गुरुपौर्णिमा

आई वडील मोठी भावंडे आणि शाळेत गेल्यानंतर अभिमानाने आणि सर्व मान्य असे शिक्षक आपले गुरू असतातच. त्याचे अगणित उपकार आपल्यावर असतात. त्यांनी आपल्याला एव्हढे शिकविलेले असते, एव्हढे दिलेले असते की, संपूर्ण जीवनभर त्यांच्या शिकविण्याचा, चालण्या बोलण्याचा ठसा आपल्यावर उमटलेला असतो. परंतु, आपल्या आयुष्यात अशाही अनेक व्यक्ती येतात की, त्या आपल्याला काही ना काही, कळत न कळत शिकवून जातात. कधी ते बस च्या तास दोन तासाच्या प्रवासात भेटलेले प्रवासी असतात, तर कधी अक्षरशः दोन तीन वर्षाचे मूल असते. ज्याला बोलताही येत नाही, पण आपल्या वागण्यातून ते एखादा सुविचार आपल्याला देऊन जातो. हे सगळे आपले गुरूच असतात!
घरी येणारी एखादी व्यक्ती, जिला आपण फक्त चहा दिलेला असतो, ती "चहा किती छान झालाय" म्हणते आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीच कौतुक करायला शिकवून जाते. या एका वाक्यातून आपल्या कितीतरी गोष्टींची शिकवण मिळून जाते! आणि मग आपण जे जे चांगलं असत त्याच कौतुक करू लागतो! ही सकारात्मक ऊर्जा आपण जेथे जेथे जातो, तेथे तेथे पेरायला लागतो. हिचा उगम बाकी त्या एका व्यक्तीकडून झालेला असतो! ती व्यक्तीही त्यासाठी आपली आयुष्यभरासाठी गुरू असते. असे अनेक गुरू आपल्याला भेटतात आणि अनुभवातून आपल्याला शिकवून जातात. फक्त आपल्याला त्यांचे हे सद्गुण ओळखून ते आत्मसात करता आले पाहिजे! ते आपण आत्मसात केले की, आपले व्यक्तिमत्व समृध्द बनते किंवा त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. 
माझ्या आयुष्यात आलेल्या अशा असंख्य गुरूंना मी नम्रपणे त्रिवार वंदन करते🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

जगन्नाथपुरी

हे (पोहणे) इतके अवघड असते ! भाग १

श्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीचा विळखा: एक आत्मचिंतन"​(अशोक खरात व त्या सारख्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर)