिकाणी थांबा घेऊन, करत होते. सकाळी आडव्या पुलाला कमीत कमी पाच सहा फेऱ्या मारत होते. आता कोणाचीही मदत न घेता फ्लोटिंग पॅड घेऊन, शॅलो वॉटर मध्ये मी बॅकफ्लोट देखील करू लागले होते. बॅक फ्लोटिंगसाठी मी प्रथम थांबायचे किंवा उभे कसे राहायचे ते शिकले. कारण फ्लोटिंग करताना, हव्या त्या क्षणाला थांबता आले नाही तर आपला अभिमन्यू व्हायचा! पोहणे तर  येईल, पण थांबताच येणार नाही. 'गाडी तर चालवता येते, पण हव्या त्या ठिकाणी ब्रेक लावता येत नाही!' असे शिकणे काय कामाचे? पोहताना अकस्मात एखाद्या शिकाऊ विद्यार्थिनीची कधी टक्कर झाली, तर त्या क्षणाला पाण्यात पोहता यायला हवे, म्हणून मी प्रथम बॅक फ्लोटिग करताना, कोणाचीही मदत न घेता पाण्यात कुशीवर येऊन, पुन्हा फ्री स्टाईल स्वामींग करणे किंवा शॅलो वॉटर मध्ये उभे राहणे हे शिकले! आणि ते मला आता व्यवस्थित येऊ लागले होते. त्यामुळे बॅक फ्लोटिंग करताना एव्हढी भीती वाटत नव्हती. फ्लोटिंग करताना श्वास घेण्याचा प्रश्नच नव्हता, तरीही थोडेफार पाणी, नाका तोंडांत जात होतेच! बॅक फ्लोटिंग मध्ये आता माझे पूल बॉय पण सुटले होते. फ्लोटिंग पॅड मात्र मी घेतच होते. एकंदरीत मी बॅक फ्लोटिंग लवकर शिकेन असे वाटत होते. पोहण्याच्या प्रांतात कोणताही नवीन प्रकार पाहताना , शिकतांना, मला नेहमीच तो लवकर येईल, असे वाटत होते, पण प्रत्यक्षात जेव्हा मी तो प्रकार करायला जात होते, तेव्हा माझी खरोखर पंचाईत होत होती! आणि माझा तो भ्रम खोटा ठरत होता! सगळे मनाचे मांडे मनातच राहून जात होते! 
दिनांक 23 जून रोजी बॅक फ्लोटिंगचे किकिंग'  सर शिकविणार होते, परतू त्यांनी प्रथम उभ्या पुलाला पाच फेऱ्या केल्याशिवाय, पुढचे काहीच शिकविणार नाही, असे सांगितले. मी प्रथम माझ्या नेहमीच्या तीन फेऱ्या मारलेल्या होत्या आणि नवीन काही शिकण्यासाठी, मी माझी ऊर्जा राखून ठेवलेली होती, पण सरानी खूपच आग्रह केला. त्यामुळे अजून दोन फेऱ्या मी पूर्ण केल्या. आता मला बिलकूल ताकद उरली नव्हती. सर डीप वॉटर मध्ये doggy paddling करायला सांगत होते, पण मी काहीच करू शकले नाही. डीप वॉटर मध्ये मी रॉड सोडूच शकले नाही.  माझी अजूनही डीप वॉटरची भीती बिलकुल कमी झालेली नव्हती. सुचिताने मात्र डीप वॉटर मध्ये मस्त पैकी doggy paddling केले. मी मात्र सात वाजले म्हणून पाण्याच्या बाहेर पळ काढला! भूतकाळातील सतरा वर्षांच्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात शाळेतून, कॉलेज मधून कधीच पळ न काढणारी,  मी आता पोहण्याच्या क्लास मधून पळ काढत होते! एखाद्या उनाड विद्यार्थ्यांसारखा! जे कधीच माझ्या स्वभावाला साजेस नव्हत! वयाला तर बिलकुल नाही! 
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीची प्रॅक्टिस झाली आणि मी doggy paddling च्या मागे लागले. खूप ऊर्जा जात होती, पण तरीही  doggy paddling जमत नव्हते. त्याचे व्हिडिओ पाहून-पाहून मी तसेच करण्याचा प्रयत्न करत होते. कळत होते पण वळत नव्हते! बॅक फ्लोटिंग मात्र फ्लोटिंग पॅड घेऊन करत होते. ते येतही होत. परतू रागिणी मॅडमने "मी तुमच्या सोबत आहे, सोडून द्या ते फ्लोटिंग पॅड" म्हणून सांगितले. आणि खरोखरच त्या बराच वेळ माझ्यासोबत राहिल्या आणि मला त्यांनी फ्लोटिंग पॅड शिवाय बॅक फ्लोटिंग करायल लावले! या अशा सर्व मैत्रिणींच्या खांद्यावर माझा भार टाकून मी पोहणे शिकत होते. त्या मैत्रिणींना त्या भाराची जाणीवही नव्हती किंवा माझा भार त्या आनंदाने उचलत होत्या! किंवा त्यांच्या रक्तातच तो गुण एव्हढा भिनलेला होता, की आपण असा भार  उचलत आहोत, हे त्यांच्या गावीही नव्हत! 
मी आता 'उभ्या पुलाला रोज जसे येईल तसे, कितीही वेळ थांबावे लागले तरी, पाच फेऱ्या पूर्ण करायच्याच' असा संकल्प केला होता. कारण असे करण्यासाठी जर सर एव्हढा आग्रह करीत आहेत, तर त्याचा निश्चित फायदा असेलच!  म्हणून तर सर एव्हढा आग्रह करीत होते ना! उर्वरित पोहणे नंतर पाहून घेऊ!  पण प्रथम पाच फेऱ्या पूर्ण करायच्याच अस मी ठरवूनच टाकले👍
माझी पुन्हा आता पाच दिवसांची सुट्टी पडणार होती. दिनांक 26 ते 30 जुलै, मी पुणे येथे जाणार होते. पाच दिवसांची सुट्टी असेल, आणि कोचिन असेल तर आपले तेव्हढे दिवस पुढे ढकलले जातात.  त्यामुळे माझे कोचिन आता 10 जुलै पर्यंत सुरू राहणार होते.
आज ठरविल्याप्रमाणे मी उभ्या पुलाला फेऱ्या मारायला सुरुवात केली. दोन फेऱ्या पूर्ण झाल्या. वैशाली आणि इतर मैत्रिणी शॅलो वॉटर मध्ये गप्पा मारत होत्या. मी शिडी चढून डाय मारण्यासाठी डीप वॉटर कडे जात होते. त्या म्हणाल्या, नाही इकडूनच जायचं! आम्ही आहोत! शेवटी मी हिंमत केली आणि दिनांक 25 तारखेला पण शॅलो वॉटर कडून डीप वॉटर कडे दोन फेऱ्या आणि डीप वॉटर कडून शॅलो वॉटर कडे चार  फेऱ्या मारल्या. आडव्या फेऱ्या मात्र त्यामुळे आज कमी झाल्या. सराना मी बॅक फ्लोटिंगचे किकिंग शिकविण्याचा आग्रह केला, पण "प्रथम फ्लोटिंग पॅड सोडून मला तुम्ही फ्लोट करून दाखवा", म्हणून त्यांनी मला सांगितले, आणि माझे बॅक फ्लोटिंगचे किकिंग शिकणे पुन्हा लांबणीवर पडले. कारण अजूनही फ्लोटिंग पॅड सोडून मी व्यवस्थित बॅक फ्लोटिंग करू शकत नव्हते. माझे पाय पोहण्यास सुरुवात करताच बुडत होते! Breathing आणि Doggy paddling चा सकाळी पुलामध्ये गेल्या-गेल्या मी बराच प्रयत्न करत होते, पण ते ही काही जमत नव्हतं! मला प्रोत्साहन द्यायला आणि मार्गदर्शन करण्यासाठी सुचिता आज दिसत नव्हती. नंतर कळाले की, डाय मारताना तिच्या पायाला लागले, मन अस्वस्थ झाले. आताशा ती खूप छान स्विमिंग करू लागली होती, डाय मारु लागली होती, बरचस पोहण तिला छान येत होतं.  