महेश्वर टूर
एम एस जी कॉलेजची, बी कॉम -1983 ची बॅच म्हणजे भन्नाटच! त्यात वाडेकर साहेबांचे रोज भेटणारे मित्र म्हणजे सगळे उत्साह मूर्ती! ते सर्व रोज भेटतात आणि नेहमीच महिन्या दोन महिन्यात वेगवेगळ्या ट्रिप करत असतात, गेट टुगेदर करत असतात, मजा करत असतात. परंतु आम्ही त्यांच्या सहधर्मचारिणी कधीच त्यांच्या बरोबर ट्रिपला गेलो नव्हतो. आता आम्ही सर्वजणी सेवानिवृत्त झालो होतो आणि ठरवू लागलो होतो की, आपणही ह्यांच्यासारखेच कोठे तरी फिरायला जाऊ या! तरीही आमचे जाणे काही न काही कारणाने शक्य होत नव्हते आणि फक्त आम्ही स्त्रियांनीच कोठे जायचे, म्हणून हिंमतही होत नव्हती. काही कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेहमीप्रमाणे सोबत होत्याच. बाई कधी रिटायर्ड होते का? कधीच नाही. त्यात संध्या आणि उज्ज्वलाचे गुढगे दुखत होते. त्यांना खूप चालणे, चढणे शक्य होणार नव्हते. भारतीच्या तीन महिन्यांपूर्वीच दोन स्टेन टाकल्या गेल्या होत्या. कल्पना आणि मी देखील खूपच strong होतो अस नव्हत. म्हणूनच आम्हाला आमच्यासाठी सोयीस्कर असा स्पॉट निवडणे भाग होते!
शेवटी या पाच पांडवांच्या मदतीनेच, त्यांना आग्रह करून आम्ही ट्रीपला जायचे ठरविले. आम्ही स्वतःला कितीही सबला म्हणत असलो, तरी किती अबला आहोत याची पुन्हा एकदा खात्री पटली, आणि आम्ही ती गोष्ट लगेच मान्यही करून टाकली! ते मान्य केले म्हणून तर ट्रिपला जायला मिळाले ना! आमच्या पाच जणींमध्ये जेव्हढी मजा आली असती, त्याच्या दुप्पट मजा आम्हाला हे सर्व सोबत असल्यामुळे मारता आली. धन्यवाद पाच पांडव🙏. (आम्ही पाच पांडव आहोत हे त्यांनीच आम्हाला सांगितले आहे. पांडव हे त्यांचच विशेषण आहे)
ट्रीपला जाण्याचे ठरताच आमच्या सगळ्यांच्या आणि स्वतःच्या तब्येतीचा विचार करून, भारतीने आम्हा सर्वांना महेश्वरचा एक व्हिडीओ शेअर केला. येथे जायचे का म्हणून विचारले? आम्हाला काय फक्त एकमेकांचा सहवास हवा होता. जेथे जाऊन कुणाची उठबस करायची गरज नव्हती, स्वयंपाकाची काळजी नव्हती, फक्त गप्पा आणि गप्पाच मारायच्या होत्या! आम्ही चारही जणींनी लगेच होकार देऊन टाकला. खरं तर महेश्वर बद्दल मी अजून काही ऐकलेही नव्हते. पण मैत्रिणी आणि नर्मदा मैय्या भेटणार म्हणून आनंद वाटला! दहा जणांच्या वेळेची adjustment करता-करता कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी ठरले की, उद्या सकाळी सहा वाजताच आपण मालेगांव येथून निघायचे. शक्य झाले तर रात्री पर्यंत परत यायचे किंवा उशीर झाला तर एक मुक्काम करायचा. कृष्ण जन्माष्टमी मुळे काहींचा उपवास, तर काहींचा नाही! सोबत काही खायला घ्यायचे 'नाही' ठरविले, तरी सगळी उत्साही मंडळी! काही ऐकते का? उपवासाचे वेगळे, बिना उपवासाचे वेगळे, अस प्रत्येकाचे जवळ-जवळ तीन दिवसांचे🫢 खाणे सोबत आणले!
ठरल्याप्रमाणे सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही मालेगांवच्या बाहेर पडलो. आमच्या सगळ्यांच्या सामानाची तयारी आणि वयाच्या हिशोबाने सहा वाजता ठरले, तरी सगळ्यांना निघत-निघत आणि गोळा करत-करत ही वेळ होणारच, हे आम्ही अगोदरच गृहीत धरले होते! गाडीचा ड्रायव्हर पांडुरंग खूपच चांगला होता. नऊ वाजेपर्यंत आम्ही सोनगीर फाट्यापर्यंत पोहोचलो. तेथे हॉटेल सुरभी मध्ये भजे, सोबत घेतलेले फराळाचे आणि फळे ह्याचा भरपेट नाश्ता केला, चहा घेतला, थोडे फोटो वगैरे काढले. सुरुवातीपासूनच फोटो काढण्याचे काम, फोटो काढण्याची आवड असणाऱ्या प्रमोद भाऊजींकडे गेले. त्यामुळे संपूर्ण ट्रिप मध्ये, एव्हढे फोटो काढूनही त्यांचे स्वतःचे फोटो खूपच कमी आले. त्यानंतर बिजासनी मातेच्या दर्शनासाठी आम्ही थांबलो. बिजासनी आमचे कुलदैवत असल्यामुळे आम्हाला तिचे दर्शन घेण्याची नेहमीच 'ओढ' लागलेली असते. मंदिरात गर्दी बिलकुलच नव्हती. सगळ्यांनी बिजासनी मातेचे दर्शन अतिशय शांततेने आणि निचिंतीने घेतले. प्रमोदभाऊजींनी तेथे सार्थ श्री कुंजिका स्तोत्र म्हटले. देवीची आरती देखील आम्हाला तेथे मिळाली 🙏. बिजासनीला पुन्हा चहा-पाणी घेऊन आम्ही लगेच प्रवासाला सुरुवात केली. गप्पांच्या आणि गाण्याच्या नादात प्रवास कोठपर्यंत आला, हे देखील आम्हाला समजत नव्हते. या सर्व मित्रांचे गाणे म्हणणे चालू होते. मधून मधून गमती-जमतीही चालू होत्या. साधारण दोन वाजेच्या सुमारास आम्ही महेश्वर येथे पोहोचलो. ड्रायव्हर सोडून आम्ही सगळेजण प्रथमच महेश्वर बघत होतो. ड्रायव्हरने आम्हाला गाडी पार्क करून, घाटाचा रस्ता दाखविला. घाट खूपच खोल होता. आमच्या पैकी संध्या आणि उज्ज्वलाला घाट उतरायला खूप वेळ लागला. एकमेकांचे हात घरून आम्ही घाट उतरलो. परत येताना अजून एव्हढा उंच घाट चढायचा होता. पण चांगली सोबत असेल, मनात इच्छा असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. त्यांच्या मनातील श्रद्धा त्यांना बळ पुरवित होती एव्हढ निश्चित! घाट उतरताच नर्मदेच्या अथांग पात्राचे दर्शन आम्हाला झालं. नर्मदा मैय्याच दर्शन होताच सगळ्यांचे हात आपोआप जोडले गेले. समोर जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. घाट जेव्हढा खोल होता तेव्हढाच मोठा सुद्धा होता. मंदिर कोठे आहे हे देखील अजून दिसत नव्हते. कारण डाव्या बाजूला वर नजर जाईल तेथपर्यंत आखीव रेखीव उंच बुरुजाच बांधकाम दिसत होत. ठिकठिकाणी वर जाण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या दिसत होत्या. आम्ही उतरून आलो ती तर त्याची सुरुवात होती! या सर्व पायऱ्यांची रचना देखील खूपच सुबक होती. एक एक दगड कसा ठेवला असेल? कसा कापला असेल? एव्हढे वर्ष नर्मदा मैय्याच्या लाटांचा मारा ते कसा सहन करत असतील, एकही दगडाला अजून पर्यंत कोठेही तडा गेलेला नाही, की आपापसात त्यांनी एकमेकांना सोडून दिलेले नाही! आम्हाला हे सर्व पाहून आश्चर्य वाटत होते. धन्य त्या अहिल्याबाई ज्यांनी एव्हढ्या वर्षांपूर्वी हे प्रचंड आणि मजबूत बांधकाम केले आणि धन्य त्यांचे ते बांधकाम करणारे कुशल कारागीर🙏🙏🙏.