तिला येत आहे, ते सर्व मला शिकविण्यासाठी ती नेहमीच तत्पर राहत होती आणि आता हे काय झाल? घरी जाऊन केव्हा तिला फोन करते असे मला होवून गेले होते. घरी जाताच तिला फोन केला, तिला बऱ्यापैकी लागलं होत, परंतु रिकव्हरी देखील चांगली होत आहे, अस तिने सांगितले आणि माझा जीव भांड्यात पडला!  ती पाच सहा दिवसांनी स्विमिंग साठी येणार होती. आम्ही आता चार-पाच दिवसांनी बरोबरच  स्विमिंगला जावू असे ठरविले. मला देखील केव्हा तरी हाताच्या बोटाला लागले होते, केव्हा  लागले ते कळाले सुद्धा नाही, पण नंतर त्याचा खूप त्रास होत होता. स्विमिंग करताना केव्हा कोठे लागून जाईल हे सांगताच येत नाही. स्विमिंग करतेवेळी ते लक्षातही येत नाही. पुलाच्या बाहेर पडल्यावर आपल्याला लागलं आहे, हे लक्षात येत! अर्थात जखम किंवा मार थोड्या प्रमाणावर असेल तर! पण तरीही माझे सगळ्यांनाच सांगणे आहे की, वेळ लागला तरी चालेल, पण कोणतीही घाई करू नका. स्विमिंग जेव्हढे शांततेने होते, तेव्हढी आपल्याला ऊर्जा कमी खर्च करावी लागते. खरं म्हणजे हे मी, मलाच प्रथम सांगायला आणि शिकवायला हवे आहे! कारण सगळ्या जगाची घाई तर मलाच होते. केव्हा एकदा इच्छित स्थळी आपण पोहोचतो, आपली फेरी पूर्ण होते, शॅलो वॉटर कडे आपण पोहोचतो, रॉड आपल्या हातात येतो, असे मला होऊन जाते. लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण!
दिनांक 1 जुलै रोजी सकाळी पावणेसहा वाजताच मी पूलामध्ये उतरले. पाऊस येऊन गेल्यामुळे पूलामध्ये खूपच पंखांचे किडे होते, कदमकाका जाळी घेऊन किडे काढत होते. हळूहळू एक-एक  ' जलपरी ' येऊन पाण्यात उतरत होती. काही पारंगत ' जलपऱ्या ' आल्या-आल्या डीप वॉटर कडून डाय मारत होत्या. मी शॅलो वॉटर मध्ये, जेथील पाणी साफ झालेले आहे आणि जेथे किडे नाहीत, तेथे ब्रिथींग आणि बॅक फ्लोटिंगची प्रॅक्टिस करत होते. माझे बॅक फ्लोटिंग चालू होते, मी वर पाहत होते आणि तेव्हढ्यात मला काहीतरी गडबड ऐकू आली. सरळ होऊन मी पाहते तर, कदम काकांनी पाण्यात उडी मारलेली होती आणि ते अर्चना मॅडमला पाण्यातून काठाकडे आणत होते. नंतर कळाले, की त्या मॅडम डीप वॉटर कडून शॅलो वॉटर कडे येत होत्या, त्यांना किडा दिसला आणि तो तोंडात जाईल की काय, म्हणून त्यांना भीती वाटली आणि त्यांनी दम सोडून दिला, नंतर त्या पॅनिक झाल्या आणि त्यांना सरळ होताच आले नाही. त्यांच्या बरोबर स्विमिंग करणाऱ्या पल्लवी आणि पूनम त्यांना काठावर आणण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तोपर्यंत तेथे जाळीमध्ये किडे काढणाऱ्या कदम काकांनी पाण्यात उडी घेतली आणि अर्चना मॅडमला सुखरूप शॅलो वॉटर मध्ये आणले. धन्यवाद कदम काका🙏. मला कदम काकांची उडी पाहायला मिळाली नाही, पण किती तत्परतेने त्यांनी उडी घेतली असेल? अर्चना मॅडम काठावर आल्या. मला वाटलं त्या खूप घाबरलेल्या असतील, त्यांना दम लागला असेल, परंतु त्या बिलकुल घाबरलेल्या नव्हत्या, सगळ्यांना काय झालं आणि कसं झालं, हे त्या मस्तपैकी सांगत होत्या. मला त्यांचे खरच कौतुक वाटले! जणूकाही, काही घडलेच नाही, अस म्हणून त्या पुन्हा डीप वॉटर कडे गेल्या! एखादी स्री निदान त्या दिवशी तरी डीप वॉटर मध्ये गेली नसती. पण त्यांनी पुन्हा आपले पोहणे सुरू केले. शाब्बास शेरनी! 
मी देखील सुचिता आल्यानंतर पुलाला पाच फेऱ्या पूर्ण केल्या. सुचिताची किंवा इतर कोणाची सोबत असल्याशिवाय किंवा डीप वॉटर कडे कोणी असल्याशिवाय, मी तिकडे जातच नसे! डीप वॉटर म्हणजे माझ्यासाठी आपण लहान मुलांना सांगतो ना , ' तिकडे बागुलबुवा आहे, भोकाडी आहे! कोणी मोठे माणूस सोबत असल्याशिवाय तिकडे जायचे नाही" अस झालं होत! मी पावणेसहाला, म्हणजे पुष्कळ वेळा, सगळ्यात पहिलेच पुलामध्ये उतरत होते, पण या सगळ्या पोहण्यात पारंगत असणाऱ्या मैत्रिणी, सर किंवा सुचिता आल्याशिवाय माझ्या पाच फेऱ्याना सुरुवात करतच नसे! तोपर्यंत शॅलो वॉटर मध्येच जी काही प्रॅक्टिस करायची, ती मी करत होते. 
आता मी पाच फेऱ्यांमधील कमीत कमी एक तरी फेरी विरुद्ध बाजूने पूर्ण करत होते.  आज सरानी वॉटर ट्रेडिंग करण्यासाठी पुन्हा डीप वॉटर कडे बोलावले. खूप प्रयत्न करूनही मला हवे तसे, वॉटर ट्रेडिंग काही जमले नाही. सुचिता मात्र ते उत्कृष्ट करत होती आणि मलाही शिकवत होती. डीप वॉटर मध्ये रॉड सोडायची मला एव्हढी भीती वाटत होती की, सुचिता आणि महेश सरही, मला सांगून सांगून कंटाळले असतील. माणूस कितीही म्हणत असला की, " मी मरणाला भीत नाही! " पण तो किती भीत असतो ना?  मी ही अशीच रॉड सोडायला भीत होते. रॉड सोडताच मी पाण्यात बुडून जाणार होते असे नाही आणि समजा मी बुडाले असते, तरी समोर सर होते, सुचिता होती, पण तरीही ...मला खूप भीती वाटत होती एव्हढे निश्चित! कसे शिकणार मी पोहणे?
बॅक फ्लोटिंगचे पण तसेच होत होते. मी बराच वेळ रॉड जवळच गुटमळत होते. कारण एकदा का  वरती चेहरा झाला की, दिशा कळत नव्हती, त्यामुळे मी डीप वॉटर कडे तर जाणार नाही ना! मनात सारखी ही भीती वाटत होती. तस पाह्यलं तर माझी बॅक फ्लोटिंगची ती कासवाची गती! मी कधी पोहोचले असते डीप वॉटर कडे? ते अजून तरी शक्यच नव्हते! पण एकदा का तुमच्या मनात भीतीने घर केले की, तिला बाहेर काढणे फार कठीण! बॅक फ्लोटिंग करतांना सारखे -सारखे मी उभे राहत होते, म्हणजे अजून मला फक्त फ्लोटिंगच व्यवस्थित येत नव्हते, आणि मी सरांना किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंट शिकविण्यासाठी आग्रह करीत होते. सुचिता मात्र आता बॅक फ्लोटिंग एखाद्या सराईतासारखी छान करत होती. पण मी पूर्वीच सांगितल्या प्रमाणे स्विमिंगच्या बाबतीत तुम्ही कोणाचा हेवा करूच शकत नाही, तो हेवा कितीही चांगल्या गोष्टीचा असला तरी! प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते, प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते! 
मला बॅक फ्लोटिंगची न कंटाळता अजून प्रॅक्टिस करणे भागच होते. 