आता आम्ही जे पाहत होतो, त्याने अक्षरशः आमचे डोळे दिपून जात होते. घाटावर जाणाऱ्या मोठमोठ्या या दगडी पायऱ्या, नदीच्या पात्रात आणि वरती दगडी मंदिरे, त्यातील शिवलिंग. सगळेच पुरातन! तरीही त्यातील सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. खाली देखील संपूर्ण घाट काळ्याशार दगडाने मजबूत बांधलेला! नदी पात्रात उतरण्यासाठी पुन्हा खोलपर्यंत गेलेल्या त्या पायऱ्या! त्या नदीत किती खोलपर्यंत गेलेल्या होत्या, कळत नव्हते. कोणत्याही सुखसुविधा नसताना, हे एव्हढ मोठ प्रचंड आणि टिकावू काम करण, म्हणजे काही तोंडचा खेळ नाही. सारच अदभुत आणि अद्वितीय होत! मला आमच्या घराच्या कंपाऊंडची फरशी आठवली आणि हसू आले! घराच्या बाजूला पाच पाच फुटाची ही फरशी! खूप मोठा पाऊस-पाणी नसताना वीस वर्षात तीन वेळा फरशी बसविली आम्ही! आणि मी हे समोर पाहत होते ते, शतका नु शतके टिकणार, अवाढव्य बांधकाम! मनातून लक्ष-लक्ष दिवे मी अहिल्याबाईंना ओवाळीत होते. माझ्या देशातल्या या पवित्र, कुलीन, घरंदाज स्री समोर पुन्हा पुन्हा नतमस्तक होत होते. त्यांच्या विषयीच्या अभिमानाने मन भरून येत होत मी अहिल्याबाईंना त्रिवार वंदन करत होते 🙏🙏🙏. घाटावरच नर्मदा मैय्याच्या किनाऱ्याच रूप डोळ्यात साठवत होते. घाट संपता संपत नव्हता, एव्हढा तो मोठा होता. मला वाटलं मीच अशी हे मनोहर दृश्य पाहून भारावून गेले आहे की काय ! पण माझ्या बरोबर असणाऱ्या या सर्व मैत्रिणी, आपले दुखणे विसरून घाटावर पुढे चालत होत्या, सगळ विस्मयाने पाहत होत्या. हे पाची पांडव देखील कोणी कॅमेरात दृश्य कैद करत होते, तर कोणी स्वतः ला असणारी माहिती आम्हाला सांगत होते. नर्मदा मैय्याच महेश्वर येथील हे दर्शन आम्हा सगळ्यांनाच भारावून टाकत होत, यात शंकाच नाही! काही ठिकाणी पुरुष तर काही ठिकाणी स्त्रिया स्नान करत होत्या. आम्ही सुद्धा सगळ्यांनी, पाण्यातील पायरीवर उतरून, त्या पाण्याने हातपाय धुवून घेतले. गंगामैयाला भक्ती भावाने नमस्कार केला. सूर्याला अर्ध दिले🙏. शंकराच्या पिंडीवर बेल, फुले आणि अक्षता वाहिल्या. घाटावर वेगवेगळी दुकाने लागलेली होती. Remote च्या बाईक, कार दिसत होत्या. सायकलीवर फोटो काढण्यासाठी सायकली सजवून ठेवलेल्या होत्या. त्यातीलच एक सायकलवाला फोटो काढण्यासाठी आमच्या मागे लागला. मग आम्हीही आमचे वय विसरून, त्याच्याकडून जोडी-जोडीने सायकलवर बसून फोटो काढून घेतले.