प्रॅक्टिसच्या बाबतीत आपल्याला वाटते, ही काय 'ढोर मेहनत' चालू आहे आपली? काही प्रगती पण होत नाही आणि आपण नवीन काही शिकत पण नाहीत! परंतु आपल्याला नंतर कळते, की स्विमिंगच्या भाषेत आपण ज्याला आपली 'मसल मेमरी ' म्हणतो ती तयार होते. किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंट च्या बाबतीत माझे असेच झाले होते. मला वाटले हे काय चालू आहे? रोज सकाळी आले की तेच आणि तेच! पण ते तसं नसत, म्हणूनच मला अजून ब्रिथींग येत नव्हते, तरी मी रोज त्याची प्रॅक्टिस करायचे सोडत नव्हते. कधी ना कधी एक दिवस ते जमेलच, यावर माझा दृढ विश्वास होता. तसंच बॅक फ्लोटिंगचे देखील! थोड उशिरा का होईना पण येईलच ना! आपण एव्हढे प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत, तर येईलच👍 येईल नाही तर कोठे जाईल? आता मला अनुभवाने कळून चुकले होते, की प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करत राहायची, आपल्या लक्षात आली नाही तरी हळू-हळू सुधारणा होत जाते, आणि एक दिवस 'तो दिवस उजाडतो' , की आपण हवे तेथे पोहोचलेले असतो, आपलं इच्छीत साध्य झालेले असते! अनुभवी मैत्रिणी आणि सर देखील " प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा', हेच नेहमी सांगत असतात. आपल्याला वाटत किती वेळ वाया जातोय आपला? किती ऊर्जा वाया जाते आहे आपली? आणि आउटपुट तर काहीच नाही! पण अस होत नाही. शाळेत असताना नाही का आपले गुरू, पालक आपल्याला रोज-रोज शुद्धलेखन लिहायला सांगायचे?  त्यातलाच हा प्रकार होता. या अशाच प्रॅक्टिसमुळेच मी आता किकिंग आणि हॅण्ड मुव्हमेंट किती सहजतेने करत होते. आता मला ते करण्यासाठी काहीच विचार करावा लागत नसे! हे सर्व त्या प्रॅक्टिसचेच परिणाम आहेत, हे आता मला कळत आहे! 
या आठवड्यात पाऊस सुरू झालेला होता, पाणी बऱ्यापैकी थंडगार होते. पण फक्त प्रथम शिडी उतरताना आणि पूर्ण पाण्यात चेहरा जाईपर्यंत ते जाणवत होत. नंतर पाणी थंड आहे, हे सुद्धा आम्ही विसरून जात होतो! आता उभ्या पुलाला माझ्या पाच फेऱ्या पूर्ण होत होत्या, कधी कधी तर सहा फेऱ्या होत होत्या. त्यातील कमीत कमी दोन फेऱ्या विरुद्ध बाजूने होत असत, अर्थात विरुद्ध बाजूने जाताना खूप वेळा रॉड धरून थांबा घ्यावा लागत होता.  माझ्यासाठी एव्हढे करणे, देखील खूुप कष्टाचे काम होते. गेल्या गेल्या मी ज्या आडव्या पुलाच्या फेऱ्या मारत होते, त्यांची संख्या आता घटली होती! कारण पाण्यात चालणे, बाब्लिंग करणे, फ्लोट करणे, ब्रिथींगची, बॅक फ्लोटिंगची आणि doggy paddling ची प्रॅक्टिस करणे यात बराचसा वेळ जात होता. पावणे सात केव्हा वाजत होते, ते कळत देखील नव्हते. बॅक फ्लोटिंग मला वाटले होते, की मी लवकर शिकेन म्हणून! पण कसले काय? पोहण्याच्या क्षेत्रात मी ' ढ ' मधील ' ढ ' विद्यार्थिनी होते.
आज माझा कोचिन क्लास संपला होता, पण मला ना फ्री स्टाईल स्वामींग ब्रिथींग सहित जमले होते, ना बॅक फ्लोटिंग, ना doggy paddling आणि वॉटर ट्रेडिंग! एव्हढे sincerely मी क्लासला जात होते, पण कोठे तरी कमी पडत होते. जोपर्यंत मी पाण्यात रिलॅक्स होत नाही, तोपर्यंत काहीच उपयोग नव्हता. आज रागिणी मॅडम आणि वैशालीने मला बराच वेळ बॅक फ्लोटिंग साठी मदत केली. टिप्स दिल्या, पण माझे legs sink होतच होते. पूल बॉय किंवा फ्लोटिंग पॅड घेऊनच बॅक फ्लोटिंग व्यवस्थित 🤪 येत होत! त्याला व्यवस्थित म्हणणे म्हणजे खूपच विनोद होता! पण  करणार काय? पोहणे येतच नव्हत, त्यापेक्षा ही साधन वापरून येतंय, त्यालाच व्यवस्थित म्हणायचं दुसर काय? 
चवथ्या महिन्यात पण कोचिन लावणे, म्हणजे दहा वर्षाच्या मुलाला तीन वर्षे बालवाडीत शिकवून पुन्हा बालवाडीतच प्रवेश घेण्यासारखे होते! म्हणून मी ते टाळले. आता उद्यापासून नॉर्मल स्विमिंग साठीच जायचे, असे मी ठरवून टाकले👍.

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)