बराच घाट चालून गेल्यानंतर वरती महेश्वरच मंदिर आहे, हे आम्हाला कळाले. आता संध्या आणि उज्ज्वला कशा चढणार? म्हणून आम्हाला प्रश्न पडला होता. अरे !! पण त्या तर आमच्या अगोदरच निम्मे पायऱ्या चढून वरती बसलेल्या! नाहीतर मला वाटलं होतं ह्यांचे गुढगे यांना महेश्वरच दर्शन घेऊ देतात की नाही म्हणून?
मंदिराच्या प्रवेशदारात प्रवेश करताच, आम्ही पाह्यलं की घाटावर तरी फक्त आखीव रेखीव सरळ दगड होते, येथे तर संपूर्ण परिसरात दगडी मंदिरे आणि त्याच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम केलेले! त्यात हत्ती, भालदार, चोपदार, कमळ, चौकट, अगदी मी सांगू शकणार नाही नाही अशा वेगवेगळ्या आकारातील सुंदर कोरीव काम! विविध आकाराच्या नक्षीने साऱ्या पायऱ्या आणि भिंती सजल्या होत्या. राजस्थानात संगमरवरीत दगडावर कोरलेली कला मी पाहिली होती, पण ही काळया कठीण दगडावर कोरलेली कला! बारीक बारीक, साचेबद्ध कलाकुसर पाहून डोळे दिपून जात होते. डोळ्यात हे सौंदर्य आम्ही साठवत होतो, एकमेकांना सांगत होतो. फोटो तरी किती काढणार? तसूभर देखील इकडे तिकडे ती रचना झालेली नव्हती, अतिशय प्रमाणबद्ध ! चार वेळा खाडाखोड करून देखील, पेन्सिलने कागदावर आपण असे चित्र काढू शकणार नाही! कोणते माप आणि कोणती हत्यारे या कारागिरांनी वापरली होती कोणास ठाऊक?
वरच्या कमानीतून ठिकठिकाणी नर्मदा मैय्याचे दर्शन होत होते. अशा असंख्य कमानी तेथे होत्या. किती सौंदर्य दृष्टी! हे सगळ पाहून आम्ही अचंबित होत होतो, उल्हासित होत होतो. महेश्वरच दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पायऱ्यांनी वरती गेलो. रस्त्यात महेश्वरी साड्यांचे दुकान/शो रूम होते. बाजूलाच एक विणकर हातमागावर साडी विणताना दिसत होता. त्याच्या आजुबाजूला छोटी छोटी झाडी लावलेली होती. तो जणू काही एखाद्या बगीच्यात बसून काम करीत आहे असे वाटत होते. परंतु तिकडे जायला परवानगी नव्हती . अजून थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर सपाटी सुरू झाली .तेथे अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा होता. तेथे तिकीट काढून त्या संपूर्ण परिसरात आम्ही फिरून आलो. अहिल्याबाई होळकरांची, प्रतिकात्मक पुतळ्या वरून, त्यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती देण्यात आलेली होती. त्याकाळातील हत्यार शोकेसमध्ये ठेवलेली होती, त्याची नावे वगैरे दिलेली होती. होळकर घराण्याच्या वंशावळी विषयी देखील संपूर्ण माहिती दिलेली होती. अहिल्याबाईंनी प्रत्येक राज्यात केलेल्या कामाची भली मोठी यादी येथेच लिखित स्वरूपात आमच्या वाचनात आली. मी फक्त महाराष्ट्रातीलच त्यांनी केलेल्या कामांची यादी वाचू शकले. त्यात मालेगांव मधील होळकर पुलाचा उल्लेख मला दिसला नाही! म्हणजे त्यांनी केलेली, तेथे लिहिलेली , ती कामे देखील अपूर्णच होती तर! अशी असंख्य कामे अहिल्याबाईंनी केलेली आहेत. त्यांच्या कोणकोणत्या कामांची तुम्ही गणती करणार? कोणकोणती कामे लक्षात ठेवणार? ठिकठिकाणी घाट बांधणे, विहिरी बांधणे, मंदिरे उभारणे सोप का काम आहे हे? असे असंख्य घाट, विहिरी, पूल आणि मंदिरे अहिल्याबाईंनी बांधलेली आहेत.
अहिल्याबाईंचे देवघर देखील आम्ही पाहिले. त्यातील स्वर्ण झुला आणि चांदीच्या चकाकणाऱ्या शिवलिंगानी मन वेधून घेतले. परतू तेथे फोटो काढण्यास सक्त मनाई होती. खूप सारे चांदीचे मोठ-मोठे टाक आणि बरेच शिवलिंग देवघरात होते. बाजूलाच एक दरवाजा बंद होता, तेथून अहिल्याबाई नर्मदेचे दर्शन घेत होत्या असे कळाले. तेथे आता हॉटेल करण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळाली, पण ती बंद होती. त्यानंतर बाहेर आल्यावर बाजूला छोटेखानी बगीच्या मध्ये, अहिल्याबाईंचा एक पूर्णाकृती पुतळा होता, त्याला आम्ही वंदन केले, त्याच्याबरोबर फोटो काढले, पुन्हा एकदा त्या पवित्र पायांना आम्ही स्पर्श केला. डोक्यावर पदर , हातात शिवलिंग घेऊन उभी असणारी ती तेजस्विनी ! तिला मी काय म्हणू? रणांगणावर ती रणरागिणी होती, गादीवर बसली की राणी होती, जनतेसाठी न्यायाधीश होती, स्वतःच्या देवघरात ती योगिनी होती, मल्हाररावांसाठी ती त्यांची आदर्श सून होती आणि माझ्यासाठी थोर समाजसुधारक होती!
पुन्हा आम्ही थोडे खाली आलो, तर समोर अजून काही दगडी मंदिरे होती, पण त्या सर्व मंदिराना रंग दिलेला होता. काळया दगडातील ती सर्व मंदिरे पाहिल्यानंतर ही रंग दिलेली मंदिरे पाहताना, आमचाच रंग उडाला! तरीही आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घेतले. साडे पाचशे वर्षापासून अखंड तेवत असणारे दिवे तेथे होते, त्यांचेही दर्शन आम्ही घेतले आणि मंदिराच्या पायऱ्या उतरून पुन्हा घाटावर आलो. मला आवडणारा भूरभूर पाऊस येत होता. नर्मदेचा घाट सोडावासा वाटत नव्हता. पण सोडावा तर लागणारच होता. पुन्हा एकदा मी नर्मदेच्या त्या पवित्र पाण्याने माझे हात-पाय धुतले तिला पुन्हा पुन्हा वंदन केले 🙏. जड अंतःकरणाने चालत चहाच्या दुकानापर्यंत आलो. जोरदार पावसाच्या आणि नर्मदेच्या साक्षीने, पृथ्वीवरच्या अमृताचा म्हणजे चहाचा स्वाद घेतला.
आता संध्या आणि उज्वलाची खरी परीक्षा होती. रस्ता पावसाच्या पाण्याने संपूर्ण भिजला होता. पाय सटकत होते. चालताना बराच त्रास होत होत. अशा परिस्थितीत पुन्हा घाट चढायचा होता. परंतु त्यांनी हळूहळू तोही चढून पूर्ण केला.
आम्ही सर्व गाडीजवळ आलो, संध्याकाळचे साडे सहा वाजले होते, आमची गाडी चालू झाली. रस्त्याने बरीच ट्रॅफिक होती, वरून जोराचा पाऊस येत होता. तरीही.आमच्या ड्रायव्हरने जागा मिळेल, संधी मिळेल तशी युक्तीने शिरपूर पर्यन्त गाडी काढली. शिरपूरला दहा वाजता आम्ही पालवी या हॉटेल मध्ये जेवण केले आणि गाण्यांच्या व गप्पांच्या संगतीने पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. सकाळी साधारण एक वाजता आम्ही मालेगांव येथे येऊन पोहोचलो!
फक्त मैत्रिणींचा सहवास मिळावा म्हणून काढलेली ही ट्रिप, आम्हाला खूप काही चांगलं पहायला आणि विचार करायला लावून गेली होती.
Comments
Post a Comment